अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे निर्मित शेती विषयक तंत्रज्ञान, पीक वाणांचे प्रत्यक्ष अवलोकन करण्यासह अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आत्मसात करण्यासाठी विद्यापीठाच्या स्थापना दिनानिमित्त दरवर्षी शिवार फेरी काढली जाते. यंदा प्रथमच सप्टेंबर महिन्यात शिवारफेरीला प्रारंभ केला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या अवलोकनासाठी कृषी विद्यापीठात २० एकरावर जिवंत पिक प्रात्यक्षिके साकारण्यात येत आहेत.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक विभागातील व प्रक्षेत्रावरील तयारीचा आढावा कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, कृषी अधिष्ठाता डॉ. श्यामसुंदर माने, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे, कुलसचिव सुधीर राठोड यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.
हेही वाचा – यवतमाळ : चार सराईत गुन्हेगारांविरुद्ध ‘एमपीडीए’; आतापर्यंत १७ जणांविरुद्ध कारवाई
शिवार फेरीत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना खरीप हंगामातील सर्व पिके व त्यांचे तंत्रज्ञान प्रत्यक्ष बघता यावे, या हेतूने कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून प्रथमच सप्टेंबर महिन्यात शिवार फेरी काढण्यात येणार आहे. गहू संशोधन विभागाच्या प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांच्या अवलोकनासाठी एकाच ठिकाणी खरीप पिकांचे विविध जातीचे पीक प्रात्यक्षिक घेण्यात आलेले आहेत. त्यामध्ये एकूण २१० विविध पिकांच्या जाती लावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने तेलबिया, कडधान्य, तृनधान्य, कापूस, चारापिके, भाजीपाला पिके व फुलांच्या जाती येथे लावण्यात आलेल्या आहेत.
विद्यापीठाच्या महत्त्वाच्या १२ शिफारशींचेसुद्धा प्रात्यक्षिक येथे घेण्यात आले आहेत. कंपोस्ट व गांडूळ खताचेसुद्धा प्रात्यक्षिक बघता येणार आहे. या शिवार फेरीच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्यांचे तज्ज्ञांकडून निराकरण केले जाईल. विदर्भासह राज्यातील सर्वच विभागातील शेतकऱ्यांनी शिवार फेरीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे यांनी केले.