नागपूर : नवी दिल्ली येथे आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष ताराबाई भवाळकर यांचे भाषण लांबलचक, धर्मांतरणाचे समर्थन करणारे, छद्मा धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारे आणि शासनावर अनावश्यक टीका करणारे होते, अशा कठोर शब्दात ताराबाईंच्या भाषणावर ‘आगपाखड’ करण्यात आली. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या विदर्भ प्रांताच्यावतीने सोमवारी ‘साहित्य संमेलनाध्यक्षांचे भाषण – माझे आकलन’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. राणी झाशी चौकातील सेवासदन विद्यालय परिसरातील मोतलग सभागृहात हा परिसंवाद पार पडला. यात वृषाली देशपांडे, कवयित्री व लेखिका अलका मोकाशी, प्रा. विजय राऊत यांनी संमेलनाध्यक्षांच्या भाषणावर मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र नाईकवाडे होते.

पंतप्रधानांवर टीका का?

अध्यक्षीय भाषणात डॉ. नाईकवाडे म्हणाले, ‘साहित्य संमेलनाध्यक्षांचे ७० पानी भाषण लांबलचक होते. शरद पवारांचा त्यांनी पाचवेळा उल्लेख केला, मात्र पंतप्रधानांचे नावही घेतले नाही. ताराबाईंनी पंतप्रधानांच्या जैविक विधानावर संदर्भ समजून न घेताच टीका केली, अनेक समकालीन प्रश्नांना संमेलनाध्यक्षांनी स्पर्श केला नाही. धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर नव्हे हा विचार पटवून देण्यासाठी त्यांचा खटाटोप दिसला. सावरकरांच्या धर्मांतरणाबाबतच्या विधानाला विरोध करण्यासाठी ताराबाईंनी वैयक्तिक उदाहरणांची मदत घेतली. धर्माच्या आधारावर अनेक राष्ट्रांची निर्मिती होते ही वस्तुनिष्ठ बाब नाकारून ताराबाईंना काय सिद्ध करायचे होते, असा सवाल डॉ. नाईकवाडे यांनी केला.

हिंंदू धर्म दुटप्पी दाखविण्याचा प्रयत्न

‘साहित्य संमेलनाध्यक्षपदी एका महिलेची निवड झाली यामुळे आनंद होता, मात्र त्यांच्या भाषणानंतर फार निराशा झाली. मराठीला अभिजात दर्जा देऊन मिळालेल्या सन्मानावर भाष्य करण्याऐवजी त्यांनी विद्यामान सरकारवर टीका केली. एकीकडे पंतप्रधान यांचे भाषण अभ्यासपूर्वक होते, तर दुसरीकडे साहित्यिकाकडून कंटाळवाणे आणि लांबलचक भाषण झाले. हिंदू धर्म दुटप्पी आहे, असे त्यांना सुचवायचे होते, असे भाषणात दिसले,’ असे मत अलका मोकाशी यांनी व्यक्त केले. संचालन प्रकाश एदलाबादकर यांनी केले. यावेळी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. लखनसिंह कटरे, कार्याध्यक्ष अविनाश पाठक यांची उपस्थिती होती.

सत्ताविरोधी भाषणांवरच परिसंवाद!

प्रत्येकाच्या राजकीय भूमिका असू शकतात. परंतु, त्यात वैचारिक ऐकारलेपण असेल तर त्याबद्दल शंका उपस्थित होणे, स्वाभाविक आहे. या परिसंवादातून अशाच शंकेला बळ मिळाले. याआधी उदगीरच्या संमेलनात भारत सासणे यांनी सरकारला खडेबोल सुनावले होते. तेव्हाही असाच परिसंवाद आयोजित करून सासणेंच्या भाषणाचा समाचार घेण्यात आला होता. आता ताराबाईंना लक्ष्य करण्यात आले. जे संमेलनाध्यक्ष सरकारचे गुणगाण करतात त्यांच्या भाषणावर असे ठरवून कुणी ‘आकलन’ का करत नाही, असा सवाल आता साहित्य क्षेत्रातून विचारला जात आहे.

Story img Loader