अकोला : शहरातील जुने शहर भागात समाजमाध्यमातील पोस्टवरून शनिवारी रात्री हिंसाचार घडल्यानंतर आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील सिटी कोतवाली व रामदास पेठ पोलीस ठाण्यांच्या परिसरात जमावबंदी, तर जुने शहर व डाबकी रोड पोलीस ठाण्यांतर्गत दिवसा जमावबंदी आणि रात्री ८ नंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हिंसाचार प्रकरणी सहा गुन्हे दाखल झाले असून, १०० वर आरोपींना अटक केली आहे. शहरातील इंटरनेट सेवादेखील सुरू करण्यात आली.

हेही वाचा – नागपूर : राज्यात प्रथमच बाळ विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; तब्बल ५८ आरोपी

समाजमाध्यमावर शनिवारी रात्री एक पोस्ट प्रसारित झाली होती. या पोस्टवरून हिंसाचार झाला. समाजकंटकाकडून जाळपोळ, तोडफोड व दगडफेक करण्यात आली. या घटनेत हरिहर पेठ येथील एकाचा मृत्यू झाला असून दोन पोलिसांसह आठजण जखमी झाले आहेत. गंभीर परिस्थिती लक्षात घेत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शनिवारी रात्रीच कलम १४४ लागू करून जुने शहर, रामदास पेठ, शहर कोतवाली व डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या परिसरात संचारबंदी लागू केली होती. दरम्यान, आता जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे लक्षात घेता शहरातील चार पोलीस ठाण्याच्या परिसरात संचारबंदी निर्बंधात अंशतः बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. शहर कोतवाली व रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या परिसरात लावण्यात आलेले संचारबंदी निर्बंध हटविण्यात येऊन जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा – नागपूर : डॉ. आंबेडकर भवन पाडणाऱ्यांविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

जुने शहर व डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी शिथिल करत १६ मेपासून पुढील आदेशापर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत जमावबंदी तर रात्री ८ ते सकाळी ८ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदी आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. शहरातील इंटरनेट सेवादेखील सुरळीत झाली आहे. शहरातील हिंसाचार प्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यात चार, तर रामदास पेठ पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत १०० वर आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी आरोपींची धरपकड सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Life in the city of akola is normal curfew during night ppd 88 ssb
Show comments