देवेंद्र गावंडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अजूनही तो दिवस लख्ख आठवतो. मूळचा गट्टा परिसरातील एका गावात राहणारा व पुणे विद्यापीठात शिक्षण घेणारा एक तरुण घाबरलेल्या आवाजात फोन करतो. ‘सर, पांडूला पोलिसांनी पकडले. नक्षली असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवलाय पण तो तसा नाही. मी व तो एकाच आश्रमशाळेत शिकलो. त्याच्यासाठी काहीतरी करा. पोलिसांशी बोला.’ संवाद संपताच चौकशीचे चक्र सुरू होते. अनेक अधिकाऱ्यांशी बोलणे होते. त्यातून मिळणारी माहिती धक्कादायक व संबंधित तरुणाचा दावा फोल ठरवणारी असते. बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन गावी परतलेला पांडू नक्षलींच्या प्रभावात आलेला असतो. त्यांच्यासाठी काम करत असतो. दिल्लीत नक्षलींसाठी काम करणाऱ्या हेम मिश्राला जंगलात घेऊन जाण्यासाठी अहेरी बसस्थानकावर आलेल्या पांडूला मिश्रासोबत असतानाच पोलिसांनी रंगेहाथ पकडलेले असते. मिश्रा वरिष्ठ नक्षली नर्मदाक्काला भेटण्यासाठी आलेला असतो व त्याच्याकडून बरेच स्फोटक साहित्य जप्त केले जाते. पांडूची भूमिका यात केवळ वाटाड्याची असते पण अधिक चौकशीसाठी तो अटकेत हवा असे पोलिसांचे म्हणणे असते. हा सारा घटनाक्रम २०१३ सालचा.

एका विद्यार्थ्याच्या थेट रदबदलीमुळे लक्षात राहिलेला पांडू नरोटे नुकताच मेला. नागपूरच्या कारागृहात असताना स्वाईन फ्लूने त्याचा बळी घेतला. त्याला, हेम मिश्रा व नक्षलींचा देशभरातील समन्वयक साईबाबाला २०१७ मध्ये शिक्षा सुनावण्यात आली. साईबाबाला जन्मठेप तर या दोघांना दहा वर्षांची सक्तमजुरी. पांडू तब्येतीने ठीक राहिला असता तर पुढील वर्षी तुरुंगातून बाहेर आला असता. मात्र त्याच्या नशिबात स्वातंत्र्याचा प्रकाश बघणे नव्हतेच. पांडूसाठी शब्द टाकणारा व पुण्यात एका भाषणादरम्यान ओळखीचा झालेला तो विद्यार्थी आता कुठे आहे ते ठाऊक नाही पण गट्टाजवळील मुरेवाडा गावचा पांडू कायम लक्षात राहील. त्याची कारणेही अनेक. गेल्या चाळीस वर्षांपासून गडचिरोलीत पाय रोवून असलेल्या नक्षलींनी तेथील अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. पांडू त्यापैकी एक. तो पोलिसांना सापडला नसता तर कदाचित आता हाती बंदूक घेऊन जंगलात वावरत राहिला असता. काही महिन्यापूर्वीच अटकेत असताना कर्करोगाने निधन झालेल्या नर्मदाक्कासाठी पांडूचे गाव हक्काचे. सूरजागड पहाडाच्या खालच्या भागात असलेले हे खेडे लपण्याच्या दृष्टीने अगदी सुरक्षित. येथेच या दोघांची ओळख झाली. शिकलेला व शहरे माहिती असलेला पांडू कुरियरचे काम चांगले करू शकेल हे अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या नर्मदाच्या लवकर लक्षात आले व त्याच्यावर कामगिरी सोपवणे सुरू झाले. जंगल व शहरांमध्ये सक्रिय असणाऱ्या नक्षलींना संपर्कासाठी अशी माणसे हवीच असतात. यात पांडू बंदुकीच्या धाकावर सहभागी झाला की स्वमर्जीने हे कळायला मार्ग नाही पण दुर्गम भागात राहणाऱ्या तरुणांना नक्षलींचे आदेश टाळता येत नाही हे गडचिरोलीतील वास्तव. याची जाणीव असल्यामुळे या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी पांडूच्या बाबतीत थोडे सौम्य धोरण स्वीकारले. त्याला विश्वासात घेतले. जे सत्य ते सांगितले तर माफीचा साक्षीदार करू असे आश्वासन दिले. तसाही हेम मिश्राला दुचाकीवर घेऊन जाणे एवढाच त्याचा गुन्ह्यातील सहभाग. पोलिसांना सुद्धा दिल्ली व जंगलातील नक्षलींशी असलेले संबंध खणून काढण्यात रस. त्यामुळे पांडू कबुलीजबाबासाठी तयार होताच या प्रकरणाचा मार्ग सुकर झाला. पोलीस कोठडी संपून तो कारागृहात गेल्यावर चित्र अचानक बदलले.

नक्षलीच्या समर्थक संघटना व त्यांच्यासाठी काम करणारे वकील पांडूला भेटू लागले. त्याच्या कबुलीमुळे साईबाबा व मिश्रा अडचणीत येतील ही या साऱ्यांची भीती. या समर्थक संघटनांचे आजवरचे धोरणही हेच. नक्षलच्या आरोपावरून अटकेत असलेले स्थानिक आदिवासी तरुण कारागृहात सडले तरी चालतील पण चळवळीचे म्होरके मात्र तातडीने सुटायला हवेत. साईबाबा व मिश्रा हे त्यांच्यादृष्टीने म्होरकेच. त्यामुळे त्यांच्या सुटकेला प्राधान्य देणाऱ्या समर्थकांनी पांडूने दिलेला जबाब न्यायालयात बदलायला लावला. त्याने असे करू नये म्हणून पोलिसांनी बरीच धावपळ केली व वेगळा वकील देण्याची तयारी दर्शवली. माफीचा साक्षीदार झाला तर सुटशील हेही समजावून सांगितले पण दबावात आलेल्या पांडूचा नाईलाज झाला. जबाब बदलला तर सारेच दोषमुक्त होतील हा समर्थकांचा युक्तिवाद भारी पडला. नक्षली कारागृहात असलेल्या त्यांच्या सहकाऱ्यांना राजकीय कैदी संबोधतात. त्यांच्या सुटकेसाठी निवेदने काढतात. हे करताना त्यांचे लक्ष्य केवळ म्होरके सुटावेत हेच असते. त्यांच्यासाठीच वकिलांची फौज लावली जाते. अटकेत असलेल्या सामान्य आदिवासींसाठी नाही. ते जितके जास्त काळ तुरुंगात राहतील तेवढा त्यांचे गाव व परिसरातील लोकांमध्ये पोलिसांविरुद्ध असंतोष धगधगत राहील हे त्यामागचे गणित. पांडूकडे समर्थकांचे लक्ष गेले कारण म्होरके व त्याचे प्रकरण एकच होते. मात्र त्यासाठी त्याला जबाब बदलावा लागला व त्यातच घात झाला. तो ऐकत नाही हे बघून पोलिसांना माफीची योजना गुंडाळावी लागली. याचे सर्वात जास्त वाईट वाटले ते या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाला. आता पांडूच्या मृत्यूनंतर या पथकातले सारेच हळहळताहेत. नक्षली कारवायांमध्ये स्थानिकांचा सहभाग कितपत हा प्रश्न पोलिसांना अनेकदा संयमाने हाताळावा लागतो. काही प्रकरणात पोलीस कठोरपणे वागलेत हे मान्य. त्यामुळे जनतेच्या विश्वासाला तडा जातो. हे प्रकरण मात्र वेगळे होते. त्यामुळे पांडूचा मृत्यू चटका लावून गेलेला. पांडू हा व्यवस्थेचा बळी ठरला. क्षुल्लक कारणासाठी त्याला शिक्षा झाली. आदिवासींना असेच अडकवले जाते असा युक्तिवाद या प्रकरणात सुद्धा होईल. तो करणारे नक्षलींचे शहरी समर्थक जास्त असतील हे मान्य. वरवर पाहता हा युक्तिवाद सुद्धा अनेकांना खरा वाटू शकतो. पोलीस व नक्षल या दोघांकडेही असलेल्या बंदुकांच्या साठमारीत आदिवासी भरडले जातात हे सुद्धा खरे. मात्र त्यात अडकलेल्यांपैकी सारेच कारागृहात सडावेत अशी पोलिसांचीही भूमिका नसते. कदाचित अशी उदाहरणे कमी असतील. पांडू मात्र त्यातले एक होते हे खात्रीने सांगायला हवे. सध्या कारागृहात असलेल्या अरुण भेलकेने चंद्रपूर व पुण्यातील अनेक शिक्षित तरुणांना या चळवळीच्या जाळ्यात ओढले. त्यातल्या काहींवर पोलीस कारवाई झाली. जामिनावर सुटताच ते थेट जंगलात गेले. त्यातला राजुराचा ठाकूर नावाचा तरुण तर चकमकीत मारला गेला. अशी कारवाई करून आपण चुकलो अशी पश्चात्तापाची भावना तेव्हा अधिकाऱ्यांमध्ये बळावली होती. या चळवळीत सामील होणे जीवघेणे ठरू शकते याची जाणीव गडचिरोलीतील तरुणांना सुद्धा आहे मात्र अनेकदा गावात वावरताना त्यांचा नाईलाज होतो. हे चित्र बदलायचे असेल तर शिक्षण, रोजगाराच्या संधी व पायाभूत विकास जलदगतीने व्हायला हवा. तरच आदिवासी व प्रशासन यांच्यातील सेतू उत्तमपणे बांधला जाईल. अन्यथा पांडूसारख्या नवनव्या कथा समोर येतच राहतील व हकनाक एकाचा बळी गेला ही हळहळ मनात कायम राहील.

devendra.gawande@expressindia.com

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lokjagar naxalite prisoner pandu naroti death zws
Show comments