वर्धा : गाव करी ते राव न करी, असे म्हणतात. त्याचाच प्रत्यय आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार गावात आला. गांधी, विनोबा भावेंच्या जिल्ह्यात दारूबंदी असली तरी येथे दारूचा महापूर वाहू लागल्याने गावकरी त्रस्त झाले होते. त्या अनुषंगाने मग ग्रामपंचायत सभागृहात बैठक घेण्यात आली. विषारी दारू पिल्याने गावात गेल्या पाच महिन्यांत चार युवकांचा बळी गेल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून पोलीस काय करतात, असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला. देशी-विदेशीसह हातभट्टीची विषारी दारू विकल्या जाते, त्यास आवर कोण घालणार? असा सवाल झाला. पत्रकारांना बातमी दिली म्हणून धमक्या येतात. या तक्रारी ऐकून सभेत उपस्थित पोलीस निरीक्षक विनीत घागे यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच कारवाई दिसून येईल, अशी हमी दिली.

हेही वाचा – यवतमाळमध्ये शिंदे गटातच जुंपली, मंत्री संजय राठोड – खासदार भावना गवळी यांच्यात फलक युद्ध

दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळने सूरू झाले. गावठी दारू विकणारे टप्प्यात आले. एका अशा दारू विक्रेत्यास पकडून त्याच्या डोक्यावर दारूची डबकी ठेवण्यात आली आणि गावातून त्यास फिरविण्यात आले. या घटनेने दारू विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले. तसेच दारू विकताना कुणी आढळून आल्यास फोन करा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या घटनेने गावकऱ्यांना दिलासा मिळाला, असे ग्रामपंचायत सदस्य रामू मगर म्हणतात. यापूर्वी पोलीस खात्याने सभा घेत बंदी करण्याचे आश्वासन देत कारवाई केली. मात्र चार महिने लोटत नाही तोच पुन्हा गावात दारू वाहू लागली. तसे होवू नये अशी अपेक्षा सरपंच शालिनी आदमने यांनी व्यक्त केली. माजी पं. स. सदस्य प्रमोद लाडे यांनी दारू कायमची बंद करण्याचे आवाहन केले. पोलीसच हफ्ते घेत दारू विक्रीसाठी प्रोत्साहन देत असल्याचा आरोप सभेत करण्यात आला होता. त्यावर पोलीस निरीक्षक घागे यांनी दिलगिरी व्यक्त करतानाच यापुढे कुणाचीही गय केली जाणार नाही, असे निक्षून सांगितले.

हेही वाचा – खासदार भावना गवळी यांचे तिकीट कटणार? महायुतीकडून चंद्रकांत ठाकरे की राजू पाटील राजे!

वर्धा-नागपूर हे अंतर कमी असल्याने वाटेत लागणाऱ्या पवनार गावात मोठ्या प्रमाणात दारू येते, असे गावाकऱ्यांनी म्हटल्यावर पोलिसांनी गस्त ठेवून ही समस्या निकाली काढण्याची हमी दिली. आता डबकी घेऊन वरात काढण्याचा दिलेला इशारा गावाकऱ्यांसाठी समाधान देणारा ठरत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Liquor is banned but sold in wardha district action taken after complaint of sale of liquor at pawanar pmd 64 ssb