नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन आटोपताच दुसऱ्याच दिवशी परिसरात आणि अनेक खोल्यांमध्ये साफसफाई करताना दारूच्या बाटल्या सापडल्या. अतिसंवेदनशील ठिकाण म्हणून परिचित असलेल्या आमदार निवासात दारूच्या बाटल्या पोहोचतातच कशा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवन, रविभवन, आमदार निवास या परिसराला सुरक्षेचा गराडा असतो. कुणालाही या ठिकाणी प्रवेशपत्राशिवाय प्रवेश नसतो. गेल्या काही वर्षात आमदार निवासमध्ये लोकप्रतिनिधीपेक्षा कार्यकर्ते, सुरक्षारक्षक आणि स्वीय सचिवांचा वावर जास्त असतो. आता या परिसरातच आता दारूच्या बाटल्या सापडत असल्याने या बाटल्या आमदार निवास परिसरात येतात कशा, असा प्रश्न उपस्थित होऊन या भागातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शुक्रवारी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार निवास परिसरात फेरफटका मारला असताना तेथील कर्मचारी खोल्यांची साफसफाई करत असताना इमारतीमधील काही खोल्यांमध्ये चक्क दारूच्या बाटल्या सापडल्या.
हेही वाचा >>> परंपरेत खंड, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय विज्ञान काँग्रेसला येणार नाही, कारण..
इमारत क्रमांक ३ मध्ये साफसफाई होत असताना एका प्लास्टिकच्या टबमध्ये बाटल्या जमा केल्याचे दिसून आले. शिवाय इमारत क्रमांक ३ च्या मागच्या भागात दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि पाण्याच्या बाटल्या दिसून आल्या आहेत. एका सफाई कर्मचाऱ्याला दारूच्या बाटल्या कुठल्या खोलीत सापडल्याचे विचारले असताना माहिती नसल्याचे सांगितले. महिला सफाई कर्मचारी खोल्या साफ करतात त्यावेळी खोलीमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि इतर काही सामान आम्ही गोळा करत असतो. आमदार निवास परिसरात पोलिसांची सुरक्षा व्यवस्था असताना त्या आत येतात कशा, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेही वाचा >>> नागपूर : नववर्षदिनी ‘समृद्धी’वर वाहने सुसाट म्हणून…
व्यवस्थापनाचे हात वर!
आमदार निवासात आमदारांव्यतिरिक्त अनेक लोक येतात. विविध वाहने याठिकाणी पार्क केली जातात. त्यामुळे कुणी दारू पिऊन येथे बाटल्या टाकल्या असण्याची शक्यता आमदार निवास व्यवस्थापनाने व्यक्त केली. आमदार निवास परिसरातील सफाई कर्मचारी व चौकीदारालाही याबाबत विचारणा करण्यात आली असताना त्यांनी आम्हाला साफसफाई करताना खोल्यामध्ये आणि परिसरात सापडल्याचे सांगितले.