नागपूर: राज्यात सकाळी महावितरणची विजेची शिखर मागणी २४ हजार ३०० मेगावॅट होती. त्यामुळे ९०० मेगावॅटचा तुटवडा निर्माण झाल्याने सकाळी ६ ते ७.३० वाजेदरम्यान जी १ ते जी ३ वर्गातील फिडरवर चक्राकार पद्धतीने भारनियमन झाले. करोनानंतर प्रथमच राज्यात पावसाळ्यात भारनियमन नोंदवले गेले.

राज्यात महावितरणने ५० ते ५५ टक्के वीज नुकसान असलेले फिडर जी १, ५५ ते ६० टक्के वीज हानी असलेले फिडर जी २, तर ६५ टक्केहून अधिक वीज हानी असलेले फिडर जी ३ वर्गात ठेवले आहे. राज्यात महावितरणची मागणी व पुरवठ्यात शुक्रवारी ८०० ते ९०० मेगावॅट तुटवडा झाल्यावर या जास्त हानी असलेल्या भागात शुक्रवारी सकाळी दीड तास भारनियमन करण्यात आले. मागणीच्या तुलनेत उपलब्ध विजेची तफावत वाढल्यास हे भारनियमन आणखी वाढण्याचा धोका आहे.

हेही वाचा >>>..तर व्यवसायावर गंडांतर! ‘महारेरा’ कायद्याअंतर्गत मालमत्ता दलालांना नोंदणी बंधनकारक

करोनानंतर प्रथमच महावितरणकडे सर्वाधिक मागणी नोंदवली जात आहे. त्यातच राज्यात देखभाल व दुरुस्तीसाठी बंद असलेले चार वीजनिर्मिती संच शुक्रवारी कार्यान्वित झाल्याने १,२०० मेगावॅट वीज उपलब्ध झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सुरू झालेल्या संचात अदानी ६२० मेगावॅट, जेएसडब्ल्यू २८० मेगावॅट, केंद्रीय युनिट १५० मेगावॅट, महानिर्मितीचे नाशिक येथील ११० मेगावॅट युनिटचा समावेश आहे. तर ४०० ते ५०० मेगावॅट युनिट पाॅवर एक्सचेंजमधूनही महावितरणला वीज उपलब्ध झाली. वाढती मागणी बघत अदानीच्या देखभाल- दुरूस्तीसाठी बंद असलेल्या ६२० मेगावॅट आणि कोराडीतील ६६० मेगावॅट या दोन वीज निर्मिती संचातूनही ६ ते ७ सप्टेंबरपासून वीज निर्मिती सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहे. या वृत्ताला महावितरणच्या मुंबईतील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर दुजोरा दिला.

Story img Loader