चंद्रपूर : जिल्ह्यात काँग्रेसप्रमाणेच भाजपलाही गटबाजीचे ग्रहण लागले आहे. पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके यांच्या पहिल्याच दौऱ्यात ही गटबाजी चव्हाट्यावर आली. माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार समर्थकांनी विश्रामगृह येथे पालकमंत्र्यांचे स्वागत केले, तर आमदार किशोर जोरगेवार यांनी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले. या सत्कार सोहळ्यात मुनगंटीवार विरोधक एकत्र आले, तर समर्थकांनी त्याकडे पाठ फिरवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पालकमंत्री उईके यांचा २५ जानेवारीला शहरात दौरा झाला. मुनगंटीवार समर्थकांनी शासकीय विश्रामगृहात पालकमंत्र्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी आमदार देवराव भोंगळे, जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, शहराध्यक्ष राहुल पावडे यांच्यासह इतर पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. दुसरीकडे, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात जोरगेवार यांच्या नेतृत्वात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, करण देवतळे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस हे भाजपतील मुनगंटीवार विरोधक नेते उपस्थित होते. मुनगंटीवार समर्थकांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. यामुळे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली.

दरम्यान, भाजपतील गटबाजीबाबत पालकमंत्री उईके यांना प्रश्न विचारला असता त्यांनी थेट हात जोडले. कुठे गटबाजी आहे, मला तर दिसली नाही. सर्व नेते एकत्र दिसले. जिल्ह्यातील वातावरण बिघडवू नये, असे म्हणत त्यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे आगामी काळात भाजपतील गटबाजी थोपवण्याचे आव्हान पालकमंत्री उईके यांच्यासमोर असेल.

जिल्हा बँक नोकरभरतीप्रकरणी बैठकीचे आश्वासन

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीत आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोत पोतराजे उपोषणावर बसले आहेत. उईके यांनी त्यांची भेट घेतली. याबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार देवराव भोंगळे यांच्यासह आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान, मनसेचे सचिन भोयर यांनी प्रजासत्ताकदिनी चंद्रपूर जिल्हा बँकेसमोर बनावट नोटांचा पाऊस पाडून अनोखे आंदोलन केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Like congress bjp in district faces factionalism highlighted during guardian minister ashok uikes first tour rsj 74 sud 02