बुलढाणा : बुलढाणा लोकसभा मतदारसंघ शिंदे गटाला अन उमेदवारी मावळते खासदार प्रतापराव जाधव यांना हे जवळपास ठरले आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीच्या अधिकृत घोषणेला मनसेमुळे विलंब होत असल्याचे वृत्त आहे. परिणामी हजारो खासदार समर्थकांची धाकधूक वाढली असतानाच आज रात्री उशिरा ही यादी घोषित होण्याची चिन्हे आहे.
हेही वाचा >>> चंद्रपूर : गारपिटीसह अवकाळीचा पिकांना फटका; हरभरा, मक्का, ज्वारी व मिरचीचे मोठे नुकसान
बुलढाण्यात उमेदवारी वरून शिंदे गट व भाजपात निर्माण झालेला तिढा सुटला आहे. सलग चौथ्यांदा जाधव यांचे ‘तिकीट’ पक्के असल्याचे चित्र असून त्यांनी मतदारसंघातील प्रमुख भाजप नेते, संघ परिवार राच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे. सोमवारी रात्री दिल्लीत आयोजित भाजपा कोअर समितीच्या बैठकीनंतर शिंदे गटाची किमान पहिली यादी जाहीर होईल अशी शक्यता होती. मात्र, मनसेच्या महायुतीतील व राज ठाकरेंच्या दिल्लीतील ‘एन्ट्री’ मूळे ही घोषणा लांबणीवर पडली. आज, मंगळवारी ही घोषणा होणार असताना महायुतीची दिल्लीत तातडीची बैठक बोलविण्यात आली आहे. या घडामोडीत संलग्न एका वरिष्ठ सूत्राने ही माहिती दिली. या बैठकीला हजर राहण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार हे रवाना होणार आहे. राजधानीतील युतीच्या बैठकीत नवीन मित्र मनसे सुद्धा सहभागी होत आहे. या बैठकीनंतर आज रात्री उशिरा किंवा फार झाले तर उदया सकाळी शिंदे गटाची यादी जाहीर होईल अशी शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील खासदार जाधव समर्थकांची धाकधूक वाढली असून त्यांना घोषणेची प्रतीक्षा लागली आहे. बुलढाणाच नव्हे शिंदे गटाच्या सर्वच खासदारांच्या मतदारसंघात हेच चित्र आहे.