अकोला : इंग्रजांप्रमाणेच काँग्रेसचे केवळ देशाला लुटण्याचे विचार राहिले आहेत. एका परिवाराची देशावर सत्ता कायम ठेवण्यासाठी काँग्रेसची धडपड असते. दलित, आदिवासी, वंचित घटकांना त्यांनी कधीही बरोबरीचे मानले नाही. काँग्रेसने बंजारा समाजाविषयी सदैव अपमानजक व्यवहार केला, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहरादेवी येथे आज केली.
वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे नंगारा संग्रहालयाचे लोकार्पण व शेतकरी सन्मान संमेलनात ते बोलत होते. व्यासपीठावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, कृषिमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री संजय राठोड आदी प्रामुख्याने उपस्थित होते. नंगारा विरासत वास्तू संग्रहालयासह व सुमारे २३ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि पशुसंवर्धन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला.
पंतप्रधान पुढे म्हणाले, बंजारा विरासत संग्रहालय नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. बंजारा समाजाची भारताच्या निर्मितीत मोठी भूमिका राहिली आहे. प्रत्येक क्षेत्रात बंजारा समाजातील महापुरुषांनी महान कार्य केले. देशाच्या स्वतंत्र्यांनंतर बंजारा समाजाला सन्मान देणे गरजेचे होते. काँग्रेस सरकारने बंजारा समजाला मुख्य प्रवाहापासून सदैव दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.
देशाच्या स्वातंत्र्यांनंतर काँग्रेस पक्षावर ज्या परिवाराने ताबा मिळवला, त्यांचे विचार इंग्रजांप्रमाणेच राहिले आहेत. काँग्रेस दलित, आदिवासी व वंचित घटकाला आपल्या बरोबरीचे कधीही मानत नाहीत. देशावर एका परिवाराची सत्ता राहिली पाहिजे, असे काँग्रेसचे धोरण आहे. काँग्रेसने बंजारा समाजाविषयी सदैव अपमानजक व्यवहार केला. एनडीए सरकार बंजारा समाजाच्या सन्मानासाठी कार्यरत असून विकासाच्या गतीला वेग देण्यासाठी विविध योजना राबवित आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना पोहरादेवीच्या विकासाला मंजुरी देण्यात आली होती. मात्र, मध्यंतरी आलेल्या मविआ सरकारने पोहरादेवी विकासाला ब्रेक लावला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आलेल्या महायुती सरकारने पोहरादेवी विकासासाठी ७०० कोटी रुपये खर्च केले. त्यामुळे तीर्थक्षेत्राचा विकास होऊन भाविकांना लाभ होईल. भाजप वंचित घटकाला पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहे, तर काँग्रेसला फक्त लुटणे माहीत आहे.
हे ही वाचा…पंतप्रधान मोदींनी घेतला नगारा वाजवण्याचा आनंद; वाशीमच्या पोहरादेवी येथे…
शहरी नक्षलवादाला काँग्रेस प्रोत्साहन देते. भारताला विकासापासून रोखणारे काँग्रेससोबत आहेत. दिल्लीमध्ये हजारो कोटीचे अंमली पदार्थ पकडल्या गेले. त्यात काँग्रेसचा एक नेता अडकला. युवा वर्गाला व्यसनाच्या मार्गावर लावण्याचे काम काँग्रेस करीत आहे. काँग्रेस व त्यांच्या सहकारी पक्षाने शेतकऱ्यांचे जीवन कठीण बनवले. त्यामुळे काँग्रेसचा पीएम किसान योजनेला विरोध आहे. कर्नाटक, तेलंगणामध्ये काँग्रेस सरकार येताच, शेतकरी हिताच्या योजना बंद केल्या आहेत. महाराष्ट्रातील सिंचन योजनाची कामे काँग्रेस सरकारने रोखून धरली होती, असा आरोप देखील त्यांनी केला. सभेला मोठा जनसमुदा उपस्थित होता.