लोकसत्ता टीम
अकोला : लग्नाच्या वरातीत सगळे नाचण्यात दंग असताना अचानक एक मुलगा बेपत्ता होतो. सगळीकडेच शोधाशोध सुरू असतानाच त्याच्या वडिलांच्या हाती एक चिठ्ठी पडते. त्या चिठ्ठीमध्ये १४ वर्षीय मुलगा सुखरूप पाहिजे असेल तर ६० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केल्या जात असून अद्याप अपहृत मुलाचा शोध लागलेला नाही. ही सिनेस्टाईल घटना वाशीम जिल्ह्याच्या बाभुळगाव येथे घडली.
बाभूळगाव येथे गावात १२ मार्चला लग्नापूर्वीचा नानमुख कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गावातून वरात काढण्यात आली. डीजेच्या तालावर वरातीत सहभागी मंडळी जल्लोष करत होती. त्यात १४ वर्षीय अनिकेत संतोष सादुडे हा मुलगा सहभागी झाला होता. सगळे जण नाचण्यात गुंग असताना काहीच वेळात तो मुलगा बेपत्ता झाल्याचे समोर आले. अनिकेत रात्रीच्या वेळी वरातीतून गायब झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास त्याच्या घरासमोर वडिलांच्या नावे बंद लिफाफा आढळून आला. तो उघडून पाहिला असता, त्यात पाच पानांचे पत्र आढळून आले. ‘६० लाख रुपये आणि घरातील सोन्याचे दागिने ठराविक ठिकाणी आणून द्या आणि तुमच्या मुलाला घेऊन जा,’ असे खंडणीखोरांनी नमूद केले. पोलिसांशी संपर्क केल्यास बरे होणार नाही, अशी धमकीही देण्यात आली.
६० लाख रुपये आणि सोने-चांदीच्या दागिन्यांसाठी खंडणीखोरांनी त्याचे अपहरण केल्याचे उघड झाल्यावर सादुडे कुटुंबीयांनी वाशीम ग्रामीण पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून घेत तपास कार्य हाती घेतले. बाभूळगावात पोलीस गेल्या चार दिवसांपासून तळ ठोकून आहेत. संशयित प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. पोलिसांकडून तपास केला जात आहे. गत चार दिवसांत अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात अद्याप पोलिसांच्या हाती धागेदोरे लागलेले नाहीत.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पैसा व सोन्याच्या दागिन्यांसाठी १४ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक व सिनेस्टाईल घटना वाशीम जिल्ह्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान वाशीम पोलिसांपुढे आहे. या प्रकरणात पोलीस तपासात नेमके काय समोर येणार? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.