पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध लाकूड आगारांमध्ये खरेदी
मंगेश राऊत, नागपूर</strong>
कोळसा खाणीच्या परिसरात कोळसा चोरी आणि त्यातून उद्भवणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळ्या नवीन नाहीत. मात्र, कालांतराने हा प्रकार आटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आले असताना गेल्या काही दिवसांपासून खापरखेडा, कन्हान, कामठी परिसरात आजही मोठय़ा प्रमाणात कोळसा चोरी सुरू असून तो खरेदी करण्यासाठी अवैध लाक डाचे आगार (टाल) आहेत. स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू असल्याची तक्रार आहे.
कोळसा खाण परिसरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारीवर आधारित ‘गैंग्स ऑफ वासेपूर’ हा चित्रपट गाजला. जवळपास असाच काहीसा प्रकार खापरखेडा व कन्हान परिसरात पाहायला मिळतो. खाणीतून कोळशाची चोरी करणे व तो बाजारात विकण्याचा गोरखधंदा या परिसरात फोफावला आहे. असे प्रकार करणाऱ्या अनेक टोळ्या निर्माण झाल्या आहेत. यातून गोळीबार, खुनाच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाण परिसरात दोन चोरांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्याने मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा परिसरातील कोळसा चोरी व अवैध कोळसा टाल यांचा प्रश्न ऐरणीवर आला. मात्र, स्थानिक पोलिसांकडून त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. उलट अशा धंद्यांकडे पोलीस अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
येथे होते चोरीच्या कोळशाची खरेदी
चोरीचा कोळसा खरेदी करणारे अनेकजण परिसरात आहेत. मात्र, खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रामुख्याने किल्ले कोलार परिसरात गुड्ड बंगाली याचे मोठे टाल असून येथे कोळसा खरेदी केला जातो. याशिवाय उमेश पानतावणे, अरविंद भोये हे चोरीचा कोळसा खरेदी करतात, अशी माहिती आहे.
‘‘कोळशाची चोरी व विक्री हा प्रकार नवीन नाही. मात्र, चोरीचा कोळसा विकत घेऊन त्याची बाजारात विक्री करणारे व अवैधपणे टाल चालवणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. तसेच कोळसा चोरांचा अहवाल तयार करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल. ’’– राकेश ओला, पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण.