देवेंद्र गावंडे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या गुलाबी रंगात न्हाऊन निघत असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात थोडे तरी राजकीय चातुर्य शिल्लक असेल तर त्यांनी येत्या निवडणुकीत विदर्भात जागा लढवण्याचा नाद सोडून देणेच उत्तम. ‘लाडकी बहीण’च्या निमित्ताने नागपुरात आलेल्या पवारांनी त्यांची यात्रा दोनचार ठिकाणी फिरवली व त्याला राज्यस्तरीय स्वरूप येईल याची काळजी तेवढी घेतली. या यात्रेला मिळालेला प्रतिसाद बघता हाच अर्थ त्यातून निघतो. यानिमित्ताने काटोल, अहेरी व मोर्शी या दोन मतदारसंघात ते फिरले. यातले काटोल सध्या थोरल्या पवारांसोबत असलेल्या अनिल देशमुखांचा बालेकिल्ला तर मोर्शीत दादांची साथ करणारे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार. यापैकी देशमुखांची स्थिती भक्कम तर भुयारांची अतिशय वाईट. या दोन्ही ठिकाणी दादांच्या पक्षाला विजय मिळणे महाकठीण. त्याशिवाय दादा पुसदला जाणार होते. तिथे सध्या महाविकास आघाडीचा दबदबा. परिणामी विजय अशक्य. त्यामुळे दादांनी श्रम व्यर्थ न जाऊ देणेच योग्य.

हेही वाचा >>> लोकजागर: वर्चस्ववाद व खच्चीकरण!

राष्ट्रवादीतील फुटीनंतर तशीही दादांची विदर्भातील अवस्था नाजूक म्हणावी अशीच. कायम सत्तेच्या भोवती घुटमळणारे प्रफुल्ल पटेल, धर्मरावबाबा आत्राम, राजेंद्र शिंगणे हेच मोठे चेहरे त्यांच्यासोबत गेलेले. या तिघांचीही सध्याची स्थिती वाईट. पटेलांना तर भंडारा गोंदियातून एकही जागा निवडून आणता येणे अवघड. ते दिल्ली व मुंबईत या दोन जिल्ह्यात प्रभाव असल्याचा आभास निर्माण करण्यात नेहमी यशस्वी होतात पण वास्तव तसे नसते. याची चुणूक अनेक निवडणुकांमधून दिसलेली. जमिनीवर काम करायचे नाही व हवेत गप्पा मारण्यात वेळ घालवायचा यामुळे त्यांच्यावर ही वेळ आलेली. गडचिरोलीवर मालकी हक्क सांगणारे धर्मरावबाबा यांचीही अवस्था तशीच. प्रत्येकवेळी मंत्रीपद मिळाले की ते वादग्रस्त ठरतात. याहीवेळी त्यांच्या कार्यशैलीवरून अनेक आरोप नुकतेच झालेले. त्यांच्या जिल्ह्यात ते विरुद्ध सर्व असेच सध्याचे चित्र. या सर्वमध्ये सर्वपक्षीयांसोबत त्यांची मुलगीही सामील झालेली. त्यामुळे यावेळी त्यांना विजय मिळवणे अवघड. त्यात उमेदवारीवरून त्यांच्या घरातच भांडणे सुरू झालेली. राजकारणात कधीतरी थांबावे लागते. हे ज्यांना जमते तो खरा नेता. आत्राम व देशमुख यांना हे यावेळी जमेल का? आता राहता राहिले दादांचे तिसरे शिलेदार राजेंद्र शिंगणे. ते पराभवाच्या भीतीने एवढे धास्तावलेत की कधीही थोरल्या साहेबांची तुतारी हाती धरू शकतात. अशा स्थितीत दादा विदर्भात कशाच्या बळावर लढतो म्हणतात? या भागात दादांची अशी नाजूक अवस्था झाली ती त्यांच्याच भूमिकेमुळे. मुळात एकत्रित राष्ट्रवादी हाच विदर्भातील सर्वात कमजोर पक्ष होता. स्थानिक पातळीवर प्रभाव ठेवून असणाऱ्या ठिकठिकाणच्या सुभेदारांना एकत्र करत याची निर्मिती झालेली. धोरण म्हणाल तर काँग्रेसचीच ‘फोटोकॉपी’. त्यातही फूट पडली. गेल्या लोकसभेत दादा विदर्भातील एकही जागा लढवू शकले नाहीत. एखादी मिळाली असती तरी त्यांचा पराभव निश्चित होता. त्यामुळे झाकली मूठ झाकलीच राहिली. ती तशीच ठेवायची असेल तर दादांनी या भागाकडे लक्ष केंद्रित न करता भाजपला साथ देणे केव्हाही उत्तम. प्राप्त परिस्थितीत हाच निर्णय त्यांच्यासाठी योग्य ठरू शकतो.

हेही वाचा >>> लोकजागर: चुकलेले ‘ठाकरे’!

आता त्यांच्या विदर्भाविषयीच्या भूमिकेसंदर्भात. ती कधीही या भागासाठी अनुकूल अशी नव्हतीच. निधी पळवणारे नेते अशी जी त्यांची प्रतिमा तयार झाली ती आजही कायम आहे. त्यांच्या वक्तव्यात विदर्भाविषयी आपलेपणाची भावनाच कधी जाणवत नाही. ‘तुमचा विदर्भ’ अशीच त्यांची सुरुवात असते. जणूकाही हा प्रदेश दुसऱ्या राज्यात आहे व तो चालवायला यांना दिला आहे. अगदी अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट. महाविकास आघाडीमध्ये हेच खाते सांभाळणारे दादा आर्थिक नियोजनाच्या बैठकीसाठी आले. त्यांनी पहिल्याच झटक्यात या भागाच्या निधीला कात्री लावली. साहजिकच माध्यमांनी त्यांना विचारले. त्यावरचे त्यांचे उत्तर प्रत्येक वैदर्भीयांच्या मनात चीड निर्माण होईल असेच होते. ते म्हणाले, विदर्भाचा राज्याच्या उत्पन्नातील वाटाच कमी आहे. त्यामुळे उत्पन्नाच्या तुलनेत निधी मिळणार. त्यात काहीही चुकीचे नाही. राजकीय आयुष्यातील बरीच वर्षे कायम उपमुख्यमंत्री राहिलेला माणूस असे कसे बोलू शकतो? हाच न्याय इतर प्रदेशांना लावायचा असेल तर मुंबईचे उत्पन्न जास्त म्हणून तिथे विकासावर जास्त खर्च व्हायला हवा. हे दादांना मान्य आहे का? वास्तवात मुंबईच्या तुलनेत कमी उत्पन्न असलेल्या पश्चिम महाराष्ट्रावर जास्त निधी खर्च होतो. हे वास्तव दादांना ठाऊक नाही काय? याच न्यायाने निधी वितरित करायचा असेल तर गडचिरोलीला शून्य निधी मिळायला हवा. कारण या जिल्ह्याचा उत्पन्न वाटा अगदीच नगण्य.

हेही वाचा >>> लोकजागर: पूजा खेडकर ते शुभम गुप्ता!

राज्यातील जे इतर मागास जिल्हे आहेत त्यांनाही निधी मिळायला नको. मग या जिल्ह्यांना प्रगत कसे करणार याचे उत्तर दादांकडे आहे का? एखादा धोरणकर्ता व्यक्ती असा युक्तिवाद कसा काय करू शकतो? दादांनी याआधीही निधी पळवापळवी करून विदर्भावर कायम अन्याय केलेला. या भागातील अधिकारी कामचुकार आहेत. कंत्राटदार वेळेत काम करत नाहीत. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होत नाहीत अशी तकलादू कारणे समोर करून निधी वळवण्याचे समर्थन करत राहायचे हे दादांकडून वारंवार घडले. कामचुकारपणा, कामातील दिरंगाई मोडीत काढण्याचे काम मंत्री व सरकार म्हणून आपले आहे हेच दादा या समर्थनाच्या नादात अनेकदा विसरून गेले. काँग्रेसच्या काळात वैदर्भीय नेते उदासीन होते. सामान्य लोकांना हा अन्याय लक्षात आला नाही तोवर ही लबाडी खपून गेली. आता दिवस पालटलेत. नेते व जनताही सजग झाली आहे. हे लक्षात न घेता अडीच वर्षांपूर्वी वरील विधान करणाऱ्या दादांना व त्यांच्या पक्षाला लोकांनी का म्हणून जवळ करायचे? एखाद्या प्रदेशात पक्षविस्तार करायचा असेल तर तेथील जनतेशी भावनिक जवळीक साधावी लागते. त्यासाठी प्रश्न समजून घ्यावे लागतात. वारंवार दौरे करावे लागतात. केवळ उद्घाटन, भूमिपूजन व यात्रेपुरते येऊन चालत नाही हे दादा कधी लक्षात घेणार? सध्या पुन्हा सत्ता मिळावी म्हणून जिथे तिथे माफी मागत सुटलेल्या दादांचा स्वभाव अशी उपरती होण्याचा नाही. त्यामुळे त्यांनी विदर्भातून सपशेल माघार घेऊन भाजपला मदत करणे केव्हाही उत्तम. आजही ते भाजपसोबत सत्तेत नसते तर त्यांनी सवयीप्रमाणे विदर्भाच्या निधीला कात्री लावलीच असती. भाजपची सूत्रे विदर्भातून हलतात व कात्री लावणे अंगाशी येऊ शकते याची जाणीव त्यांना आहे म्हणून ते मूळ स्वभावाला मुरड घालून शांत बसले आहेत. ही सत्तेची भागीदारी अशीच टिकवायची असेल तर दादांनी विदर्भाचा नाद सोडून देणे केव्हाही इष्ट! तेवढेच त्यांचे श्रम वाचतील व पक्षाचा निधीही खर्च होणार नाही. येत्या निवडणुकीत असे प्रसंगावधान दादा दाखवतील काय हा यातला कळीचा प्रश्न!

devendra.gawande@expressindia.com

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokjagar ajit pawar in poor condition in vidarbha after split in ncp zws