क्रिकेटमध्ये अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित करणारे प्रसिद्ध क्रिकेटपटू, तंत्रशुद्ध शैली, संयम व समतोलपणा, मेहनत, अभ्यासू व जिज्ञासू वृत्ती अंगी बाणणारे खेळाडू, अनेक पुरस्कार, सन्मान ज्यांच्या वाट्याला आले असे सर्वांचे लाडके ‘लिटल मास्टर’ सुनील गावस्कर. ‘सनी डेज’, ‘वन डे वंडर्स’ सारख्या पुस्तकांचे लेखक, क्रीडाविषयक नियतकालिकांचे संपादक, चित्रपट- जाहिरातपटातील अभिनेते आणि क्रिकेटचे समालोचक अशा अनेक भूमिकांमध्ये लिलया वावरणारे सुनील गावस्कर यांच्याशी थेट संवाद साधण्याची, त्यांच्याकडून क्रिकेट विश्वातील मजेदार किस्से ऐकण्याची सुवर्णसंधी रसिकांना प्राप्त होणार आहे.
सप्तक नागपूर व छाया दीक्षित वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त वतीने ‘स्ट्रेट ड्राईव्ह’ हा सुनील गावस्कर यांच्याशी थेट संवादाचा कार्यक्रम शनिवार, ११ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.कविकुलगुरू कालिदास सभागृह, परसिस्टंट सिस्टीम, गायत्रीनगर येथे सायंकाळी ७ वाजता होणा-या या कार्यक्रमात सुप्रसिद्ध क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले हे सुनील गावस्कर यांच्याशी संवाद साधतील. मुळ क्रीडा पत्रकार असलेले सुनंदन लेले उत्कृष्ट क्रिकेट समीक्षकदेखील आहेत. त्यांचे ‘बारा गावचे पाणी’ हे दुर्मिळ आणि रंजक माहितीयुक्त पुस्तक प्रसिद्ध आहे.
हेही वाचा >>>वाशीम: शासन निर्णयाला बगल देत जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन; मुख्यालयी न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी सुरू
सप्तक व छाया दीक्षित फाउंडेशनने मागील अनेक वर्षांपासून रसिकांना अनेक दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी दिली आहे. त्याच शृंखलेतील हा आगळा-वेगळा कार्यक्रम आहे. सप्तकचे सभासद आणि निमंत्रित यांच्यासाठी हा कार्यक्रम खुला आहे, असे आयोजकांनी कळवले आहे.