अगदी अलीकडची घटना. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथाला सध्या विभागवार आढावा बैठका घेत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोकण विभागाची बैठक बोरीवलीत आयोजित केलेली. तिथे पत्रपरिषदेची वेळ टळायला लागली तरी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा पत्ताच नाही. हजर असलेले झाडून सारे नेते त्यांना फोन करत आहेत. चेन्नीथाला नाना कुठे अशी विचारणा वारंवार करत आहेत पण प्रतिसाद नाही. अखेर त्यांच्या गैरहजेरीत पत्रपरिषद सुरू झाली. ती मध्यावर असताना धावतपळत नाना आले. राज्याचे प्रमुख पद सांभाळणाऱ्यांच्या मागे अनेक कामे असतात. एकाचवेळी हाताळावी लागणारी विविध व्यवधाने असतात. त्यामुळे वेळापत्रक पाळताना त्यांची तारांबळ उडू शकते हे मान्यच. मात्र नानांचे प्रकरण जरा वेगळे. त्याचा प्रचंड मनस्ताप सध्या या पक्षातील मोठ्यांपासून छोट्या नेत्यांपर्यंत, पदाधिकाऱ्यांना सहन करावा लागतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> लोकजागर: गडचिरोलीचे यश!

सामान्य कार्यकर्ते तर दूरच राहिले. राजकारणात वावरणाऱ्या प्रत्येक नेत्याची एक कार्यशैली असते. त्या पद्धतीने ते काम करत असतात. कुणाला सातत्याने लोकांमध्ये मिसळायला आवडते. कुणाला फार जनसंपर्क आवडत नाही. कुणी दरबारी राजकारणात रस घेत असतो तर कुणाला कायम प्रसिद्धीच्या झोतात राहायला आवडते. कार्यपद्धती वेगळ्या असल्या तरी अंतिमत: प्रत्येकाचे ध्येय एकच असते. ते म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवणे, पक्षविस्तार करणे व सत्ता हस्तगत करणे. यासाठी जनसामान्यांच्या सतत संपर्कात राहणे आलेच. याकरिता संवाद महत्त्वाचा. तो साधण्याचे सध्याचे माध्यम म्हणजे भ्रमणध्वनी. नेमके इथेच नानांचे घोडे पेंड खाते. त्यांचा फोन कायम बंद असतो. काही लोक म्हणतात की तो रात्री बाराला सुरू होतो व सकाळी पुन्हा बंद होतो. खरे खोटे नानांनाच ठाऊक पण ते फोनवर कधीच उपलब्ध नसतात ही चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या साऱ्यांचीच तक्रार. कुणीही हवसे, नवसे, गवसे नेत्यांना फोन करून भंडावून सोडतात. त्यात नाहक वेळ जातो. कामेही पूर्ण करता येत नाही हे समजण्यासारखे. अशावेळी तत्पर सहाय्यकांची फौज सोबत ठेवून या संवादाची वर्गवारी सहज करता येते. अनेक नेते हेच करतात. फोन बंद ठेवला तरी नंतर तो सुरू केल्यावर आलेल्या संदेशाला प्रतिसाद देतात. नाना यातले काहीही करताना दिसत नाहीत ही त्यांच्याच पक्षातील बहुसंख्यांची मुख्य तक्रार. आता मुद्दा उरतो सहाय्यकांचा. ही फौज नानांच्या दिमतीला आहे पण त्यातल्या बहुतेकांची कामगिरी दिव्य स्वरूपाची. संवादाचा धागा जोडणे तर दूरच पण त्यांच्या उद्धट उत्तराचा सामना पक्षातील प्रत्येकाला करावा लागतो. या सहाय्यकांचे अनेक किस्से पक्षाच्या वर्तुळात चर्चेत. मध्यंतरी नागपुरातील त्यांच्या एका सहाय्यकाला गांधीबागच्या व्यापाऱ्यांनी बडवून काढले. कारण काय तर कार्यक्रमासाठी तारीख देऊनही नाना हजर झाले नाहीत व यात तो सहाय्यक दोषी आढळला म्हणून.

हेही वाचा >>> लोकजागर: प्रिया फुकेंच्या निमित्ताने…

नाना नेमके कुठे आहेत? मुंबई, नागपूर, साकोली की आणखी कुठे? हे तरी आम्हाला सांगा आम्ही भेटायला येतो अशी आर्जवे राज्यभरातील पदाधिकारी या सहाय्यकांकडे करत असतात पण त्यांना अचूक माहिती मिळत नाही. संपर्काचे माध्यम कोणतेही असो, त्याचे जेवढे फायदे तेवढेच गैरफायदे. हे ठाऊक असूनही कुणीही नेता त्यातल्या फायद्याकडे बघून याचा वापर करतो. नाना त्यातही मागे. त्यांना गाठणे वा थेट संपर्क साधणे केवळ अशक्य अशी भावना पक्षातील सर्व स्तरात आहे ती त्यांच्या कार्यशैलीमुळे. गंमत म्हणजे हेच नाना स्वर्गीय विलासराव देशमुखांना गुरू मानतात. त्यांच्यामुळेच पक्षाचे आमदार होण्याची संधी मिळाली याचा आवर्जून उल्लेख ते प्रत्येक भाषणात करतात. मी त्यांचा शिष्य असे अभिमानाने सांगतात. मग शिष्य म्हणून गुरूच्या संपर्काचा गुण ते घ्यायला का तयार नाहीत? विलासराव राजकारणात सक्रिय असताना येणारा प्रत्येक फोन घ्यायचे. मग तो सामान्यांचा असो वा महनियांचा. अगदी मुख्यमंत्री असताना सुद्धा यात कधी खंड पडला नाही. त्यामुळे सर्वांना उपलब्ध अशी त्यांची प्रतिमा तयार झाली व त्याचा खूप फायदा पक्षाला झाला. त्यांच्या या चांगल्या गुणाची उचल नंतर अनेक नेत्यांनी केली. सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण. इतकेच काय राजकारणातील भीष्म पितामह अशी ओळख अलीकडे झालेले शरद पवार सुद्धा फोनवर उपलब्ध असतात. भाजपमध्ये तर देवेंद्र फडणवीस, सुधार मुनगंटीवार अशी अनेक नावे आहेत जे प्रतिसाद देतात. सत्तेत असूनही संपर्क कायम ठेवणारी ही मंडळी एकीकडे व नाना दुसरीकडे. सत्तेत नसून सुद्धा त्यांना संपर्क क्षेत्राबाहेर राहावेसे वाटते. विलासरावांच्या काळात काँग्रेस पक्ष ऐन भरात होता. सतत सत्तेत होता. आता तशी स्थिती नाही तरीही नाना हे धाडस कशाच्या बळावर करतात? अलीकडेच लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यात काँग्रेसला लक्षणीय यश मिळाले. त्यामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला.

आता विधानसभेसाठी इच्छुकांची प्रचंड गर्दी झालेली. या साऱ्यांना नानांना शोधण्यातच हजारो किलोमीटरची पायपीट करावी लागते. गाठणे तर दूरच. पक्षाला लोकसभेत मिळालेले यश आपल्यामुळेच, त्यामुळे संपर्काच्या बाहेर राहिलो तरी चालते असे नानांना वाटते काय? मुळात जे काही यश मिळाले ते सत्ताधाऱ्यांविरुद्ध असलेल्या रोषामुळे. तो निर्माण करण्यात नानांचा फार काही वाटा नाही. अल्पसंख्याकांची एकजूट व संविधानाचा मुद्दा काँग्रेसला फायद्याचा ठरला. यात नानांचे योगदान किती हा संशोधनाचा मुद्दा ठरावा. आता लाडकी बहीण व ओबीसींसाठी सरकारने सवलतीचा वर्षाव सुरू केल्यावर लोकसभेसारखी परिस्थिती राहील याविषयी शंका घेतली जाते. या पार्श्वभूमीवर नानांचे संपर्क क्षेत्राबाहेर असणे धोक्याची घंटा ठरू शकते. या पक्षातील अनेकांच्या मते नाना नशीबवान आहेत. ते अध्यक्ष झाले व पक्षासाठी परिस्थिती अनुकूल होत गेली. यात त्यांचा सहभाग फारसा नव्हताच तरीही ते यशाचे धनी झाले. फारसे सायास न करता असे वाट्याला येणे चांगलेच पण या टप्प्यावर तरी स्वत:त बदल घडवून आणत संपर्कात राहावे असे नानांना वाटत नसेल काय? आजच्या घडीला पक्षात नानांचे एकमेव ‘गॉडफादर’ आहेत ते राहुल गांधी. ते केवळ त्यांच्याच संपर्कात असतात इतर कुणाच्याही नाही असेही पक्षात गंमतीने बोलले जाते. पक्षातील अनेक बडे नेते नानांपासून स्वत:ला दूर ठेवतात. असे एकट्यानेच पक्षाचा गाडा ओढत असल्याचा भास निर्माण करणे अंगलट येऊ शकते याची जाणीव नानांना नसेल का? आता केवळ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणेच शिल्लक उरलेले अशाच अविर्भावात नाना सध्या आहेत. अशी स्वप्ने बघण्यात चूक नाही. मात्र त्यासाठी स्वत:त बदल घडवावे लागतात. अहोरात्र उपलब्ध, तेही सर्वांना, मोजक्यांना नाही, अशी प्रतिमा निर्माण करावी लागते. त्याची तयारी नाना दाखवतील का? की ‘नॉट रिचेबल’ हाच कित्ता ते गिरवत राहतील?

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokjagar article criticizing working style of congress maharashtra chief nana patole zws