गेल्या अनेक दशकांपासून नक्षलवादाने ग्रस्त असलेल्या गडचिरोलीत सध्या रोज एक पत्रपरिषद सुरू आहे. एटापल्ली, भामरागड या दुर्गम तालुक्यातील आदिवासी समूहाने येताहेत व वर्ष-दीड वर्षापूर्वी झालेल्या छळाच्या, फसवणुकीच्या तक्रारी त्यातून मांडताहेत. याच लोकांवरील सततच्या अन्यायामुळे जिल्ह्यात नक्षलवाद फोफावला. तो दूर करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तत्पर व्हावी म्हणून अनेक निर्णय सरकारने घेतले. खास भामरागडसाठी आदिवासी विकास खात्याचा प्रकल्प विभाग, एटापल्लीत उपविभागीय अधिकाऱ्याची नेमणूक हे त्यातून निर्माण झालेले. उद्देश काय तर आदिवासींनी समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडे यावे, नक्षलींकडे जाऊ नये. तो किती असफल झाला याची साक्ष सध्या या पत्रपरिषदा देत आहेत. त्याला कारण ठरलेत भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी शुभम गुप्ता. यांनी तेथे कार्यरत असताना केलेल्या गैरव्यवहाराची, सामान्यांना दिलेल्या त्रासाची रोज नवी प्रकरणे समोर येताहेत. या साऱ्या घटना दीड वर्षापूर्वीच्या. त्याला वाचा फुटली आता. तीही ते एका प्रकरणात दोषी आढळले म्हणून. त्यांच्या तक्रारी करणारे आदिवासी आजवर शांत होते. त्यांना धीर मिळाला तो या दोषसिद्धीमुळे. इतर कोणताही अधिकारी असता तर आदिवासी व या भागातील संघटना तेव्हाच ओरडल्या असत्या पण गुप्ता पडले सनदी अधिकारी. या सेवेचा समाजातील मान व वलयही मोठे. त्यामुळे सारे काही सहन करत आदिवासी शांत राहिले. या सेवेत येऊन दादागिरी करणाऱ्या, आम्ही राजे आहोत अशा थाटात वागणाऱ्या अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावी अशीच ही बाब.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा