प्रसंग तसा साधाच. प्रत्येक निवडणुकीत कुठे ना कुठे घडणारा. यावेळीही तो अनेक ठिकाणी घडतोय पण त्यातला अचलपूरचा महत्त्वाचा. भाजपने तिथे बच्चू कडूंच्या विरोधात प्रवीण तायडे या कार्यकर्त्याची उमेदवारी जाहीर केली. हे तायडे तसे पक्षवर्तुळात सक्रिय पण बाहेर फारसे परिचित नसलेले. त्यामुळे तेथील भाजपत मोठा असंतोष उफाळून आला. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत त्यांचा विरोध केला व बंडाची घोषणा केली. ती कदाचित प्रत्यक्षात येणारही नाही पण यावरून एक अंदाज सहज बांधता येतो तो म्हणजे कडू व भाजपत असलेले साटेलोटे. हे पहिल्यांदाच नजरेत आले असेही नाही. प्रारंभी अपक्ष नंतर प्रहारच्या माध्यमातून राजकारण करणारे कडू प्रत्येक निवडणुकीत विरोधातील उमेदवार स्वत:ला अनुकूल राहील याची काळजी घेतात. यासाठी आधी ते कुणाचे उंबरठे झिजवतात हे सर्वांना ठाऊक. गेली पाच वर्षे आधी आघाडी व नंतर महायुतीच्या सत्तेत राहून सारी फळे चाखून झाल्यावर आता ते ‘परिवर्तन महाशक्ती’च्या माध्यमातून स्वतंत्रपणे रिंगणात आहेत. हे आघाडीचे तिसरे अपत्य जन्माला घालण्याचे काम त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून केले याचे उत्तर राज्यातील सर्व राजकीय पंडितांना ठाऊक.

हेही वाचा >>> लोकजागर : घराणेशाहीच्या टीकेला ‘घरघर’

bjp preparing to implement haryana pattern in maharashtra
हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रात यशस्वी होणार ?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Maharashtra assembly elections 2024
इडीने छळले. सत्तेशी जुळले, धन फळफळले
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Amit Thackeray on Eknath Shinde
Amit Thackeray : “धनुष्यबाण आणि पक्षनाव घेऊन एकनाथ शिंदेंनी चूक केली”, शिवसेनेतील बंडखोरीवरील अमित ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत!

मुस्लीम व हिंदू समसमान असलेल्या अचलपुरातून युतीचे उमेदवार म्हणून निवडून येऊ शकत नाही याची उपरती त्यांना सत्तेचा फायदा घेऊन झाल्यावर झाली व त्यांनी हे आघाडीचे पिल्लू सोडले. या माध्यमातून फायदा करून घ्यायचा तर तो एकट्याचाच का, युतीचा का नाही असे म्हणत त्यांनी या आघाडीला राज्यस्तरीय स्वरूप दिले. यातून महाविकास आघाडीची मते खायची हा त्यांचा मुख्य अजेंडा! त्यासाठी त्यांनी आघाडी किंवा युतीत थारा न मिळू शकणाऱ्या काही असंतुष्ट आत्म्यांना गोळा केले. या परिवर्तनमध्ये असलेल्या सर्वांची राजकीय ताकद मर्यादित. काहींची तर त्यांच्या मतदारसंघापुरती. त्यामुळे यांची जी पहिली यादी जाहीर झाली त्यात दहाही नावे नव्हती. आता बंडखोरीचे लोण जसजसे पसरू लागेल तसे यांच्याकडे उमेदवार ‘पाठवले’ जातील. कुणाकडून हे वेगळे सांगायची गरज नाही. हरियाणात जे घडले तेच महाराष्ट्रात घडवून आणायचे यासाठी ज्या अदृश्य शक्ती सध्या कार्यरत आहेत त्यांच्या हातचे बाहुले म्हणजे ही आघाडी असे त्याचे वर्णन सोप्या शब्दात करता येईल. अचलपूरचा उमेदवार असा का दिला या भाजपच्या स्थानिक नेत्यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर वरच्या मजकुरात सामावलेले. प्रारंभीच्या काळात कडू असे नव्हते. राजकारणात सध्या दुर्मिळ झालेली निष्ठा व त्यागाचे उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. जनसामान्यांच्या प्रश्नांची कदर असलेला व त्यासाठी लढणारा नेता अशीच त्यांची ओळख होती. त्यात स्वार्थाचा लवलेशही नव्हता. आता कडू पार बदलले. पूर्ण १८० च्या कोनात. त्यांच्यातल्या प्रामाणिकपणावर राजकीय हव्यासाने मात केलेली. त्यामुळेच त्यांचा स्वतंत्र बाणा कधीचाच गळून पडला व आता ते कुणाच्या तरी हितासाठी काम करायला लागले. ही आघाडी त्याचे उत्तम उदाहरण.

हेही वाचा >>> लोकजागर: काँग्रेसचा वैरी काँग्रेस!

वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांचीही वाटचाल त्याच दिशेने. लोकसभेत त्यांचे पितळ पूर्णपणे उघडे पडले. धर्मनिरपेक्षता, संविधान वाचवा असे नारे एकीकडे द्यायचे. भाजपवर टीकेचे आसूड ओढायचे व दुसरीकडे त्यांनाच फायदा होईल असे राजकारण करायचे. महाराष्ट्रात सर्वांत आधी हा प्रयोग बसपने केला. त्यांची चलाखी उघड झाल्यावर सुज्ञ मतदारांनी मायावतींकडे पाठ फिरवली. अर्थात अजूनही त्यांना काही मते मिळतात पण ती सध्याच्या सत्ताधाऱ्यांना जिंकता येईल एवढी नसतात. बाहेरच्या राज्यातून येऊन मायावती असे प्रयोग करतात मग आपण का नाही असा विचार कदाचित आंबेडकरांनी केला असावा. म्हणूनच ते २०१७ नंतर पूर्ण बदलले. काँग्रेसप्रणीत आघाडीत जायचे असे सांगायचे व जाचक अटी ठेवून त्यातून सुटका झाली की मतविभाजनाचा खेळ मांडायचा हेच त्यांचे अलीकडचे धोरण. ते राबवण्यासाठी ते काय करतात हे राजकारणात सक्रिय असलेल्या व ते जवळून बघणाऱ्या साऱ्यांना ठाऊक. लोकसभेत त्यांना आघाडीला अपशकून घडवून आणायचा होता पण अकोला बुलढाणा वगळता इतर ठिकाणी त्यांचे मनसुबे यशस्वी ठरले नाहीत. लोकसभेत दुसऱ्या टप्प्याचे मतदान झाल्यावर लगेच मुंबईला परतलेल्या आंबेडकरांनी काँग्रेससोबत आघाडी करू असे विधान केले. दलित व मुस्लीम समाजाची एकगठ्ठा मते आघाडीकडे गेली हे लक्षात आल्याबरोबर. नंतर त्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. मग त्यांनी विधानसभेची तयारी सुरू केली. दलित, मुस्लीम व ओबीसी या आघाडीकडे वळलेल्या समूहांना कसे तोडता येईल यासाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू केलेत. लोकसभेत एमआयएमने त्यांना अकोल्यात पाठिंबा दिला होता. तरीही त्यांनी संभाजीनगरला उमेदवार उभा केला. त्याचा फटका इम्तीयाज जलीलांना बसला. यामुळे मुस्लीम वर्तुळात नाराजी होती. ती दूर करण्यासाठी व आघाडीची मते खेचण्यासाठी यावेळी त्यांनी भरपूर मुस्लीम उमेदवार दिले.

गेल्या दहा वर्षात राजकीयदृष्ट्या सजग झालेला व मतदान करताना धर्मनिरपेक्ष शक्तींना फायदा कसा पोहोचेल याचा काळजीपूर्वक विचार करणारा मुस्लीम समुदाय आंबेडकरांच्या या खेळीला भुलेल याची शक्यता कमीच. दलित मतांचा आधार ही एकेकाळी आंबेडकरांची मूळ शक्ती. लोकसभेत संविधान बदलाच्या धोक्यामुळे ती पूर्णपणे आघाडीच्या पाठीशी उभी राहिली. आता त्यांनाही चुचकारण्याचे प्रयत्न सुरू केलेत. मधल्या काळात बौद्ध संवाद यात्रा काढली. त्यातून भावनिक साद घातली गेली. गेल्या काही वर्षांपासून जातीचा उल्लेख करून उमेदवारी जाहीर करणारे आंबेडकर दलित अथवा बौद्धांना रिंगणात उतरवण्याविषयी फार विचार करायचे नाहीत. दलित सोबत आहेतच तेव्हा इतर जातींना वंचितशी जोडणे हाच त्यांचा कार्यक्रम असायचा. यावेळी त्यांनी दलित व बौद्ध या दोन्ही घटकांना उमेदवारीत प्राधान्य दिले. त्याचे एकमेव कारण म्हणजे आघाडीकडे वळलेला हा मतदार वंचितकडे खेचून आणणे व त्याचा फायदा युतीला होणे. त्यांच्या या खेळीला हा मतदार भुलतो काय हा औत्स्युक्याचा विषय. अलीकडे त्यांनी दलित व पुरोगामी साहित्यिकांच्या घरासमोर निदर्शने केली. कारण काय तर त्यांनी इंडिया आघाडीला पाठिंबा दिला. गेल्या आठवड्यात त्यांनी याच कारणावरून योगेंद्र यादवांना लक्ष्य केले. वंचितची ही झुंडशाही दलितवर्गाला अजिबात आवडलेली नाही. त्यावरून उमटलेल्या प्रतिक्रिया हेच दर्शवतात. याची जाणीव आंबेडकरांना नसेल का? असेल तर ते का असे सुडाने पेटल्यासारखे वागताहेत? अपयश पदरी पडले की माणूस चिडचिडा होतो. तसे काही त्यांच्या बाबतीत झाले असेल का? याच काळात त्यांनी ओबीसींना साद घालण्याचा प्रयत्न केला पण तो फार यशस्वी झाला नाही. एकूणच महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यासाठी कडू व आंबेडकर आता पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. त्यांना कितपत यश येते हे निकालानंतर कळेल!

devendra.gawande@expressindia.com