लोकसत्ता टीम
नागपूर: पद्मगंधा प्रतिष्ठानचा नववर्षातला पहिला ‘नलिनी बाळकृष्ण देवपुजारी’ स्मृती जीवनगौरव पुरस्कार डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे यांना जाहीर झाला आहे.
डॉ.रवींद्र कोल्हे आणि डॉ.स्मिता कोल्हे हे मेळघाट या आदिवासी क्षेत्रातील बैरागड या दुर्गम गावातील आदिवासी लोकांना वैद्यकीय सेवा पुरवीत आहेत. त्यांच्या या सेवा कार्याची दखल घेत भारत सरकारच्यावतीने उभयतांना यापूर्वीच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. येत्या २० जानेवारी २०२४ ला शनिवारी श्रीशक्तिपीठ रामनगर येथे संध्याकाळी पाच वाजता आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार कोल्हे दाम्पत्याला प्रदान करण्यात येणार आहे.
आणखी वाचा-थंडीबाबत काय म्हणाले हवामान खाते? काय आहे नेमका अंदाज?
कार्यक्रमाला संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, डॉ. गिरीश गांधी, डॉ.सतीश देवपुजारी, माधुरी साकुळकर उपस्थित राहणार आहेत. पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या जीवन गौरव पुरस्काराचे यंदाचे चोविसावे वर्ष आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठी व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आता पर्यंत डॉ. रघुनाथ माशेलकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ॲड.उज्वल निकम, जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, क्रिकेटवीर सुनील गावस्कर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, पर्सिस्टंटचे सर्वेसर्वा मा. डॉ आनंद देशपांडे अशा अनेक मान्यवरांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.