संजय मोहिते, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बुलढाणा : बुलढाण्याची जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला; पण उमेदवार गुलदस्त्यात, असे मजेदार चित्र आहे. आपल्या प्रमुख शिलेदारांसह आज जिल्ह्यात दोन ठिकाणी जनसंवाद करूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वा अन्य नेत्यांनी उमेदवारी घोषित करण्याचे टाळले. यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीसह लाखो मतदारांमधील उमेदवारीचा संभ्रम कायम असल्याचे चित्र आहे.

मागील २२ व २३ फेब्रुवारीला उद्धव ठाकरेंचा जनसंवाद सभा कार्यक्रम पूर्ण झाला नव्हता. २२ फेब्रुवारीला त्यांनी चिखली, मोताळा आणि जळगाव जामोद येथे जंगी सभा घेतल्या. २३ ला सिंदखेडराजा व मेहकर येथील सभा, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनामुळे स्थगित करण्यात आल्या. त्या सभा आज घेऊन त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. यामुळे शिंदेगटाच्या तुलनेत त्यांनी प्रचारात आघाडी घेतली, वातावरण निर्मिती केली.

हेही वाचा >>> “विजय वडेट्टीवार यांनी स्वतः लोकसभा लढवावी, अन्यथा धानोरकर यांना संधी द्यावी,” काँग्रेस केंद्रीय समितीचा निर्णय

भाजपा व बंडखोर लक्ष्य

उद्धव ठाकरे यांनी आपल्या आजवरच्या पाच सभांमध्ये भाजपाला सर्वाधिक लक्ष्य केले. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी हल्ला चढविला. यात गुजरात, मागील विधानसभामधील करार भंग, भाजपाची धोरणे, यावर त्यांचा रोख राहिला. याखालोखाल बंडखोर खासदार, आमदारही त्यांचे लक्ष्य राहिले. आज २० मार्चच्या दौऱ्यातही हेच चित्र राहिले, अगदी मनसे, राज ठाकरेंची युती , दिल्ली दौरा यावर बोलण्याचे त्यांनी टाळले. इतर नेत्यानी कमी बोलून उद्धव ठाकरेंना जास्त वेळ द्यायचा, असे नियोजन होते.

हेही वाचा >>> “मोदींना रोखण्यासाठी विरोधकांकडून अफवांचा बाजार,” उपमुख्यमंत्री फडणवीस यांची टीका; म्हणाले, “षडयंत्रापासून…

मी दिलेला उमेदवार…

अगदी आचारसंहिता लागल्यावर, आजही बुलढाण्याचा उमेदवार कोण? यावर उद्धव ठाकरेंनी मौन बाळगले. मेहकरच्या सभेत त्यांनी ‘मी दिलेला उमेदवार निवडून द्याल ना?’ असा सवाल करीत भाषणाला पूर्णविराम दिला. यामुळे स्पर्धेत आघाडीवर असलेले संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर समर्थकांची निराशा झाली. आघाडीचे नेतेही बुचकळ्यात पडले तर शिवसैनिकासह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम कायम राहिला.

छुपी स्पर्धा कारणीभूत?

आघाडीची उमेदवारी मिळण्यासाठी असलेली छुपी स्पर्धा यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या नेत्या जयश्री शेळके, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले. यातून तुपकर यांनी माघार घेतली असली तरी जयश्री शेळकेंच्या आशा अजूनही पल्लवित असल्याची चर्चा आहे. बंडखोरीला मोठ्या प्रमाणात रसद मिळालेल्या बुलढाणा जिल्ह्यात खासदार प्रतापराव जाधव यांना काहीही करून पराभूत करणे ‘मातोश्री’चे लक्ष्य आहे. खासदार जाधवांसारख्या प्रबळ नेत्याला पाडण्याची ‘गॅरंटी’ असलेला अर्थात ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असलेला उमेदवार ठाकरेंना हवा आहे. यामुळे विलंब लागण्याच्या चर्चेत नक्कीच तथ्य आहे.