देवेंद्र गावंडे
माणूस कोणत्याही विचारांचा असो. नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे करायचे ठरवले तर त्याला कुणीच थांबवू शकत नाही. समाजही विचारभेदाच्या पलीकडे जाऊन अशा कामाचे कौतुक करू लागतो. अशा कामाचे स्वरूप जेव्हा व्यापक होत जाते तेव्हा ते एकट्यापुरते मर्यादित राहात नाही. साऱ्या समाजाचा हक्क त्यावर प्रस्थापित होतो. मग सारेच त्यात आपलाही सहभाग असावा या हेतूने सहभागी होतात. हे सारे घडतेय गडचिरोलीत. राज्याच्या टोकावर व हिंसेने ग्रस्त असलेल्या जिल्ह्यात. अवघ्या शिक्षण क्षेत्राला दिशा देणाऱ्या या कामाचे स्थळ आहे गोंडवाना विद्यापीठ व त्याची सूत्रे आहेत कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे. होय, हे तेच विद्यापीठ आहे जे स्थापनेपासून बदनाम झालेले. खालावलेला शैक्षणिक दर्जा असो वा नॅककडून न मिळालेले मानांकन, जमीन व साहित्यखरेदी वा नोकरभरती. प्रत्येक पातळीवर दिरंगाई व लुटीचे केंद्र बनलेल्या या विद्यापीठाने अवघ्या सहा महिन्यांत जणू काही कात टाकलीय!
याचे सारे श्रेय बोकारेंना. मूळचे वर्ध्याचे व उच्च शिक्षणानंतर अख्खी हयात मागास समजल्या जाणाऱ्या छत्तीसगडच्या शिक्षण क्षेत्रात घालवणाऱ्या बोकारेंनी या विद्यापीठाला रोजगाराभिमुख बनवण्याचा विडा उचललाय. त्यात ते पहिल्याच टप्प्यात यशस्वी झालेले दिसतात. मुळात सध्याची शिक्षणपद्धतीच रोजगारापासून फटकून वागणारी. पदवी घेतलेल्या मुलाला सुद्धा पुढे काय करणार याचे उत्तर न देता येणारी. पदवी घेतल्यावर सुद्धा नोकरीसाठी आवश्यक असलेला एखादा कौशल्यविकासाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागेल अशी गरज निर्माण करणारी. अशा प्रतिकूल पद्धतीशी दोन हात करत या भागातल्या आदिवासींना केवळ शिक्षणच नाही तर रोजगाराच्या प्रवाहात आणण्याचे जे प्रयत्न बोकारेंनी चालवलेत ते निश्चितच कौतुकास्पद! मुळात या विद्यापीठाच्या स्थापनेचा उद्देशच हा होता. नक्षलवादाच्या प्रभावाखाली असलेला हा भाग शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहाशी जोडला जाऊ शकतो, हे लक्षात घेऊनच विद्यापीठाची निर्मिती झाली. नागर समाजापासून दूर राहिलेले, आर्थिक चणचणीमुळे व नक्षलींच्या विरोधामुळे शिक्षण घेऊ न शकणारे तरुण या विद्यापीठाशी जोडले जावेत, आदिवासी तरुणांना त्यांच्या परंपरा व हस्तकौशल्याचा सन्मान राखत शैक्षणिक प्रवाहात सामील करून घेतले जावे, केवळ तरुणच नाही तर या भागातल्या प्रत्येकाला योजनांच्या माध्यमातून सरकारी यंत्रणेशी जोडता यावे, त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण देता यावे यासाठीच हे विद्यापीठ होते व आहे. दुर्दैवाने गेल्या अकरा वर्षात यातले काहीच झाले नाही.
इतर ठिकाणी असलेल्या सरधोपट शिक्षण प्रक्रियेनुसारच येथील कारभार सुरू राहिला. यामुळे स्थापनेच्या उद्देशालाच तडा जातो की काय, अशी शंका बळावत चालली असताना बोकारेंनी त्या शंकांना पूर्णविराम देण्यासाठी केलेले प्रयत्न स्तुत्य म्हणावे असेच. विद्यापीठे ही रोजगारनिर्मिती केंद्रे व्हावीत हे वाक्य प्रत्येक सरकारच्या तोंडून नेहमी बाहेर पडते. प्रत्यक्षात कृतीच्या पातळीवर काहीच घडत नाही, असा साऱ्यांचाच अनुभव. बोकारेंनी प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करून साऱ्यांनाच धक्का दिलाय. गडचिरोलीतील ग्रामसभांचे सक्षमीकरण असो वा तेथील विद्यार्थ्यांना विद्यापीठात मोफत शिक्षण, शिक्षणानंतर रोजगार, नोकरीची व्यवस्था असो की शैक्षणिक व्यवस्थेतून बाहेर फेकले गेलेल्या मुलांना जवळ करण्याचे प्रयत्न. प्रत्येक पातळीवर त्यांनी सुरू केलेले उपक्रम, त्यासाठी ते करीत असलेली धडपड, सारेच सुखद धक्का देणारे. अलीकडच्या काळात विद्यापीठे राजकारणाचा अड्डा झालेली. ज्यांची सत्ता आली त्यांनी स्वत:च्या विचाराचे कुलगुरू नेमायचे, त्या माध्यमातून शिक्षणव्यवस्थेवर अंकुश ठेवायचा, स्वविचाराला चालना देणारेच कार्यक्रम आयोजित करायचे, शिक्षणाच्या माध्यमातून हा विचार कसा रुजेल याकडे कटाक्षाने लक्ष ठेवायचे, असाच पायंडा पडलेला. त्यामुळे इतर सर्व विद्यापीठांत प्रशासन विचारधारेचा प्रसार व प्रचार याभोवतीच फिरत राहिले. गोंडवानाची पार्श्वभूमी वेगळी आहे व तिथे सर्वात आधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे, हे बोकारेंनी बरोबर ओळखले. त्यांनी या प्रचलित पद्धतीला फाटा देत या संवेदनशील क्षेत्रात नेमके काय करायला हवे हे लक्षात घेऊन पावले उचलली. असेच काम त्यांनी छत्तीसगडमध्ये सुद्धा केले.
माझ्या विद्यार्थ्यांना नोकरी द्या म्हणून त्या भागातल्या उद्योगांचे दरवाजे ठोठावणारे बोकारे येथेही तेच करत आहेत. गडचिरोलीत उद्योग नाही पण तिथल्या शिक्षित आदिवासी तरुणाची नोकरी करण्याची क्षमता इतर कुठल्याही शहरी शिक्षितांएवढीच आहे हे ते मुंबई, पुण्यातील उद्योगांना पटवून देत आहेत. त्यासाठी त्यांच्याशी सामंजस्य करार करत आहेत. हे अभिमानास्पद आहेच पण इतर विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. कोट व टाय अत्यावश्यक, त्याशिवाय ओळखच पटू शकत नाही अशी सध्याच्या कुलगुरूंची प्रतिमा. आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ अशी भावना यातूनच तयार झालेली. त्यामुळे सारेच कुलगुरू एका विशिष्ट अहंगडात वावरणारे. आपल्या विद्यापीठाचा रोजगार संधी दर अधिक असावा, त्यासाठी धावपळ करावी हे यापैकी कुणाच्याही ध्यानीमनी नाही. केवळ उपदेशाचे डोस पाजले की झाले आपले काम याच थाटात सारे वावरणारे. बोकारे या साऱ्यांपेक्षा वेगळे आहेत. उजवे असून सुद्धा त्यांना विद्यार्थ्यांच्या हितासाठी इतर विचारांच्या तज्ज्ञांची मदत घेण्यात कमीपणा वाटत नाही. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ते कोणत्याही उद्योग वा आस्थापनेचे दार स्वत: ठोठावतात. त्यामुळेच त्यांचे प्रयत्न वेगळे व उठून दिसणारे आहेत. खरे तर इतर सूटबूटवाल्या कुलगुरूंनी त्यांच्यापासून बोध घ्यायला हवा असेच त्यांच्या प्रयत्नांचे स्वरूप. गोंडवानाव्यतिरिक्त आणखी तीन विद्यापीठे विदर्भात आहेत. तीही रोजगारनिर्मितीची केंद्रे ठरू शकतात पण तसे प्रयत्नच कुणी करताना दिसत नाही. गडचिरोलीच्या तुलनेत इतर विद्यापीठांची आर्थिक स्थितीही उत्तम. गोंडवानाजवळ तर पैसाच नाही. नागपूरच्या विद्यापीठाकडे नऊशे कोटींच्या ठेवी. तरीही नोकरीच्या संधी कशा निर्माण करता येतील यावर साधा विचारही या विद्यापीठांमध्ये होताना दिसत नाही. सध्या व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळत नाही. कला, वाणिज्यची अवस्था तर आणखी वाईट. यावर मात करायची असेल तर विद्यापीठांनी व त्याचे नेतृत्व करणाऱ्या कुलगुरूंनी सक्रिय होणे गरजेचे. हे काम दोन जिल्ह्यापुरते मर्यादित असलेले गोंडवाना करू शकते तर इतरांना का जमत नाही? विद्यापीठाचा कारभार नियंत्रित करणाऱ्या विधिसभा, विद्वत परिषद व व्यवस्थापन परिषदेच्या राजकारणातच व्यस्त राहायचे व परीक्षा घेतल्या की विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचे हेच सध्या साऱ्या विद्यापीठात सुरू आहे. गोंडवाना मात्र त्याला अपवाद ठरू लागले आहे. सहा महिन्यांचा कार्यकाळ एखाद्याच्या कार्यपद्धतीचे मूल्यमापन करण्यासाठी पुरेसा नाही हे मान्य. पण बोकारेंनी सुरुवात तर दमदार केलीय. राज्याच्या तुलनेत विदर्भातील विद्यापीठांचा दर्जा अगदीच खालावलेला. या पार्श्वभूमीवर पडलेले हे आश्वासक पाऊल आनंद देणारे!
devendra.gawande@expressindia.com