देवेंद्र गावंडे
महात्मा गांधींच्या विचाराची हत्या होणारी अनेक स्थळे या देशात अलीकडच्या नऊ वर्षात तयार झालेली. त्यात आता आणखी एकाची भर पडलीय. दुर्दैव असे की स्थळ त्याच वर्ध्यात आहे, जिथे राष्ट्रपित्याने आयुष्यातील महत्त्वाची वर्षे घालवली व देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला चालना दिली. हे महान कार्य त्यांनी ज्या सेवाग्राम आश्रमातून पार पाडले त्यापासून काही किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे व त्याचे नाव महात्मा गांधी हिंदी राष्ट्रीय विद्यापीठ असे आहे. गेल्या चार वर्षांपासून हे स्थळ गाजते आहे ते भलत्याच कारणांसाठी. ती सारी कारणे अशैक्षणिक व विद्यापीठाचे नाव मातीत घालणारी. येथील कुलगुरू चुकून विष काय पितात, नेमके त्याचवेळी एक महिला सहकारी तोच प्रयोग काय करते, त्यांच्या संभाषणाचे ‘स्क्रीनशॉट’ प्रसारित काय होतात, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सतत कशा झडतात. हा सारा घटनाक्रम किळसवाणा व मेंदूला झिणझिण्या आणणारा. विद्यापीठ म्हटले की वाद, आंदोलने ठरलेली. ती शैक्षणिक मुद्यावरून होत असतील तर ते समजून घेता येण्यासारखे. मात्र येथे शिक्षण राहिले बाजूला व भलत्याच कारणांसाठी हे विद्यापीठ चर्चेत येत राहिले.
ज्यांच्यावर आचार्य पदवीसाठी प्रबंध चोरल्याचा आरोप आहे अशा व्यक्तीची निवड कुलगुरूपदी केली तीच खरेतर सत्याचे प्रयोग सांगणाऱ्या गांधीविचाराची हत्या होती पण सर्वच संस्थांचे भगवीकरण करण्याचा नाद लागलेल्या सरकारने ही नियुक्ती केली व या स्थळाच्या प्रतिमाभंजनाला सुरुवात झाली. त्याचा शेवट जरी कुलगुरूच्या राजीनाम्याने झाला असला तरी यातून निर्माण झालेले प्रश्न गंभीर आहेतच शिवाय सरकारच्या भगवीकरणाच्या अट्टाहासाला उघडे पाडणारे आहेत. मुळात हे विद्यापीठ स्थापन झाले ते हिंदीचा प्रसार, प्रचार व्हावा, तोही शिक्षणाच्या माध्यमातून यासाठी. गांधींनी स्वातंत्र्याचे आंदोलन चालवताना हिंदीला कायम प्रोत्साहन दिले. हा इतिहास लक्षात ठेवत या विद्यापीठाचे नामकरण झाले. प्रत्यक्षात घडले विपरीत. त्याचा कडेलोट या चार वर्षांच्या काळात सर्वांना बघायला मिळाला. खरेतर देशात ज्यांची सत्ता आहे त्यांना हिंदी प्राणप्रिय. त्यासाठी दक्षिणेकडील राज्यांशी कायम वाद करण्यात हे सत्ताधारी धन्यता मानतात. अशा स्थितीत या भाषेचा प्रसार करणाऱ्या या विद्यापीठाला आणखी मोठ्या उंचीवर नेण्याची चांगली संधी सत्ताधाऱ्यांना होती. मात्र धार्मिक ध्रुवीकरणाच्या नादात त्यांनी ती घालवली. याच सत्ताधाऱ्यांना गांधी सुद्धा प्रात:स्मरणीय. त्यामुळे याच विचाराचा एखादा माणूस या ठिकाणी नेमून या स्थळाचा दर्जा वाढवता येणे शक्य होते पण इथे आडवे आले पुन्हा ध्रुवीकरणच. त्यामुळे गांधी यांना खरोखरच वंदनीय आहेत का हा वारंवार पडणारा प्रश्न या वादाच्या निमित्ताने पुन्हा अनेकांना पडलेला. या विद्यापीठाचे आधीचे कुलगुरू बरेच खमके होते. त्यांनी सत्ताधाऱ्यांचा ‘अजेंडा’ चालवण्यास अनेकदा नकार दिला. ते गेल्याबरोबर हा अजेंडा राबवायला सुरुवात झाली व आज या विद्यापीठाची प्रतिमा पार धुळीस मिळाली. देशविदेशातील अडीच हजार विद्यार्थी शिक्षण घेणाऱ्या या विद्यापीठाच्या परिसरात चक्क ‘शाखा’ भरायला सुरुवात झाली. शाखा व त्यातून प्रसारित होणाऱ्या विचारावर कुणाचा आक्षेप अथवा कुणाचे समर्थन असू शकते, पण थेट शैक्षणिक संकुलात असे कृत्य करण्याचे कारण काय? गांधी स्वत:ला अभिमानाने हिंदू म्हणवून घ्यायचे. मात्र त्यांचे धर्मप्रेम सहिष्णूतेच्या मार्गाने जाणारे होते. त्यात कडवेपणा व इतर धर्माच्या द्वेषाला थारा नव्हता. भगवीकरणाचा नाद लागलेल्यांना हे विचार मान्य आहेत का? नसतील तर शाखेचा सोस कशासाठी? गांधींनी सुद्धा एका शाखेला भेट दिली होती असा युक्तिवाद करून या शाखा भरवण्याचे समर्थन शक्य आहे का? आज गांधी हयात असते तर त्यांनी हे मान्य केले असते का?
गांधींना दिव्यांच्या आराशीचा तिटकारा होता. काही कारण नसताना असा दिवा लावून तेल जाळण्यापेक्षा एका गरिबाच्या घरी तो कसा प्रकाश टाकेल यावर विचार करा असे ते कस्तुरबाला सांगायचे. हा विचार त्यागून या विद्यापीठात गेल्या चार वर्षांपासून दिवाळीला पाच हजार दिव्यांची आरास सुरू केली गेली. असे करून आपण गांधींचाच अवमान करतो आहोत याचे भानही व्यवस्थापनाला राहिले नाही. विद्यापीठाच्या विविध समित्यांवर, अभ्यासमंडळावर ज्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या ते सारे एकाच विचाराचे. त्यातल्या अनेकांचे गांधीप्रेम किती बेगडी आहे याचा प्रत्यय अनेकदा आलेला. अशांनी घेतलेल्या निर्णयातून गांधी विचाराचा व त्यातून हिंदीचा प्रसार होईल असे मानणेच मुळी दूधखुळेपणाचे लक्षण. विद्यापीठातील अनेक इमारती व परिसराचे नामकरण करण्याचा कार्यक्रम या चार वर्षात धडाक्यात राबवला गेला. तसेही नामकरण हा सत्ताधाऱ्यांचा आवडता छंद! यातून नावे कुणाची दिली गेली तर ज्यांनी गांधींना त्यांच्या हयातीत कडवा विरोध केला व निंदानालस्ती केली त्यांची. गांधीसोबतच्या लढ्यात हिरिरीने उतरलेले अनेक योद्धे आहेत. त्यांचीही नावे देता आली असती पण इथेही भगवीकरणाचा सोस आडवा आला. सध्या आमची सत्ता आहे तेव्हा आम्ही आपल्या विचाराच्या महनीय व्यक्तींना प्राधान्य देऊ हा युक्तिवाद एकदाचा मान्य केला तरी महिलांचे शोषण, आत्महत्येचा प्रयत्न, एकमेकांविरुद्ध पोलीस तक्रार यातून या विद्यापीठाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले त्याचे काय? हे कोणत्या भगवीकरणात बसते?
सामान्य कुवतीची, संशयास्पद पार्श्वभूमी असलेली माणसे प्रमुखपदी नेमून संस्थांचे खच्चीकरण करत न्यायचे हाच सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे काय? राष्ट्राची नव्याने मांडणी असा गजर एकीकडे करायचा, प्रत्यक्षात त्यासाठी आवश्यक असलेल्या नव्या संस्था उभारायच्या नाहीत व जुन्या, नावाजलेल्या संस्थांची प्रतिमा धुळीस मिळवायची यालाच नव्या भारताचे स्वप्न म्हणायचे काय? कोणतेही विद्यापीठ हे त्यात सहभागी असणाऱ्यांच्या शैक्षणिक कामगिरीसाठी ओळखले जायला हवे. संशोधन, नवा विचार, नवी चिकित्सा असेच या कामगिरीचे स्वरूप असायला हवे. दुर्दैव हे की यातील एकाही गोष्टीसाठी हे विद्यापीठ ओळखले जात नाही. तशी ओळख व्हावी यासाठी प्रयत्न करण्याऐवजी एका विशिष्ट विचाराचाच प्रसार कसा करता येईल यातच सारे गुंग झालेले. हे सरकारच्या कोणत्या शैक्षणिक धोरणात बसते? राजीनामा दिलेल्या कुलगुरूंनी अनेक वादग्रस्त निर्णय घेतले. ते घेताना आपला कोण याला प्राधान्य दिले गेले. यातून मोठा असंतोष तयार झाला व शिक्षणाचा मूळ हेतूच मागे पडला. अखेरच्या काळात तर या कुलगुरूंवर त्यांच्याच विचाराचे लोक नाराज झालेले बघायला मिळाले. अध्यापन सोडून भलतीच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करायला गेले की असेच घडते. यातून सत्ताधारी आतातरी बोध घेणार की नव्या कुलगुरूच्या माध्यमातून पुन्हा भगवीकरणाचाच अजेंडा पुढे रेटणार हा यातला कळीचा मुद्दा आहे. या वादात गांधी विचार तर फार मागे पडलाय. त्याला कुणी वालीच उरला नाही. वर्ध्यात हे घडावे यापेक्षा दुर्दैव ते काय?