नागपूर : ‘मोदीची गॅरंटी ’ हा माझ्यासाठी फक्त तीन शब्दांचा खेळ नाही तर ती पूर्ण करण्यासाठी लागणारी क्षणक्षणाची मेहनत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे शुक्रवारी आयोजित प्रचार सभेत केला. महाविकास आघाडी सरकारने विदर्भावर अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात नागपूरसह पाच लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असतानाच दुसरीकडे दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या नागपूरजवळच्या वर्धा आणि अमरावती या दोन मतदारसंघासाठी मोदी यांनी शुक्रवारी वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथे प्रचार सभा घेतली. त्यात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे विदर्भातील नेते उपस्थित होते.
हेही वाचा >>> Lok Sabha Elections 2024 : पूर्व विदर्भात ५७.८२ टक्के मतदानाची नोंद
मोदी म्हणाले, २०१४ पूर्वी सर्वत्र निराशेचे चित्र होते. मात्र आम्ही दहा वर्षांत देशातील २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, प्रत्येक गावात वीज पोहचवली, ४ कोटी गरीब कुटुंबांना घरे दिली. ५० कोटीपेक्षा अधिक लोकांची बँकेत खाती उघडली. ज्यांना या योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांना पुढच्या काळात मिळेल. ही मोदींची गॅरंटी आहे. हमी देण्यासाठी हिम्मत लागते. माझ्यासाठी हा शाब्दिक खेळ नाही तर प्रत्येक क्षणाची मेहनत आहे. भाजपने जाहीरनाम्यात तीन कोटी नवीन घरे, प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी, पाइपगॅस तसेच वृद्धांना निशुल्क आरोग्य सुविधा, वंदे भारत एक्स्पेस, बुलेट ट्रेन धावण्याचे स्वप्न पूर्ण होईल. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, नागपूर -गोवा एक्स्परेस हायवे, रेल्वे मार्गाचा विकास या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी नांदेड व नंतर परभणी येथे सभा होणार आहेत.
काँग्रेसवर टीका
काँग्रेसला मत देणे म्हणजे मत व्यर्थ गमावणे होय, निवडणुकीत पराभव दिसून येत असल्याने इंडियाचे नेते शिवराळ भाषा वापरत आहेत. त्यांनी अयोध्येतील रामंदिर लोकार्पणावर बहिष्कार घातला. त्यांना त्याच्या पापाचा हिशेब द्यावा लागेल, असे मोदी म्हणाले.