नागपूर : मागील १० वर्षात अनेक लोकोपयोगी योजना यशस्वीरित्या राबवल्या. त्यात मुद्रा ऋण योजनेचाही समावेश आहे. दहा वर्षात या योजनेतून ५२ कोटी लोकांना ३३ लाख कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले, असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सोमवारी नागपूर येथे सांगितले.

विकसित भारताच्या जडणघडणीत भारतीय महसूल सेवेची (आयआरएस) भूमिका महत्त्वाची असणार असे ते म्हणाले. नागपुरातील प्रत्यक्ष कर अकादमी (एनएडीटी) येथे भारतीय महसूल सेवेच्या ७७ व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा व सेवापूर्व प्रशिक्षणाच्या समारोपाच्या प्रसंगी चौधरी बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य प्रबोध सेठ, प्रधान महासंचालक संजय बहादूर, एनएडीटीचे महासंचालक पी. सेल्वगणेश तसेच अकादमीचे अतिरिक्त महासंचालक मुनीष कुमार, सीतारमप्पा कप्पट्टणवार, प्रशिक्षण संचालक प्रदीप एस प्रामुख्याने उपस्थित होते.

चौधरी म्हणाले, मागील १० वर्षात अनेक लोकोपयोगी योजना यशस्वीरित्या राबवल्या. ८ एप्रिलला मुद्रा योजनेला १० वर्षे पूर्ण झाली असून याअंतर्गत ५२ कोटी लोकांना ३३ लाख कोटी रुपये कर्ज वितरण करण्यात आले. यात ६८ टक्के लाभार्थी महिलांनी या कर्ज योजनेचा फायदा घेत आपला व्यवसाय उभारून आत्मनिर्भर झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतीय राजस्व सेवेतील अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे कर अनुपालन, महसूल चुकवेगिरीला आळा तसेच सहकारी संघवाद यांना चालना मिळाली आहे. करसंकलनाच्या कार्यामध्ये अधिक दक्षता आणि पारदर्शकता येण्यासाठी डाटा मायनिंग, ब्लॉकचेन, कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे प्रत्यक्ष कर संकलनाला एक नवे रूप मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रत्यक्ष कराचा वाटा ५० टक्के

देशातील एकूण करसंकलनामध्ये ५० टक्के वाटा हा प्रत्यक्ष कराचा असून गेल्या आर्थिक वर्षात ९ कोटी नागरिकांनी कर भरला आहे, असे याप्रसंगी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य प्रबोध सेठ यांनी सांगितले.

चोक्सीची अटक मोठे यश

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी व हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला दोन दिवसापूर्वी बेल्जियम पोलिसांनी केलेली अटक हे भारतीय तपास यंत्रणेचे मोठे यश आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी नागपूर येथे दिली. सीबीआई आणि ईडीच्या पाठपुराव्यानंतर बेल्जियम पोलिसांनी कारवाई केली. भारतीय तपास यंत्रणा त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्नशील आहे. ज्यांनी गरिबांचे पैसे लुटले ते त्यांना परत करावे लागेल, असेही ते म्हणाले.