देवेंद्र गावंडे
चांगले चकचकीत रस्ते, वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी मोक्याच्या जागी उड्डाण पूल, भव्य व्यापारी संकुले, सार्वजनिक उद्याने, उत्तम शहर वाहतूक व्यवस्था, पर्यावरणाचा समतोल राखणारी हिरवळ, या साऱ्या गोष्टी असलेल्या ठिकाणांना शहर म्हणायचे का, असा प्रश्न जर कुणाला केला तर लगेच त्याचे उत्तर होय येईल. त्याला कारणही तसेच आहे. उत्तम शहराची संकल्पना भौतिक विकासाला जोडण्याची सवय आता साऱ्यांच्या अंगवळणी पडली आहे. या सवयीच्या अंगाने विचार केला तर विदर्भात अनेक शहरे आहेत. प्रत्यक्षात या शहरांमधून थोडा जरी फेरफटका मारला तर ही शहरे नसून मोठी खेडी आहेत याची जाणीव अनेकांना होते. त्याला कारणही तसेच आहे. या कथित शहरात राहणाऱ्या नागरिकांना शहरभान नावाची संकल्पनाच फारशी ठाऊक नाही. हे भान स्वीकारावे असे बहुसंख्यांना वाटत नाही. मुळात प्रत्येक ठिकाणाची ओळख तेथील नागरिकांच्या वर्तणुकीशी जोडली गेलेली असते. यावरूनच एखाद्या ठिकाणाविषयीचे मत तयार होत असते. प्रत्येक ठिकाण अथवा शहराविषयी प्रत्येकाला येणारा अनुभव व्यक्तिसापेक्ष असला तरी सर्वसाधारण मत तयार व्हायला काही निरीक्षणे पुरेशी असतात, हेही तेवढेच खरे आहे. विदर्भातील शहरे या निकषावर तरी खरी उतरतात का? दुर्दैवाने या प्रश्नाचे उत्तर सुद्धा नकारार्थी येते. सार्वजनिक ठिकाणी सौजन्याने वागणे, नियम व कायदे पाळणे, नागरी आचारसंहितेचे पालन करणे, आतिथ्यशीलतेचा परिचय देणे, कुणी गैरकृत्य वा नियमभंग करत असेल तर त्याला अटकाव करत सजग नागरिकत्वाचे कर्तव्य बजावणे, शहरात वावरताना दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेणे, किंबहुना याबाबतीत कमालीची दक्षता बाळगणे, ही शहरभान असल्याची प्रमुख लक्षणे. विदर्भातील किती शहरात ही आढळतात? उपराजधानीत तरी या लक्षणांचा प्रभाव दिसतो का? असे प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारले की खरी उत्तरे मिळू लागतात. कायम नकारात्मक विचार करण्याचा हेतू यामागे नाही, पण असे भान बाळगणाऱ्यांची संख्या जोवर वाढणार नाही तोवर या शहरांना ‘शहरे’ म्हणता येणार नाही, हेही तितकेच खरे आहे. घरच्या कार्यक्रमांसाठी रस्त्यांवर मंडप उभारू नये ही तशी अगदीच साधी बाब. विदर्भातील कुठल्याही शहरात जा, हमखास या बाबीचे उल्लंघन होताना दिसते. मंडप टाकून रस्ता अडवल्याने अनेकांना त्रास होतो, वाहतूक विस्कळीत होते हे असे कृत्य करणाऱ्या प्रत्येकाला कळते. तरीही तो रस्ता अडवतोच. त्यांच्या घरातील मंगलकार्याचा इतरांनी का म्हणून त्रास सोसायचा, हा प्रश्नही त्याच्या गावी नसतो. मध्यंतरी उच्च न्यायालयाने यावर बंदी घातली. स्थानिक यंत्रणेला कारवाई करायला लावली. काही काळ लोटल्यानंतर पुन्हा हे मंडप सर्रास दिसू लागले आहेत. पश्चिम विदर्भात तर अनेक प्रमुख रस्त्यावर चार ते पाच दिवस असे मंडप उभे असतात. कुणी याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याला मूर्खात काढले जाते अथवा दमदाटी करून हाकलून लावले जाते. अनेक ठिकाणी तर या मंडपावरून दंगली झाल्याचा इतिहास आहे. उल्लेखनीय म्हणजे, सभागृह भाडय़ाने घेऊन मंगलकार्ये करण्याची ज्यांची ऐपत असते तेच लोक असे मंडप उभारून दांडगाईचा परिचय देत असतात. पाळीव जनावरे रस्त्यावर सोडून देणे हाही त्यातलाच एक प्रकार. कोणत्याही शहरात जा, अशी जनावरे अनेक प्रमुख रस्त्यावर हमखास दिसतात. यामुळे अपघात होऊन अनेकजण दगावले, पण या जनावरांच्या मालकांना वठणीवर आणण्याची हिंमत स्थानिक यंत्रणा दाखवत नाही व सुजाण नागरिकही याविरुद्ध संघटितपणे आवाज उठवत नाहीत. रस्त्यावर वाहने ‘पार्क’ करणे हा सुद्धा सर्रास व सर्वत्र आढळणारा प्रकार. कोटय़वधीचा बंगला बांधणारा सुद्धा वाहनतळासाठी रस्ताच गृहीत धरतो. त्याचे कुणालाही वावगे वाटत नाही. रस्त्यावर वाहने राहणारच, त्यातून मार्ग काढत प्रवास करायचा हेच आता अनेकांच्या अंगवळणी पडले आहे. कितीही मोठा भूखंड असला तरी त्यावर घर बांधताना थोडेतरी अतिक्रमण करणे ही आणखी एक वाईट सवय. ती अनेकांना जडली आहे. काही लोक अतिक्रमण करत नाहीत, पण कुंपणभिंतीच्या बाहेरच्या बाजूला झाडे लावून अतिक्रमण केल्याचे सुप्त आत्मीक समाधान मिळवून घेतात. अनेकांच्या मनात अशी भावना निर्माण होणे हेच गावंढळपणाचे लक्षण आहे. त्यामुळे अशी मनोवृत्ती बाळगणाऱ्यांची संख्या मोठी असलेल्या ठिकाणांना शहरे तरी कसे म्हणायचे? वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन हा प्रकार आता नियमभंगापुरता मर्यादित न राहता नागरिकांच्या मर्द व धाडशीपणाशी जोडला गेला आहे. पुरुषाने नियम तोडला तर ते मर्दपणाचे लक्षण व स्त्रियांनी नियमभंग केला तर ते धाडस अशीच समजूत अनेकांनी करून घेतली आहे. विद्यार्थ्यांना वाहून नेणारी वाहने तर नियम तोडण्यासाठीच रस्त्यावर येतात की काय, या शंकेला उत्तरोत्तर बळ मिळू लागले आहे. हा प्रवास उत्तम शहरीकरणाच्या दिशेने सुरू आहे असे कसे म्हणता येईल? एखादी गोष्ट करू नये, असे बजावले की हटकून ती करायची हा नागरिकांचा स्थायीभाव बनत चालला आहे. याची अनेक उदाहरणे ठिकठिकाणी आढळतात व सार्वजनिक ठिकाणे विद्रूप झालेली दिसतात. रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून न देणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना आतिथ्यशीलतेचा परिचय न देणे, अशी कितीतरी उदाहरणे या शहरांमध्ये रोज ठिकठिकाणी दिसतात. विकसित शहरांमधील नागरिकही प्रगल्भ व्हायला हवा हे कागदावरचे वाक्य कृतीत उतरताना दिसत नाही. अशा शहरांना ‘स्मार्ट’ तरी कसे म्हणायचे? सजग नागरिक हा कुठल्याही शहराचा आत्मा असतो. शहर विकासाच्या दृष्टीने जे काही प्रकल्प हाती घेतले जातात त्यावर लक्ष ठेवणे, त्यात कुठेही जनतेची फसवणूक होणार नाही याची काळजी घेणे, गैरव्यवहारांना थारा मिळणार नाही, याविषयी दक्ष असणे असे या नागरिकांकडून अपेक्षित असते. यामुळेच स्थानिक यंत्रणांवरचा दबाब कायम राहतो. प्रत्येक शहरात तुरळक गट, समूह अथवा संस्था वगळता अशा सजगांची संख्या वाढताना दिसत नाही. तरीही केवळ विकासाच्या मुद्यावर शहरांना शहरे म्हणण्याची चूक सातत्याने केली जात आहे. पालिका आहे, महापालिका आहे म्हणून एखाद्या ठिकाणाला कागदावर शहराचा दर्जा मिळणे वेगळे व प्रत्येक शहरात शहरभान विकसित होणे वेगळे, हा फरक किमान स्मार्ट सिटीच्या शासकीय खेळात सर्वानी समजून घेणे भाग आहे, अन्यथा ही शहरे नुसती खेडीच नाही तर खुजी वाटायला लागतील.
devendra.gawande@expressindia.com