राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता
नागपूर : लोकसभा निवडणुकीत सातत्याने काँग्रेसला मताधिक्य देणाऱ्या उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात यावेळी मताधिक्य कायम राहावे म्हणून काँग्रेस कामाला लागली आहे. विशेष म्हणजे, युवक काँग्रेसने सुमारे २२ हजारांच्या संख्येत असलेल्या वयोवृद्धांच्या (८० वर्षे) मतदानावर लक्ष केंद्रित केले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे मताधिक्य कमी करण्यासाठी भाजपनेही कंबर कसली असून प्रचार मोहिमेचा वेग वाढवला आहे.
भाजपने नागपूर लोकसभेची निवडणूक सलग दोनदा जिंकली. मात्र, दोन्ही वेळी उत्तर नागपुरात काँग्रेसपेक्षा कमी मते मिळाली. मागच्यावेळी या मतदारसंघात काँग्रेसचे नाना पटोले यांना ९६,६९१ मते तर भाजपचे नितीन गडकरी यांना ८७,७८१ मते मिळाली होती. यावेळी मतांची ही दरी अधिक वाढावी म्हणून काँग्रेसने जोरदार प्रचार सुरू केला आहे. युवक काँग्रेसने तर सुमारे २२ हजारांहून अधिक मतदारसंख्या असलेल्या वयोवृद्ध म्हणजे ८० वर्षांपुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांची नोंदणीसाठी विशेष धडपड सुरू केली आहे. या मतदारांना या निवडणुकीत घरातूनच मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. त्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे ‘१२डी’ क्रमांकाचा अर्ज सादर करावा लागेल. त्या अर्जावर निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानासाठी तात्पुरत्या मतदान केंद्राची उभारणी संबंधितांच्या घरी केली जाणार आहे. पक्षाचे मताधिक्य वाढवण्यासाठी युवक काँग्रेसने या मतदारांवर लक्ष केंद्रित केल्याचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांनी सांगितले.
हा मतदारसंघ विधानसभेसाठी अनुसूचित जातीकरिता राखीव आहे. भाजपने या मतदारसंघात सामाजिक समरसता अभियान चालवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न गेल्या चार वर्षांपासून मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. तर दुसरीकडे काँग्रसचे मताधिक्य कायम ठेवण्यासाठी काँग्रेसचे नेते प्रयत्न करीत आहेत. उत्तर नागपूर हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. येथील अनुसूचित जाती, मुस्लीम आणि ओबीसी मतदारांवर काँग्रेस अधिक भर देत असल्याचे दिसून येत आहे.
२०१९ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसलाच मताधिक्य
मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत उत्तर नागपुरात काँग्रेसला ९६,६९१ मते मिळाली आणि भाजपला ८७,७८१ मते मिळाली. बसपाला ९,९५१, वंचित बहुजन आघाडीला ६५७३ मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत उत्तर नागपुरात काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. विधानसभेत काँग्रेस- ८६,८२१ मते, भाजप- ६६,१२७, बसपा- २३,३३३ आणि एमआयएमला ९,३१८ मते मिळाली होती.