चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. भाजपाने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली आहे, तर काँग्रेस पक्षात उमेदवारीचा घोळ अजूनही सुरूच आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार प्रतिभा धानोरकर की आमदार सुभाष धोटे, या तीन नावांची काँग्रेसमध्ये चर्चा आहे.
चंद्रपूर-वणी-आर्णी या ओबीसीबहुल लोकसभा क्षेत्रात भाजपाने सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मुनगंटीवार सध्या मुंबईत असले तरी त्यांनी विविध महोत्सव, कार्यक्रम व उपक्रमांच्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतली आहे. मात्र, काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी मोठा संघर्ष सुरू आहे.
हेही वाचा…‘निर्भय बनो’च्या प्रतिसादामुळे भाजपाचे धाबे दणाणले……
विजय वडेट्टीवार यांनी लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्त करताना सर्वप्रथम स्वत:चे नाव समोर केले. त्यानंतर कन्या, युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार हिचे नाव समोर केले. दुसरीकडे, दिवं. सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी नैसर्गिक न्यायाप्रमाणे मलाच उमेदवारी द्यावी, असा आग्रह काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे केला आहे, तर राजुराचे आमदार सुभाष धोटे यांचेही नाव काँग्रेसच्या यादीत आहे. यापैकी वडेट्टीवार यांना स्वत: निवडणुक लढण्याची इच्छा नाही, त्यामुळेच त्यांनी मुलगी शिवानी हिचे नाव समोर केले आहे.
शिवानीला उमेदवारी दिल्यास निवडून आणण्याची जबाबदारीही वडेट्टीवार यांनी घेतली आहे. मात्र, प्रदेश काँग्रेसने दिल्लीश्वरांकडे विजय वडेट्टीवार, प्रतिभा धानोरकर व सुभाष धोटे ही तीन नावे पाठविली आहेत. त्यामुळे काँग्रेसश्रेष्ठी उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात टाकतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा…नागपूर, रामटेकमध्ये भाजप-काँग्रेस थेट लढत….पण, काँग्रेसचे उमेदवारच ठरेना…..
काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत स्थानिक व ओबीसी उमेदवारच द्यावा, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे सांगितले. तसेच महाविकास आघाडीत सहभागी पक्षांनीही ओबीसी व स्थानिक मुद्दा लावून धरला आहे, तर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष व तैलिक महासंघाचे उपाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी काँग्रेसने चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून तेली समाजाचा उमेदवार द्यावा, अशी मागणी काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे. यासाठी विनायक बांगडे व प्रकाश देवतळे, अशी दोन नावेही सूचविली आहेत. यावरून काँग्रेसमध्ये कुणबी विरुद्ध तेली, असा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…नागपूर, रामटेकमध्ये भाजप-काँग्रेस थेट लढत….पण, काँग्रेसचे उमेदवारच ठरेना…..
भाजपाने मुनगंटीवार यांना उमेदवारी दिल्याने अखेरच्या क्षणी वडेट्टीवार माघार घेतील व धानोरकर यांनाच उमेदवारी मिळेल, अशीही चर्चा सुरू आहे. एकंदरीत, काँग्रेसला येत्या एक ते दोन दिवसात उमेदवार जाहीर करावा लागेल. प्रचाराला अतिशय कमी वेळ असल्याने काँग्रेसश्रेष्ठी लोकसभेची संधी कोणाला देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.