लोकसत्ता टीम
नागपूर : राज्य शासनाने देशी, विदेशी मद्या विक्रीची दुकाने आणि परमिट रुम बारच्या वार्षिक परवाना शुल्कात १५ टक्के वाढ केल्याने त्याचा परिणाम मद्याच्या दरात होणार असून मद्य शौकिनांना अधिक पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने देशी, विदेशी मद्या विक्री व परमिट रुमच्या वार्षिक परवाना शुल्कात १५ टक्के वाढ केली आहे. सुधारित दरानुसार, देशी-विदेशी मद्या विक्री करणाऱ्या दुकानांसाठी १६ लाख ६४००, देशी दारू विक्री दुकानांसाठी ५ लाख २५,७०० असे एकूण २१ लाख ३२ हजार १०० रुपये तसेच परमिटरुम, बारसाठी ९ लाख ४२,५०० रुपये एका वर्षासाठी परवाना शुल्क आकारण्यात येणार आहे. ही रक्कम २०२४-२०२५ या वर्षासाठी असून ती ३१ मार्चपूर्वी शासनाकडे जमा करायची आहे. दरवर्षी परवाना शुल्कात होणारी वाढ व त्यामुळे महागणारे मद्या याचा भार मद्या शौकिनांच्या खिशावर पडतो.
आणखी वाचा-गृहमंत्री फडणवीस यांच्या जिल्ह्यात एटीएम फोडून १० लाख रुपये पळवले
सरकारकडून परवाना शुल्काची आकारणी एक वर्षासाठी केली जात असली तरी प्रत्यक्षात दहाच महिने दुकाने व बार सुरू असतात. वर्षभरात ६० दिवस म्हणजे दोन महिने मद्याविक्री बंद असते. नागपूर शहरात एकूण १०३ वाईन शॉप तर १८०० परवानाप्राप्त परमिट रुम व बार आहेत. एका वाईन शॉपमध्ये वर्षाला सरासरी पाच ते सहा कोटींचा व्यवसाय होतो.
दुकानाचा खर्च, कर्मचाऱ्यांवर होणारा खर्च आणि शासनाच्या इतर विभागाचे घ्यावे लागणारे ना हरकत प्रमाणपत्र, त्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता दरवर्षी वाढत जाणारे परवाना शुल्क व्यवसायावर परिणाम करणारे असल्याची प्रतिक्रिया नागपुरातील एका मद्याविक्रेत्याने व्यक्त केली. परमिट बार रुम व्यावसायिकांच्या संघटनेचे प्रमुख राजू जयस्वाल यांनी शुल्क आकारणीत सुसूत्रता असावी, अशी प्रतिक्रिया दिली.