आगामी लोकसभा निवडणुकीत वर्धा जिल्ह्याबाहेरील उमेदवार दिल्यास योग्य ठरणार नाही. स्थानिकच हवा, अशी भूमिका घेत जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना थेट आव्हानच दिले आहे. काँग्रेसतर्फे माजी पालकमंत्री सुनील केदार तर राष्ट्रवादीतर्फे माजी खासदार सुबोध मोहिते यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. या दोघांचे मनसुबे त्यांच्या मोर्चेबांधणीमुळे लपून राहिलेले नाही. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख व राजू तिमांडे, काँग्रेसचे प्रदेश पदाधिकारी शेखर शेंडे व ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल देवतारे यांनी आज पत्रकार परिषदेत भूमिका मांडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांना ‘माय मराठी’ची ॲलर्जी; मराठी दिनाच्या दिवशीच ‘मराठी’ भाषेची लख्तरे वेशीवर

प्रा. देशमुख म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीचे तीनही पक्ष मिळून लढणार असल्याचे स्पष्ट आहे. वाटाघाटीत वर्धा मतदारसंघ कोणत्याही पक्षास मिळू शकतो. मात्र, उमेदवार स्थानिकच हवा. शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यास आम्ही बांधील राहूच. शेंडे यांनीही स्थानिक नेत्यालाच प्राधान्य देण्याची बाब मांडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, ज्येष्ठ नेते सुधीर कोठारी तसेच काँग्रेसचे ईकराम हुसेन, राजेंद्र शर्मा, प्रमोद हिवाळे यांनीही स्थानिकच उमेदवार देण्याचा आग्रह धरला. प्रदेश पदाधिकारी चारुलता टोकस यांचेही आमच्या मागणीस समर्थन असल्याचे शेंडे यांनी नमूद केले. तीनही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हा मुद्दा लावून धरल्याने आघाडीच्या राजकारणात गटबाजी उफाळून येण्याची चिन्हे आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Local leaders of mahavikas aghadi wardha oppose giving candidates from outside district in the upcoming lok sabha elections pmd 64 dpj