गोंदिया : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खांबी/पिंपळगाव येथे विज पडल्याने म्हैस जागीच ठार झाली. ही घटना १५ जुलैच्या सायंकाळी ७:३० वाजता सुमारासची आहे. या घटनेत पशुपालक शेतकरी हेमराज नानु मेश्राम यांचे नुकसान झाले आहे. सायंकाळच्या सुमारास खांबी/पिंपळगाव परिसरात अचानक वातावरणात बदल होवून पावसाला सुरूवात झाली. विजेच्या कडकडाट असतानाच पशुपालक शेतकरी हेमराज नानु मेश्राम रा. खांबी यांच्या अंगणात बांधलेल्या म्हशीवर विज पडल्याने जागीच ठार झाली. या घटनेत पशुपालकाचे १ लाखाचे नुकसान झाले असून शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या परिसरात सुमारे दीड तास मुसळधार पावसामुळे नाल्याला पुर आल्याने महागाव-शिरोली रस्ता बंद झाला होता. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील काही गावांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. सतत मुसळधार पावसाने परिसरात पाणीच पाणी अशी परिस्थिती काही काळ निर्माण झाली होती. दरम्यान महागाव ते मोरगाव मार्गावरील शिरोली जवळ असलेल्या नाल्याला पुर आल्याने रस्ता बंद पडला होता. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांची चांगलीच कोंडी झाली होती. रहदारी ठप्प पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

हेही वाचा…वर्धेतील ‘या’ डॉक्टर जोडप्याचे ‘बंटी-बबली’ला लाजवेल असे कृत्य! कोट्यवधी रुपयांची…

दमदार पावसाने झोडपून काढल्याने नागरिकांची एकच दाणादाण उडाली. दरम्यान पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकर्‍यांना दिलासा मिळाला तर सर्वसामान्य ही सुखावला. मुसळधार पावसाने महागाव ते मोरगाव अर्जुनी मार्गावर शिरोली गावशिवारातून वाहत असलेल्या नाल्याला पुर आल्याने वाहतूक ठप्प पडली. शिरोली व महागाव या गावांचे संपर्क काही काळ तुटले होते. रहदारी बाधित झाल्याने शेतकरी, नागरिक व विद्यार्थ्यांची कोंडी झाली होती. पुर ओसरताच वाहतूक पुर्ववत झाली. परंतु, यादरम्यान परिसरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले.

दरम्यान पुराचे पाणी परिसरातील शेतात शिरल्याने शेकडो शेतकर्‍यांना चांगलाच फटका बसला. मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्याने शेत जमिनीला वेढा घातला. यामुळे लावलेली पेरणी पाण्यात सापडली. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. या परिसरात पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

हेही वाचा…मुंबई-ठाण्यात महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचार; गृहमंत्री फडणवीस यांचा…

गोरेगावात वीज पडून गाय दगावली

गोरेगाव येथील रेल्वेखाली परिसरातील सतीश मेश्राम यांची गाय घरासमोरील मैदानात चरण्यासाठी सोडण्यात आली असता दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी अचानक वीज कोसळल्याने त्यांच्या गायीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत त्यांचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. या घटनेची माहिती स्थानिक तलाठ्याला देण्यात आली. तलाट्याने पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lightning strikes in gondia buffalo killed heavy rains cause severe disruptions in arjuni morgaon tehsil pimpalgaon khambi area sar 75 psg