देवेंद्र गावंडे
आता बस्स झाले. केवळ राज्यच नाही तर देशभर नागपूरची बदनामी करणाऱ्या या पावसाला धडा शिकवायलाच हवा. काय गरज होती त्याला अवघ्या दोन तासात बदाबदा कोसळण्याची. इतक्या घाईने पडायचेच होते तर विरोधकांच्या राज्यातील एखादे शहर निवडायचे. जवळचे हैदराबाद चालले असते. तिथे देशद्रोहींची संख्या जास्त म्हणून निसर्ग कोपला असे म्हणता तरी आले असते. अतिशय वेगाने विकसित झालेले नागपूर हे जगावर अधिराज्य व देशात सत्ता गाजवणाऱ्या परिवाराचे मातृशहर. त्याला विद्रूप करणे म्हणजे पाप, याची जाणीव का नाही ठेवली या पावसाने. बरसायचेच होते तर हळुवार तरी बरसावे ना! तिथेही घाई? म्हणूनच हा बदनामीचा मोठा कट असून पाऊसही त्यात सामील झालेला दिसतो. कदाचित विरोधकांच्या गोटात सामील झाल्यामुळेच त्याने हे राष्ट्रविरोधी कृत्य केले असावे. बरे, पडला जोरात तर किमान वाहून जाताना पाण्याचा वेग तरी नियंत्रणात ठेवायचा ना! तिथेही घाई. इतकी की सारे रस्ते, पूल उखडून नेले. तेही उच्चभ्रूंची वस्ती असलेल्या प्रगत भागातले.
या शहरातील सिमेंट रस्त्यांच्या आजूबाजूला लागलेले गट्टू हे राष्ट्रीय अस्मितेचे प्रतीक असल्याची तरी जाण ठेवायला हवी होती. या गट्टूंचे ढिगारे रस्त्यावर साचल्यामुळे देशभर नाचक्की झाली त्याचे काय? यातून या शहरातील मोठ्या नेत्यांचा प्रतिमाभंग झाला, त्यांना नाहक टीकेला सामोरे जावे लागले त्याचे काय? हे नुकसान काय आभाळातून भरून देणार का हा पाऊस? २०१४ नंतर कधी नव्हे एवढा विकास झाला या शहराचा. चालणाऱ्यांना स्वत:चे प्रतिबिंब बघता येईल असे चकचकित सिमेंटचे रस्ते, कडक उन्हात थंडगार झुळूक देणारी मेट्रो, नव्या संस्था, नव्या इमारती, सारे काही दिसणारे, तेही मोहक. हा विकास बघून येथे येणाऱ्या प्रत्येकाला असूया निर्माण व्हायची. त्यात विरोधकांचीच संख्या भरपूर. या विकासावरून मनातल्या मनात जळणारे हे लोक आजवर शांत होते. या एका अतिवृष्टीने साऱ्यांच्या तोंडाची कुलपे उघडली. त्यामुळे आता या वृष्टीदात्याला वठणीवर आणायलाच हवे. विकासाचे हे प्रारूप राबवताना पाणी वाहून नेणारी यंत्रणा विकसित करायला येथील नेते विसरले. यात त्यांचा तरी काय दोष? एक तर ही यंत्रणा निर्माण करणे तसे जिकरीचे काम. त्यासाठी भरपूर खोदकाम करावे लागते. तसे केले की सामान्य माणूस आणखी त्रासतो. ते होऊ नये म्हणून थेट उंचच उंच रस्ते केले तर त्यात चूक काय? तसेही या पाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तयार झाल्या की झाकून ठेवाव्या लागतात. म्हणजे काम केले तरी ते दिसत नाही. असा विकास आता केव्हाच बाद झालाय याची कल्पना निदान पावसाने तरी ठेवायला हवी ना! ते नतद्रष्ट इंग्रज. त्यांनी १९३९ मध्ये या शहरात सांडपाणी वाहून नेणारी यंत्रणा उभारली. त्यांच्या शहर विकासाच्या कल्पना आता जुनाट झालेल्या. त्यामुळेच आताचे दूरदर्शी नेते ही यंत्रणा उभारण्याच्या भानगडीत पडले नाहीत. त्यामुळे पावसाने या नेत्यांच्या दूरदृष्टीवरच घाला घालणे योग्य कसे ठरवता येईल? नाही म्हणायला मध्ये मध्ये या नेत्यांकडून या यंत्रणेसाठी इतके कोटी अशी घोषणा होत असते. मात्र ती हवेत विरण्यासाठीच. या शहराचे नेते इतके मोठे की नालीकामांचे भूमिपूजन व उद्घाटन त्यांना न शोभणारे. त्यापेक्षा रस्ते परवडले. त्यावरून जाणाऱ्या लाखो नागरिकांना रोज विकासाची अनुभूती देणारे. नालीचे तसे नाही. त्यातून एरवी घाण व कधी कधी पावसाचे पाणी वाहते. या कधीकधीसाठी उगीच पैसा व वेळ कशाला खर्च करायचा असा सोयीस्कर विचार नेत्यांनी केला तर बिघडले कुठे? किमान या पार्श्वभूमीचा विचार तरी पावसाने करायला नको का?
एरवी निरुपद्रवी भासणारी नागनदी या पावसामुळेच चर्चेत आली. नाही म्हणायला शहरातले एक नेते अधूनमधून या नदीची आठवण काढत असतात. बदके व बोटी तरंगण्याची स्वप्ने सांगत असतात. मात्र त्यावरचे अतिक्रमण काढायला कुणी धजावत नाही. नाहक लोकांना कशाला दुखवायचे असा उदार दृष्टिकोन त्यामागे असतो. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी इतके दक्ष असलेले नेते शहरात आहेत याचे भान पावसाने ठेवायलाच हवे होते. ते ठेवले नाही याचा अर्थ शहराला बदनाम करण्याच्या आंतरराष्ट्रीय कटात पाऊस सामील झाला असा होतो. त्यामुळे आता या अतिवृष्टीची नाही तर पावसाचीच चौकशी झाली पाहिजे. सिमेंट हा सध्याच्या राजकीय नेत्यांचा श्वास आणि ध्यास. जगभरातील यच्चयावत सर्व देश भलेही रस्त्यासाठी सिमेंट न वापरोत. भारतीय नेते मात्र त्याच्या प्रेमात. त्यात नागपूरचेही आले. सिमेंटचे रस्ते ही प्रगतीची नवी व्याख्या हे किमान पावसाने तरी ध्यानात घ्यायला हवे होते. या रस्त्यांमुळे पाण्याचा निचरा होत नाही, ते साचते व घराघरात शिरते हे आधुनिक वास्तव लक्षात घेऊन पावसाने पडायला हवे. सारे जग बदलले पण पावसाचे पडणे जुनेच, हे कितीकाळ सहन करायचे? त्यामुळे आता या शहरासाठी तरी पावसाने त्याच्या येण्याची पद्धत बदलावी.
सध्याचा काळ सत्ताधाऱ्यांकडून साऱ्यांना नियंत्रणात ठेवण्याचा. काहींचा अपवाद सोडला तर भूतलावरच्या साऱ्यांनी ते निमूटपणे स्वीकारले. त्यामुळे अशी शंका आहे की याच उपटसुंभांना हाताशी धरून अथवा हातमिळवणी करून पावसाने धुमाकूळ घातला असावा. परिणामी, आता आमचे नेते भूतलासोबतच आकाशावर कसे नियंत्रण मिळवता येईल हे शोधण्यात सध्या व्यस्त झालेत. तसेही सध्या नवनव्या संशोधकांची फौजच जन्माला येत आहे. या नवउद्यमींच्या हाताला काहीतरी काम हवेच ना! आता या सर्वांना पाऊस कसा नियंत्रित करता येईल याच्या संशोधनाचे काम देण्यात यावे. एकदा का हे झाले की मग पावसाला कोणत्याही कटात सामील होण्याची संधीच मिळणार नाही. नेत्यांची बदनामी तर दूरची बात. निसर्गासमोर कुणाचे काही चालत नाही हे वास्तव सुद्धा आता कालबाह्य ठरलेले. सत्तेची अमर्याद ताकद निसर्गप्रकोपाला सहज काबूत ठेवू शकते एवढा विश्वास गेल्या नऊ वर्षात नेत्यांनी अगदी सहज आत्मसात केलाय. पाऊस हा तर या निसर्गाचा एक लघुत्तम घटक. त्यामुळे लवकरच त्याला वठणीवर आणण्याचे महान कार्य नेत्यांकडून घडेल याची खात्री नागपूरकरांना आहे. म्हणूनच आता जे काही नुकसान झाले त्याचा अजिबात त्रागा करून घेऊ नका, रोष तर व्यक्त करूच नका. राष्ट्रहितासाठी ही हानी सहन करू अशी भूमिका घ्या व मिळेल ती मदत स्वीकारून गप्प बसा. यापुढे या शहरावर असे संकट येणार नाही याची ग्वाही नेत्यांकडून लवकरच मिळेल व पावसाचा कायमचा बंदोबस्त केला जाईल याची खात्री बाळगा. त्यातच विकसित नागपूरचे भविष्य दडले आहे.