प्रश्न हा नाहीच की कथित पत्रकार प्रशांत कोरटकरवर कोणती कारवाई होते? प्रश्न हाही नाही की या गुन्ह्यातून कोरटकर निर्दोष सुटतो की दोषी ठरतो? त्याच्यावर गुन्हे दाखल झाल्याने आता कायद्याप्रमाणे जे व्हायचे ते होईल. प्रश्न हाच की याच्यात एवढी हिंमत आली कुठून? सत्तेच्या पाठबळावर आपण काहीही करू शकतो असा आत्मविश्वास आला कुठून? त्यासाठी त्याला खतपाणी घालणारे कोण होते? ज्यांनी हे केले त्यांना हा माणूस फारच सामान्य कुवतीचा हे लक्षात कसे आले नाही? आपण जातीयवादी मानसिकतेला पुरस्कृत करतोय हे कळले कसे नाही? मुळात कोरटकर ही व्यक्ती नाहीच. ती प्रवृत्ती आहे. सत्तेच्या भोवती घुटमळणारी. मग ती कुणाचीही असो. अशा प्रवृत्ती जन्म घेतातच. त्यांना वेळीच आवरण्याची सजगता दाखवावी लागते ती सत्तेचे सुकाणू सांभाळणाऱ्यांना. त्याकडे दुर्लक्ष झाले की कशी अडचण निर्माण होते ते यात दिसले.
मुळात हा कोरटकर कोण? पत्रकारिता करता करता तो सत्तेच्या वळचणीला नेमका लटकला कसा? त्याला लटकू का दिले गेले? याची उत्तरे शोधायला गेले की अवघे चित्रच स्पष्ट होते. पत्रकार नेहमी विरोधकांना जवळचे वाटायला हवेत. तो काळ गेला. काही मोजके अपवाद सोडले तर साऱ्यांनाच सत्तेजवळ जाण्याची घाई झालेली. २०१४ नंतरचा काळ लक्षात घेतला तर कोरटकर यातला आद्यपुरुष! सतत पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तुळात वावरणे, त्यांच्यासोबतची छायाचित्रे समाजमाध्यमावर टाकणे, राजकीय अस्थिरतेच्या काळात पुढे काय घडणार याची भविष्यवाणी करणे, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कुठे कुठे होणार आहेत याची चर्चा समाजमाध्यमावर करणे, असे नसते उद्योग या महाशयांनी केले.
पत्रकारितेला लाजवेल असे. अधिकाऱ्यांसोबतची नुसती छायाचित्रेच तो प्रसारित करायचा नाही तर त्यातले अनेकजण त्याच्या घरी पायधूळ झाडायचे. त्यात भारतीय पोलीस सेवेतले अधिक. या सेवेतील अधिकारी प्रतिमेच्या बाबतीत दक्ष असतात. कोणत्याही वादात पडायचे नाही याकडे त्यांचा कल. तरीही ते अधिकृतरित्या पत्रकारिता न करणाऱ्या कोरटकरला का गोंजारत होते? याचे उत्तर स्पष्ट आहे. त्याची सत्तेच्या वर्तुळात असलेली उठबस.ही व्यक्ती आपल्याशी असलेल्या संबंधांचा चक्क गैरफायदा घेतेय हे सत्तावर्तुळाला स्पष्टपणे दिसत होते तरीही त्याच्याशी संबंध तोडण्याची हिंमत तेव्हा का दाखवली गेली नाही? त्याला मोकळीक देण्यामागचे नेमके कारण काय? आता त्याला चिल्लर ठरवले जात असले तरी तो तेव्हाही तसाच होता हे लक्षात कसे आले नाही? आले असेल तर त्याकडे दुर्लक्ष का केले गेले? यामागे नेमका कुणाचा व कोणता स्वार्थ दडला होता? सार्वजनिक जीवनात वावरताना कुणीही येतो व छायाचित्र काढून घेतो. तो कोण? त्याचा नेमका हेतू काय? हे कसे ओळखणार हा राजकारण्यांचा नेहमीचा युक्तिवाद. काही अंशी तो खराही.
मात्र एखादा कोरटकर वारंवार हेच करून, नसलेले संबंध आहेत असे दाखवून त्याचा दुरुपयोग करत असेल तर काळजी घेण्याची जबाबदारी येते ती सत्ताधाऱ्यांवर. ती नेमकी का घेतली नाही? यामुळेच या कथिताला मोकळे रान मिळाले व तो सुसाट सुटला. इतका की तो सत्तांतराच्या काळात थेट गुवाहाटीला पोहोचला. तेही एक दिवस आधी. त्याच हॉटेलात जिथे शिंदेसेनेचे आमदार जाणार होते. त्याला तिथे नेमके कुणी पाठवले? तो नेमका कुणाचा हस्तक होता? यावर आता कुणीही स्पष्ट बोलणार नाही पण याची उत्तरे मात्र राजकीय वर्तुळात वावरणाऱ्या सर्वांना ठाऊक.
मधल्या काळात याच चिल्लर माणसाला पोलीस संरक्षण दिले गेले. ते नेमके कशासाठी? कसलीही पत्रकारिता न करणाऱ्या तरीही पत्रकार म्हणून मिरवणाऱ्या या व्यक्तीला नेमकी कुणापासून भीती होती? तसे नसेल तर कोणत्या आधारावर त्याला अंगरक्षक पुरवण्यात आला? राजकारण करताना समर्थक, विश्वासूंची फौज जवळ बाळगावी लागते. यात काही गैर नाही. प्रत्येक राजकारणी हे करतो. मात्र या फौजेतला नेमका कोण कसा याचेही आकलन राजकारण्यांनी करणे गरजेचे.
अनेकदा यातले काही कच्चे लिंबू असतात. अशांवर टाकलेला विश्वास दगाफटका देऊ शकतो याचेही भान बाळगणे आवश्यक. यात होणारी चूक किती महागात पडू शकते हे कोरटकरने दाखवून दिले. मुळात सामान्य कुवतीचे, थोडीशी लालसा निर्माण झाली की भ्रष्ट होणारे लोक सत्तेच्या वर्तुळात शिरले व त्यांना महत्त्व देणे सुरू झाले की काय होते हेही यातून दिसले. राजकारण करताना सल्लागार वा विश्वासाचे म्हणून काही बुद्धिमान लोक किमान अंतस्थ वर्तुळात तरी जवळ असावे अशी भूमिका घेणारे राजकारणी आता इतिहासजमा झाले. आता हुजरेगिरी करणारे साऱ्यांना हवे असतात. किमान खाजगी वर्तुळात तरी विरोधी मते ऐकून घेण्याची तयारी आजकालचे राजकारणी दाखवत नाहीत.
आम्ही जे काही करतो ते बरोबर असाच त्यांचा अट्टाहास असतो. त्यामुळे नि:ष्पक्ष भूमिका मांडणारे, योग्य सल्ला देणारे, वैचारिक जडणघडण असणारे कुणीही सत्तेच्या जवळ जाण्यास धजावत नाहीत. मग अशांची जागा कोरटकरसारखे ढोंगी भरून काढतात. हे तकलादू समर्थकपणाचे बिरुद जोवर तग धरून असते तोवर ठीक. एकदा का त्याला तडा गेला की सारेच उघडे पडतात. यातला दुसरा मुद्दा जातीयवादी मानसिकतेचा. अलीकडे राजकारणातील प्रत्येक कृतीला जातीच्या चष्म्यातून बघण्याची सवय साऱ्यांना लागलेली. त्याला बव्हंशी जबाबदार आहे ते राजकारणच. त्यामुळे अमूक एका जातीचा माणूस सत्तेत सहभागी झाला की त्याच्या जातीत जणू उत्साहाचे भरते येते. हा उत्साह अनेकदा अनावर होताना दिसतो.
अनेकदा तर त्याचे उन्मादात रूपांतर होते. ‘आवाज करायचा नाही. आमचा माणूस सत्तेत आहे’ ही भाषा येते ती यातून. अलीकडे राजकीय गुन्हेगारीमुळे गाजत असलेले बीड हे यातले उत्तम उदाहरण. तिथे थेट हत्या करण्यापर्यंत मजल गेली. पण इतर ठिकाणी धमकीचे प्रयोग नित्याचेच. या प्रकरणात हीच मानसिकता दिसली. हा जातीचा माज अनाठायी हे त्याच्या लक्षात आले नाही किंवा त्याच्यावर कृपादृष्टी ठेवणाऱ्यांनी ते कधी लक्षात आणून दिले नाही. त्यामुळे त्याची हिंमत वाढली.
अशा प्रकरणांमुळे हा जातीचा वणवा भराभर पसरतोय त्याचे काय? याला रोखणार कसे? एकदा जातीचे विष भिनले की ते लवकर निघत नाही. याची जाणीव राजकारण्यांना नाही काय? जातीचा अभिमान हवा, दुराभिमान नको असे सारेच म्हणतात पण प्रत्यक्षात अनेकांचे वर्तन तसे नसते. नेमका याचाच फायदा कोरटकरसारख्या प्रवृत्ती घेतात व त्यामुळे अवघे सत्तावर्तुळच अडचणीत येते. अशांना दूर ठेवायचे असेल तर राजधर्माचे पालन करण्यासोबतच सत्तेसमोर सर्व समान ही व्याख्या कृतीतूनही दिसायला हवी. तसे न केल्यास दुसरा कोरटकर उगवू शकतो.