देवेंद्र गावंडे
परवा नागपुरात संविधान जागर परिषद झाली. डाव्या विचाराचा विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार या परिषदेचे आकर्षण होता. त्याला ऐकायला प्रचंड गर्दी उसळली होती. पंधरा हजारापेक्षा जास्त लोक क्रीडा संकुलात जमले होते. हा कार्यक्रम आयोजित केला होता बहुजन जागर मंचाने. यात सक्रिय असलेले सारे नेते काँग्रेसचे आहेत. नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, नरू जिचकार ही त्यातील प्रमुख नावे. या मंचाला काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांची साथ आहे. यावेळी पक्षाचे माजी मंत्री व अनुसूचित जाती जमाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत व्यासपीठावर होते. याआधी याच मंचाने ओबीसी परिषद घेतली होती. त्याला नाना पटोले, सुनील केदार यासारखे नेते हजर होते. हे सारे काँग्रेसचे, पण त्यांना पक्षाच्या नावावर कार्यक्रम घ्यावासा वाटत नाही. याचे कारण एकमेव. पक्ष संघटनेची सूत्रे मुत्तेमवार गटाकडे आहेत. पक्षाचे व्यासपीठ वापरायचे ठरवले तर सर्वाना बोलवावे लागणार, हा या नेत्यापुढचा एक पेच तर पक्षाचे नाव वापरल्यावर कन्हैय्याकुमारला कसे बोलावता येईल, हा दुसरा पेच. पक्षाचा पराभव होऊन पाच वर्षे पूर्ण होत आली, नव्या निवडणुका सुद्धा जवळ आल्या तरी विदर्भातील काँग्रेस अशी विखुरलेली आहे. ज्यांच्याजवळ असा मंच नाही ते अशांच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात किंवा मतभेदाचे दर्शन होईल अशी कृती करत राहतात. पराभव माणसाला मतभेद विसरायला लावतो असे म्हणतात. हे तत्त्व अजूनही विदर्भातील काँग्रेस नेत्यांना लागू होत नाही हेच सिद्ध करणाऱ्या या घटना आहेत. सुंभ जळला तरी या नेत्यांचा पीळ कायम आहे. कन्हैय्याकुमार कट्टर डाव्या विचाराचा युवक, हे डावे सत्ताविरोधाची तर्कशुद्ध मांडणी करण्यात वाक्बगार असतात. त्यामुळे त्यांची भाषणे मोहित करणारी असतात. त्यांना काँग्रेसच्या व्यासपीठावर कसे बोलावणार, असा प्रश्न आयोजकांपैकी काही उपस्थित करू शकतात. यात तथ्यही आहे. मात्र, या एकाच हेतूने कन्हैय्याकुमारला वेगळ्या व्यासपीठावर बोलवावे लागले हे खरे नाही. पक्षाची संघटना हाताशी नाही, ती नसताना सामोपचाराची भूमिका नेमकी कुणी घ्यायची? पुढाकार कोण घेणार? अशा प्रश्नात अडकण्यापेक्षा घ्या स्वतंत्र कार्यक्रम व वाढवा दबाव हाच हेतू या आयोजनामागे होता, हे उघड आहे. यात आयोजक चूक की संघटना ताब्यात असूनही एकजुटीसाठी प्रयत्न न करणारे नेते चूक, यात पडण्याचे काही कारण नाही. मात्र, विदर्भातील काँग्रेसचे नेते पराभवातून धडा घ्यायला अजिबात तयार नाहीत, हेच दर्शवणाऱ्या या घडामोडी आहेत. पक्षाच्या प्रदेशपातळीवरील नेत्यांनी या नेत्यांमधील दुही संपावी यासाठी अनेक प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश आले नाही. यामागील कारण स्पष्ट आहे. पक्षापेक्षा आपण मोठे आहोत, असा गंड अनेकांच्या मनात तयार झाला आहे. आपल्यावाचून पक्ष पुढे जाऊच शकत नाही, अशी किनार या गंडाला आहे. दीर्घकाळ राजकारणात राहिल्याने असा अहंम् येतो असे म्हणतात. मग तो असणारे नेते स्वबळाची ताकद तरी दाखवू शकतात का? याचेही उत्तर अनेकदा नाही येते. जिंकायचे ते पक्षाच्या सर्वोच्च नेत्याच्या बळावर आणि मुदलात नसलेल्या शक्तीचा गंड मात्र बाळगत राहायचा, असा या सर्व नेत्यांचा मामला आहे. खरे तर विरोधी पक्ष म्हणून काम करताना प्रचंड मेहनत घ्यावी लागते. विदर्भातील एकही नेता तशी घेताना दिसत नाही. मेहनतीसाठी ज्यांचे हात शिवशिवतात ते मग अशा वेगळ्या व्यासपीठाचा आधार घेत असतात. सत्तारूढ भाजपात अगदी उलट चित्र आहे. दोन-चार पराभवामुळे या पक्षाचे नेते, मंत्री जमिनीवर आले आहेत. या साऱ्यांनी दरबाराचा सपाटा लावला आहे. मंत्री बैठकांमध्ये व्यस्त आहेत. काँग्रेसमध्ये असे अप्रत्यक्षपणे आव्हान देणारे कार्यक्रम वगळगता सर्वत्र शांतता आहे. सध्याच्या सरकारला जनता आपोआप कंटाळेल व नाईलाजाने काँग्रसेकडे वळेल ही आशा बाळगून हे नेते पराभूताचे जीणे जगत आहेत. नुकत्याच पाच राज्यात झालेल्या भाजपच्या पराभवामुळे या नेत्यांच्या आशेला पालवी फुटली आहे. यापैकी मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा ही राज्ये तर विदर्भाला खेटून आहेत. त्यामुळे तेथील जनमताचा कौल विदर्भावर प्रभाव कसा टाकेल, याची गणिते जुळवण्यात ही मंडळी सध्या मशगूल आहेत. शेजारच्या राज्यातील भाजपच्या या पराभवामुळे काँग्रेसमधील अनेक पडीक नेत्यांच्या लढण्याविषयीच्या आकांक्षा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. दोन-चार वेळा पराभव झाला म्हणून काय झाले? आता बघा, राहुलच्या बळावर कसा निवडून येतो अशी भाषा या नेत्यांकडून ऐकायला मिळते. याचा परिणाम गटबाजी वाढण्यात होणार आहे हे सांगायला कुणाही भविष्यवेत्त्याची गरज नाही. पक्षाची स्थिती थोडी सुधारली की लगेच आपला जुना घोडा पागेतून बाहेर काढायचा, शर्यतीची तयारी करायची. घोडा म्हातारा झाला असा आक्षेप कुणी घेतलाच तर स्वत:च्याच तबेल्यातील नवा घोडा समोर करायचा. कोणत्याही स्थितीत दुसरा तबेला नको व घोडाही नको, अशी आग्रही भूमिका घ्यायची हीच मानसिकता विदर्भातील बहुतांश नेत्यांनी जोपासली आहे. प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते, त्यातील मुद्दे वेगळे असतात. समीकरणे नवी असतात. त्यामुळे कोणतीही निवडणूक गाफील राहून लढवली जाऊ शकत नाही हे तत्त्वच या नेत्यांना मान्य नाही. किमान पराभव तरी या नेत्यांना या तत्त्वाच्या जवळ नेईल ही आशाही फोल ठरली आहे. साधारणपणे पक्ष विरोधी बाकावर असला की नवे नेतृत्व उदयाला येते. विदर्भात तर त्याचीही वानवा आहे. ज्याच्यात क्षमता आहे त्यांना खडय़ासारखे दूर करायचे, धावण्याची क्षमता नसलेले घरातील घोडे पुढे करायचे यातच वैदर्भीय काँग्रेस पार गुरफटून गेली आहे. त्यामुळे या पक्षाला भाजपवरील टीकेसाठी कन्हैय्याकुमारचा आधार घ्यावा लागतो. ओबीसीचा लढा असेल तर अल्पेश ठाकूरला बोलवावे लागते. हे चित्र दुर्दैवी आहे. थेट मोदींना लक्ष्य करून भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या नाना पटोलेंनी प्रारंभी जिगर दाखवली. भंडारा एकहाती जिंकून दिले. गटबाजीचा विचार न करता प्रत्येक जिल्ह्य़ात जाऊन आक्रमक भाषणे दिली. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या जुन्या नेत्यांनी त्यांची चांगलीच कोंडी केली. आता तेही शांत झाल्यासारखे दिसतात. काहीच करू नका, भाजप चुकेल, गांधी घराणे मेहनत घेईल, जनता आपल्या बाजूने येईल व विजय दारात असेल, असा दुर्दम्य आशावाद बाळगणाऱ्या नेत्यांची ही वैदर्भीय काँग्रेस आहे.
devendra.gawande@expressindia.com