देवेंद्र गावंडे
वैदर्भीय अस्मितेवर टोमणे मारणे, विदर्भातील माणसांना हिणवणे, नावे ठेवणे हा राज्याच्या मुंबई, पुण्याकडील नेत्यांचा आवडता व जुना छंद. त्याचे चटके सहन करण्याची सवय या भागातील लोकांना, नेत्यांना पडून गेलेली. ‘तुमच्या’ विदर्भात किती तापते हो पासून तर वैदर्भीय आळशी आहेत, तेथील नेत्यांना विकासाची जाण नाही असे या हिणवण्याचे स्वरूप. यातल्या ‘तुमच्या’ शब्दावर बोलणाऱ्याचा अधिक जोर, जसे काही विदर्भ हा राज्याचा भागच नाही असा सूर दर्शवणारा. त्यामुळे क्षेत्र राजकीय, सामाजिक असो वा सांस्कृतिक प्रत्येक आघाडीवर वैदर्भीयांना या तुच्छतावादाचा सामना अनेक वर्षे करावा लागला. राज्य स्थापनेनंतर सत्तेचा लंबक तीनदा विदर्भाकडे झुकला. नाईक घराण्यातले दोन व कन्नमवार यांच्या मुख्यमंत्रीपदामुळे. तरीही या तिरस्काराच्या नजरेत फारसा फरक पडला नाही. त्यामुळे मुंबई, पुण्याकडील नेत्यांच्या बाबतीत वैदर्भीयांच्या मनात कायम परकेपणाची भावना राहिली. स्वतंत्र विदर्भाची मागणी प्रबळ होण्याला विकासासोबत हे कारण सुद्धा एक निमित्त ठरले. यात बदल घडवून आणला तो दोन तपापूर्वी राजकारणात प्रवेश केलेल्या राजकीय नेत्यांनी. नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, बी.टी. देशमुख, मामा किंमतकर अशी अनेक नावे यात समाविष्ट करता येतील. या साऱ्यांनी आक्रमकपणे विदर्भाचे प्रश्न मुंबईत मांडले. भाजपच्या नेतृत्वाची धुरा तर अनेक वर्षे विदर्भाकडेच राहिली. परिणामी, टोमणे, हिणवणे कमी झाले पण तिकडच्या नेत्यांच्या मनात विदर्भाविषयी असलेला आकस कमी झाला नाही. तो मनातल्या मनात खदखदत राहिला. एखाद्या वैदर्भीय नेत्याने राज्याच्या राजकारणाची सूत्रे हाताळावी ही भावना या आकसाला बळ देत गेली. त्याचा स्फोट म्हणून उद्धव ठाकरेंच्या ताज्या वक्तव्याकडे बघायला हवे. ते फडणवीसांना ‘नागपूरवरचा कलंक’ म्हणाले. नंतर दुसऱ्या दिवशी सुद्धा ‘त्यात काय एवढे’ असा त्यांचा अविर्भाव होता. यावरून उठलेले राजकीय वादळ, आंदोलने बाजूला ठेवली तरी राजकारणात असल्या असभ्य भाषेला स्थान नाही हे ठाकरेंसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या लक्षात येत नसेल का? यातून स्पष्टपणे दिसली ती ठाकरेंची सरंजामी वृत्ती. याच वृत्तीने ते कायम विदर्भाकडे बघत आले व आता थेट फडणवीसांवर घसरले.
राजकीय वाद, वैर, त्यातून होणारे नुकसान व त्यामुळे आलेले नैराश्य समजू शकते पण म्हणून तोल ढळू देण्याचे समर्थन अजिबात करता येणे शक्य नाही. २०१९ पासून राजकारणातील भाषेचा स्तर एकदम खालावला. त्याला सारेच जबाबदार. अशावेळी किमान पक्षनेतृत्वाने तरी संयम बाळगायला हवा. त्यात ठाकरे अपयशी ठरले. आजच्या घडीला केवळ फडणवीसच नाही तर सर्वच पक्षातील अनेक नेते विदर्भाच्या हिताचा विचार करतात. त्यांच्या परीने विकासात काही ना काही हातभार लावतात. त्यातल्या एकाला थेट कलंक अशी उपमा देणे स्वत:ला सुसंस्कृत म्हणवणाऱ्या ठाकरेंना अजिबात शोभणारे नाही. फडणवीसांनी विदर्भासाठी केलेली दहा कामे बोटावर मोजता येतील. तरीही ते जर कलंक असतील तर ठाकरेंनी विदर्भासाठी काय केले? मुख्यमंत्रीपदाच्या काळात गोरेवाड्याला स्वत:च्या वडिलांचे नाव देणे ही एकमेव उपलब्धी त्यांच्या नावावर. हे लक्षात घेतले तर त्यांना दुसऱ्या कुणाला कलंकित ठरवण्याचा अधिकारच नाही. मुंबईत बसून राजकारण केले म्हणजे साऱ्या राज्याने आपल्याला स्वीकारले अशा अविर्भावात अनेकजण वावरत असतात. ठाकरेही त्यातले एक निघाले. फडणवीसांचे विचार, त्यांचे कर्तृत्व, राजकारणाची शैली यावरून अनेकांची मते भिन्न असू शकतात. विदर्भातही त्यांना विरोध करणारे आहेत. याचा अर्थ ते या भागासाठी कलंक आहेत असा होत नाही. याचे भान ठाकरेंनी बाळगणे गरजेचे होते. हीच जर ठाकरी भाषा व शैली असेल तर विदर्भात त्याला स्थान नाही हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. राजकारणात सातत्याने अपयश येत गेले की नेत्याचा तोल ढळतो. त्याचेच दर्शन या वक्तव्यातून झाले. फडणवीसांनी शिवसेना फोडली असेलही पण ती फुटण्याएवढी ठिसूळ झालीच कशी? त्याला जबाबदार कोण? आपण आपल्याच पक्षातील नेत्यांशी कसे वागतो? यासारख्या आत्मपरीक्षणरूपी प्रश्नांना भिडण्याऐवजी फुटीचा सारा दोष फडणवीसांवर टाकत त्यांची शिवीसदृश्य शब्दात संभावना करणे कुठल्याही राजकीय सभ्यतेत बसत नाही.
फडणवीसांचे राजकारण भलेही चूक असेल पण ते विदर्भाचे आहेत. असे बोलून आपण एका प्रदेशाच्या अस्मितेवरच ओरखडा उमटवतो आहोत हे ठाकरेंच्या लक्षात आले नसेल का? नसेल तर ते पवारांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे खरोखरच अपरिपक्व आहेत हे मान्य करायला हवे. राजकारणात प्रतिस्पर्ध्याला तुच्छ लेखून स्वत:ची रेषा वाढवता येत नाही. हा वाईट, तो वाईट, फक्त मीच चांगला असे म्हणून नेतृत्वाचा पट व्यापक होत नाही याची जाणीव मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या या नेत्याला नसल्याचे दर्शन यातून झाले. एखाद्या प्रदेशाला, त्यात राहणाऱ्या नेत्यांना दूषणे देऊन पक्ष कधीच वाढत नाही. ठाकरेंचा व त्यांच्या पक्षाचा विदर्भाविषयीचा दृष्टिकोन कायम संकुचित राहिला. त्यामुळे हा पक्ष विदर्भात तग धरू शकला नाही. त्यात अशा वक्तव्याची भर पडत गेली तर ठाकरेंची सेना या भागात मूळ धरू शकणार नाही. या वास्तवाचे भान ठाकरेंनी अंगी बाळगायला हवे. सत्तेतून पायउतार झाल्यावर त्यांना विदर्भात जी काही थोडी सहानुभूती मिळत होती, तीही या वक्तव्याने गमावली. भाजपचे इतर नेते सुद्धा आपल्याविषयी वाईट बोलतात. तब्येतीवरून टोमणे मारतात, हा ठाकरेंचा युक्तिवाद खरा असेलही. मात्र समोरचा बोलला म्हणून आपणही तसेच प्रत्युत्तर द्यायचे हे योग्य नाही व किमान ‘या’ ठाकरेंना तरी शोभणारे नाही. केंद्रात मंत्री झाल्यापासून राज्याच्या राजकारणापासून कटाक्षाने स्वत:ला दूर ठेवणारे नितीन गडकरी सुद्धा या भाषेचा निषेध करते झाले. किमान यातून तरी ठाकरेंनी बोध घेणे गरजेचे.
चोवीस तास बातम्यांचा रतीब घालणाऱ्या वृत्तवाहिन्यांना खाद्य पुरवण्याच्या नादात राजकारणातील भाषेचा स्तर कमालीचा खालावला. याला साऱ्याच पक्षाचे वाचाळ नेते दोषी. अशा स्थितीत किमान पक्षांच्या वरिष्ठांनी, नेतृत्व करणाऱ्यांनी तरी राजकीय सभ्यतेचे पालन करणे गरजेचे. ते न करता स्वत:च त्या चिखलात उतरण्याचे काम ठाकरेंनी केले. हे केवळ विदर्भच काय पण इतर ठिकाणच्या विचारीजनांना आवडलेले नाही. या वक्तव्यावर आलेल्या प्रतिक्रिया हेच दर्शवतात. अशा वक्तव्यातून प्रसिद्धीचा धुरळा उडतो, प्रतिष्ठा मिळत नाही हेही त्यांच्या लक्षात येत नसेल तर त्यांच्या राजकारणातच खोट आहे असे खेदाने का होईना पण नमूद करावे लागते. पक्षाचे नेतृत्वच जर अशी बेताल विधाने करू लागले तर इतरांना त्यात उडी मारून आणखी असभ्य होण्याची संधी मिळते. अंतिमत: त्याचा फायदा प्रतिस्पर्ध्याला होत असतो. राजकारणातले हे साधे तत्त्व ठाकरेंना कळलेले दिसत नाही.
devendra.gawande@expressindia.com