लोकसत्ता टीम
चंद्रपूर : मोठ मोठे होर्डींग, पोस्टर, बॅनर, प्रचार पत्रक तथा घर चलो अभियानाच्या माध्यमातून मतदारांच्या घरापर्यंत सर्व पक्षीय प्रचारक पोहचत असले तरी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच समाज माध्यमाचा अतिशय आक्रमकपणे प्रचारासाठी वापर केला जात आहे. त्यामुळे प्रत्येका पर्यंत पक्षीय उमेदवाराला पोहचणे सहज शक्य झाले आहे.
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात १९ एप्रिल रोजी मतदान आहे. प्रचाराला अतिशय कमी दिवस शिल्लक आहे. त्यात जिवती पासून तर आर्णी पर्यंत इतका मोठा हा मतदार संघ आहे. त्यामुळे प्रत्येक गावात मतदारांना पोहचणे शक्य नाही. अशा वेळी महायुतीचे उमेदवार तथा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी समाज माध्यमाचा अतिशय आक्रमक वापर सुरू केला आहे.
आणखी वाचा-बाळासाहेब ठाकरे आम्हाला सवंगडी समजायचे, ‘हे’ घरगडी समजत होते; एकनाथ शिंदे यांची टीका
मुनगंटीवार यांच्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तथा इतर नेते मंडळी प्रचार सभा घेत आहेत तर धानोरकर यांच्यासाठी प्रदेश प्रभारी चेन्नीथला, खासदार मुकूल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सभा घेतल्या. त्यानंतर या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांनी मोठ मोठे होर्डींग, सभा, संमेलनापाठोपाठ पोस्टर, बॅनर, प्रचार पत्रक तथा घर चलो अभियानाच्या माध्यमातून मतदारांच्या घरापर्यंत पोहचण्याचे काम सुरू केले आहे. चंद्रपूर वणी आर्णी या लोकसभा मतदार संघातील निवडणुकीचा विचार करता सोशल मीडियावर राजकीय पक्षांची सक्रियता बघायला मिळत आहे. मतदान जवळ आल्यानंतर सोशल मीडियावरील प्रचाराचा भडीमार अधिक वाढणार आहे.
विविध प्रकारचे फोटो, व्यंगचित्र, व्हिडीओच्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. मोबाईलच्या आधुनिक तंत्रज्ञानाने प्रचाराची जागा घेतल्याने केवळ एका क्लिकने लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याची सुविधा उमेदवारांना उपलब्ध झाली आहे. सोशल मिडीयावर प्रचारदूत म्हणून सक्रीय झाला आहे. पदयात्रा, मतदारांशी वैयक्तिक संपर्क, कान्याकोपऱ्यातील सभांचे महत्त्व आजसुद्धा कमी झालेले नाही. तथापि, त्याचबरोबर फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम यासारख्या माध्यमांतून लोकसभेच्या उमेदवारांचे समर्थक पोस्ट टाकले जात आहेत. लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर याला अधिक महत्व मिळाले आहे. उमेदवार समाज माध्यमातून मतदारांपर्यत सहज पोहचत आहेत. पक्षाचे तथा स्वत:चे विचार देखील मतदारांना सांगत आहेत. मुनगंटीवार यांनी स्वत:चा आवाज रेकॉर्ड करून मतदारांना आवाहन केले आहे.
आणखी वाचा-‘एमपीएससी’ परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच; मागासवर्गाकरिता नव्याने आरक्षणनिश्चिती
सोशल मीडिया हा आजकाल सर्वांच्याच ओळखीचा झाला आहे. त्यामुळे निवडणुकीत या आधुनिक तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. काळ बदलला आणि त्यानुसार आचारसंहितेचे नियम अधिक कडक झाले. साहजिकच प्रचाराचा कालावधी कमी झाला. पारंपरिक प्रचाराची जागा आता समाज माध्यमाने घेतली आहे. हायटेक प्रचाराचा नवा फंडा निडणुकीच्या कालावधीत सोशल मीडियावर प्रत्येक तिसरा मेसेज हा राजकीय पक्ष व कार्यकर्ते यांच्याशी निगडित आहे. लोकसभेच्या निवडणुकीत पारंपरिक प्रचार जवळपास लुप्त झाल्याचे दिसून येत आहे. काही प्रमाणात लोकनाट्य, पथनाट्याच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. मात्र सर्वाधिक प्रचाराचा जोर हा समाज माध्यमावर आहे.