नागपूर : सध्या शाळा सुरू झाल्या असून जवळपास ६५ टक्के विद्यार्थी-विद्यार्थिनी स्कूलबस, स्कूलव्हॅन किंवा ऑटोने शाळेत जातात. मात्र, ते सुरक्षितपणे शाळेत पोहचतात का?, याबाबत कुणीच विचार करीत नाही. सुसाट धावणाऱ्या या वाहनांमुळे मुलांचे जीव धोक्यात आले आहे. भविष्यात मोठा अपघात घडल्यानंतरच शाळा संचालक, प्रशासक, वाहतूक पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना जाग येणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून शाळांची पहिली घंटा वाजली. हजारो विद्यार्थी स्कूलबस, स्कूलव्हॅन आणि ऑटोने शाळेत जायला लागली. काही शाळा व्यवस्थापनाकडून पालकांना स्कूलबस, स्कूलव्हॅन अनिवार्य करण्यात आले. दर महिन्याला निश्चित स्वरूपाचे उत्पन्न मिळत असल्याने ऑटो चालकही शाळा सुरू होताच विद्यार्थी गोळा करणे सुरू करतात. सध्या शाळेत वेळेवर पोहचण्यासाठी स्कूलबसचालक, व्हॅनचालक आणि ऑटोचालकांमध्ये जणू स्पर्धा लागलेली असते. पाल्यांना रस्त्यावरून बसमध्ये घेतल्यानंतर पुढच्या टप्प्यावर पोहचण्यासाठी वाहने वेगाने चालवत असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. अनेकदा ऑटोचालक तर विरुद्ध दिशेने (राँगसाईड) वाहने चालवतात. चालकाला मुलांच्या सुरक्षिततेऐवजी कमी वेळेत मुलांना शाळेत सोडण्यावर अधिक भर असतो.
हेही वाचा… राज्यात सर्वाधिक हत्याकांड मुंबई-पुण्यात; ठाणे-नागपुरात खुनाच्या घटनांवर नियंत्रण
अनेक स्कूलव्हॅनचे चालक अल्पवयीन असतात. त्यांना वाहन चालवण्याचे योग्य प्रशिक्षणही नसते. त्यामुळे अपघात होण्याचा धोका अधिक असतो. परंतु, याकडे सध्या कोणाचे लक्ष नाही. अपघात झाल्यानंतरच संस्थासंचालक आणि पोलीस विभागाला जाग येते. गृह विभागाने ऑगस्ट २०१२ रोजी काढलेल्या आदेशानुसार प्रत्येक शाळेत स्कूलबस समिती स्थापन करणे आवश्यक आहे. याशिवाय जिल्हा स्कूलबस सुरक्षितता समितीने वेळोवेळी शहरातील विविध शाळांची बैठक घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याबाबत सूचना देणे आवश्यक आहे. स्कूलबससाठी वाहतूक शाखेने काही निकष ठरवून दिले आहेत. यामध्ये बसचा परवाना, पीयूसी, विमा व स्कूलबसच्या ‘फिटनेस’चा समावेश आहे. मात्र, पोलिसांकडून नियमित तपासणी केली जात नाही. स्कूलबससाठी आता अनेक शाळांकडून टाटा मॅजिक वाहनाचा सर्रास वापर केला जातो. स्कूलबस, व्हॅनवर वाहतूक पोलीस अर्थपूर्ण संबंध असल्याने कारवाई करीत नसल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा… भंडारा : जीर्ण शाळेच्या स्लॅबचा भाग कोसळला; सुदैवाने मुले बचावली
वाहतूक पोलिसांची निष्क्रियता
वाहतूक शाखेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमाबाबत जनजागृती करण्याबाबत उपक्रम राबवण्यात येतात, मात्र, स्कूलबसच्या सुरक्षित वाहतुकीचा यामध्ये अंतर्भाव दिसून येत नाही. स्कूलबस हा प्रादेशिक परिवहन विभागांतर्गत येणारा विषय म्हणून पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते, मात्र वाहतूक शाखेने निकषांची पडताळणी केल्यास भविष्यातील संभाव्य दुर्घटनेला आळा बसेल.
हेही वाचा… “त्रिशुळाचा अपमान करू नका, कुठे बोचतील…”, उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका; म्हणाले…
ऑटोरिक्षात विद्यार्थी किती सुरक्षित?
शहरात वेगवेगळ्या शाळेंमध्ये दररोज मुलांची ने-आण करण्यासाठी शेकडो ऑटोरिक्षा धावतात. यात अनेक ऑटो भंगार स्वरूपाचे आहेत. एका ऑटोत १२ ते १५ विद्यार्थ्यांना कोंबण्यात येते. सुरक्षेची साधने नसतात. त्यामुळे या ऑटोरिक्षांतून विद्यार्थ्यांना किती सुरक्षित आहे, हे पालकांनाच ठरवावे लागणार आहे.
हेही वाचा… विदर्भात ‘येलो अलर्ट’, विजेंच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा
असे आहेत नियम
प्रत्येक स्कूलबसला वाहन वेग नियंत्रक लावावे, अग्निशमन यंत्रणा बसवावी, धोक्याचे इशारा देणाऱ्या लाईटची व्यवस्था करावी, शाळेची ओळख दर्शवणारी पट्टी लावावी, मदतनीस असावा, स्कूलबसमधील आपत्कालीन खिडकी सोप्या पद्धतीने उघडेल याची माहिती विद्यार्थ्यांना असेल, अशी व्यवस्था असावी. वाहनांची वेळोवेळी तपासणी करावी, या बाबी महत्त्वाच्या आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहतूक पोलीस गंभीर आहेत. दोन दिवसांत आरटीओ आणि पोलीस विभाग संयुक्तपणे विशेष तपासणी मोहीम राबवणार आहे. त्यामध्ये बस, स्कूलव्हॅन आणि संबंधित वाहनांची तपासणी, परवाने, पीयूसी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. – मुकुंद साळुंके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक विभाग.