देवेंद्र गावंडे

उर्वरित महाराष्ट्रातील लोक विदर्भाविषयी आकस किंवा अढी मनात बाळगून असतात का? त्यांची टीका यातून जन्म घेते का? असला पूर्वग्रही दृष्टिकोन टीकेला जन्माला घालतो का? यासारखे अनेक प्रश्न सध्या वध्र्यातील साहित्य संमेलनाच्या कवित्वावरून उपस्थित झाले आहेत. हे संमेलन पार पडून आता तीन आठवडे झाले, पण वादविवाद थांबायला तयार नाहीत. टीकेचा चौफेर मारा सुरू आहे. या संमेलनाचे आयोजक मात्र शांत आहेत. तरीही या वादंगाची दखल घ्यावी लागते कारण प्रश्न विदर्भाच्या अस्मितेचा आहे. असे कोणतेही मोठे आयोजन असले की त्यात त्रुटी, कमतरता राहणारच. काही चांगल्या तर काही वाईट गोष्टी घडणारच. आयोजन कधीच परिपूर्ण व सर्वाना समाधानी करणारे असू शकत नाही. त्यामुळे ते संपताच वादाचे मोहोळ उठतेच. मात्र या संमेलनावरून टीका जरा अतिरेकी सूर गाठते आहे व त्याला विदर्भाविषयीच्या दुस्वासाची किनार आहे हे आता स्पष्ट होऊ लागलेय. केवळ गांधी, विनोबांचे वास्तव्य हा एकच निकष गृहीत धरून वध्र्यासारख्या लहान शहरात हे संमेलन भरवले गेले. त्यामुळे येणाऱ्या पाहुण्यांची थोडीफार गैरसोय होणार हे निश्चित होते. याकडे दुर्लक्ष करून अशी सोय हवी, तशी का नाही, कुणी विचारणारे नाही, कुणी मदत करणारे नाही, सोय करायची नव्हती तर बोलावलेच कशाला असे नानाविध प्रश्न विचारून निमंत्रितांनी आयोजकांना भंडावून सोडले. मुळात अशा संमेलनात जाणारे निमंत्रित सरबराई योग्य व्हावी यासाठी जातात की आपले विचार रसिकांपर्यंत पोहचावे या उद्देशाने हा यातला कळीचा मुद्दा.

याच निमंत्रितांमधील काही मोजके तर विनातक्रार सारी गैरसोय सहन करतात व विचार पोहचवणे महत्त्वाचे म्हणत परततात. मात्र काहींना अव्यव्यस्थेवर बोट ठेवण्याची सवय असते. आपण कुणीतरी फार मोठे साहित्यिक आहोत अशा अहंगडात ते वावरत असतात. यावेळी विदर्भात आलेल्या बाहेरच्या पाहुण्यांनी याच मानसिकतेतून टीकेचे आसूड ओढले. मराठवाडय़ातील उदगीरपेक्षा वर्धेची व्यवस्था कितीतरी उत्तम होती. तरीही टीका झाली, याचा अर्थ विदर्भद्वेष याला कारणीभूत ठरला असा काढला तर त्यात चूक काय? प्रकाशक व आयोजक यांच्यातील वाद दर संमेलनात ठरलेला. तो यावेळी जरा जास्तच अनुभवायला मिळाला. यातही आघाडीवर होते ते मुंबई, पुण्याचे प्रकाशक. विदर्भ व राज्याबाहेरून आलेल्या प्रकाशकांनी तक्रारीचा सूर लावला नाही. वर्धेत पुस्तकांची विक्री फारशी झाली नाही हे या वादामागील आणखी एक कारण. त्याला केवळ आयोजकांना जबाबदार ठरवून कसे चालेल? या दोघांमध्ये समन्वय राहावा म्हणून महामंडळावर प्रकाशकांचे दोन प्रतिनिधी घेतले जातात. हे दोघे यावेळी काय करत होते? प्रकाशकांच्या संघटनेचे प्रमुख अतकरे तर वध्र्यात आलेच नाहीत. खजिनदार असलेल्या सुनीताराजे पवार त्यांच्या पुस्तकदालनात व्यस्त होत्या. वादावर तोडगा काढण्याची जबाबदारी जशी आयोजकांची तशी या दोघांची नव्हती काय? हे मान्य की स्थानिक आयोजकांकडे राबणारे कार्यकर्ते कमी होते. त्यामुळे समस्या घेऊन फिरणाऱ्यांना योग्य मार्ग सांगणारा कुणी सापडायचा नाही. याचा अर्थ आलेल्या सर्वाचीच गैरसोय झाली असे नाही. शेवटी अशी संमेलने ही उत्सवी स्वरूपाची असतात. हे काही लग्नकार्य नव्हते जिथे प्रत्येकाच्या मानपानाची दखल घेतली जाईल. दुसरा मोठा वाद रंगला तो संमेलनाध्यक्षांच्या गोतावळय़ातून झालेल्या टीकेमुळे. यावेळचे अध्यक्ष चपळगावकर हे महनीय, चिंतनशील व्यक्तिमत्त्व आहे हे खरेच! ते काहीच बोलले नाहीत पण त्यांच्या गोतावळय़ातून सातत्याने टीकेचे आसूड ओढले गेले. मुळात हे चपळगावकरांच्या एकूण व्यक्तिमत्त्वालाच साजेसे नव्हते. त्यांनी या गोतावळय़ाला आवरायला हवे होते. प्रत्यक्षात ते मूकदर्शक बनून राहिले. अध्यक्षांच्याच घरातले लोक संमेलनावर टीका करून वाद निर्माण करत असल्याचा हा प्रसंग संमेलनाच्या इतिहासातील एकमेव म्हणून नोंदवला जाईल. खरे तर या अध्यक्षांना आजवरचे सारे संकेत झुगारून हॉटेलातील पाच कक्ष देण्यात आले. तिथे झालेले खानपानाचे हजारोचे देयक आयोजकांनी अदा केले. तरीही अध्यक्षांना जेवणासाठी कुणी विचारले नाही असा जाहीर टाहो हा गोतावळा फोडत राहिला.

राजकारणी व्यासपीठावर असताना अध्यक्षीय भाषण वाचणार नाही ही चपळगावकरांची भूमिका होती. त्याचा मान राखत त्यांचे भाषण दुसऱ्या सत्रात ठेवण्यात आले. त्याला अजिबात गर्दी झाली नाही. त्याला आयोजक काय करणार? त्यामुळे हा गोतावळा नाराज झाला. डॉ. अभंय बंगांच्या मुलाखतीला गर्दी होते व अध्यक्षीय भाषणाला होत नाही याचा अर्थ काय? लोकप्रिय कोण? या प्रश्नांची उत्तरे या गोतावळय़ाने आता शोधायला हवीत. कोणत्याही संमेलनात उद्घाटन व समारोप सोडला व कविकट्टा वगळला तर इतर कार्यक्रमांना फारशी गर्दी होत नाही. संमेलन कुठेही असो. हा अनुभव सार्वत्रिक. वरील दोन कार्यक्रमाला राजकारणी असतात म्हणून गर्दी होते यातही तथ्य आहेच. हे वास्तव गर्दी नव्हती म्हणणाऱ्या सारस्वतांनी समजून घ्यायला हवे. सामान्य रसिकांमधील साहित्याविषयी रुची कमी का होत चालली? त्याला आपण जबाबदार आहोत का? यावरही मंथन करायला हवे. नुसते आयोजकांवर खापर फोडून हा तिढा सुटणारा नाही.

याच संमेलनात फडणवीसांच्या कार्यक्रमाची वेळ अचानक बदलली. त्यानुसार ते वेळेवर वर्धेत आले पण मंडप रिकामा असल्याने कार्यक्रमस्थळी आले नाहीत. भाजपच्या कार्यकर्त्यांनी धावाधाव करून गर्दी जमवली, मगच ते व्यासपीठावर आले. गर्दीची अपेक्षा ठेवणारे साहित्यिक या युक्त्या खरोखर शिकून घेणार आहेत का? नाही ना! मग जेवढे लोक असतील त्यांच्यासमोर विचार मांडून मोकळे होणे केव्हाही उत्तम. संमेलनात राजकारण्यांचा वावर नकोच अशी भूमिका घेणाऱ्यांनी अध्यक्षपदच काय, संमेलनातील सहभागाचे निमंत्रण सुद्धा स्वीकारू नये. या उत्सवापासून दूर राहावे. तेही करायचे नाही व आल्यावर सन्मानाची अपेक्षाही करायची हे दोन्ही कसे चालेल? पोलिसांचा अतिरेक हा या संमेलनातील कळीचा मुद्दा ठरला. त्यांनी चपळगावकरांना ज्या पद्धतीने अडवले ते सर्वथा अयोग्य होते. हा अतिरेक आयोजकांना नीटपणे हाताळता आला नाही हे खरेच! मात्र जिथे राज्यकर्ते येणार तिथे पोलीस येणारच. यावेळी तर आम्ही दोन कोटी दिले याच थाटात राज्यकर्ते संमेलनस्थळी वावरत होते. त्यांच्यासमोर आयोजक व महामंडळाने अक्षरश: नांगी टाकल्याचे बघायला मिळाले. ही लाचारी भविष्यात वाढत जाणार हे निश्चित. अशा स्थितीत मग अपमानाला सामोरे जावे लागते ते साहित्यिकांना. त्यामुळे अशा ठिकाणी जायचे की नाही याचा विचार त्यांनाच करावा लागणार. इतर कोणत्याही संमेलनाप्रमाणेच हे संमेलन पार पडले. तरीही या निमित्ताने वैदर्भीयांवर दुगण्या झाडण्याचा आनंद अनेकांनी मिळवला. हे अन्यायकारक होते म्हणून हा प्रपंच!

Story img Loader