देवेंद्र गावंडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

निवडणुका जवळ आल्या की राजकारणात सक्रिय होणे हा काँग्रेस नेत्यांमधला खास गुण. गेल्या अनेक दशकांपासून अंगात मुरलेला. सततच्या पराभवामुळे या गुणाचा विस्तार करावा, सक्रियतेच्या व्याख्येत बदल करावा, सामान्यांच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवावेत. हे असले विचार या पक्षनेत्यांच्या डोक्यातही येत नसावेत. अन्यथा कुणाल नितीन राऊत यांचे उपद्व्याप दिसले नसते. या साऱ्यांची सक्रियतेविषयीची समज तोडफोड, पुतळा जाळणे, काळे फासणे एवढ्यापुरतीच मर्यादित. लोकांना आपलेसे करून घेण्यासाठी यापलीकडे जाऊन सुद्धा काही करता येते हे पक्षातील अनेकांना ठाऊकच नाही. त्यामुळे हा पक्ष वारंवार निवडणुकीत मार खातो पण त्यातून धडा घ्यायला कुणी तयार नाही. राऊतांचे ताजे प्रकरण त्याचेच निदर्शक. गेल्या दोन वर्षापासून हे कुणालभाऊ युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. या काळात त्यांनी जनमत पक्षाच्या बाजूने वळवण्यासाठी, संघटनात्मक बांधणीसाठी नेमके काय काम केले हे कुणालाच कधी कळले नाही. आता लोकसभेसाठी रामटेकचा गड समोर दिसू लागताच अचानक त्यांना सक्रिय होण्याची खुमखुमी दाटून आली. ही सक्रियता लोकांच्या प्रश्नांना घेऊन आंदोलन करणारी असती तर ते एकदाचे समजून घेता आले असते पण त्यांनी उचलला सावरकरांचा मुद्दा! तोही विद्यापीठाशी संबंधित. खरे तर असे जुने मुद्दे उकरून हाताशी काही लागत नाही, उलट हातच पोळतात हे अनेकदा दिसलेले. यातून मतांचे ध्रुवीकरण तर होतच नाही, उलट काँग्रेसविषयी सहानुभूती असलेली मते गमावण्याचा धोका मोठा हेही मागेच लक्षात आलेले. तरीही हे ‘मोजक्या’ कार्यकर्त्यांचे भाऊ पुढे आले व त्यानंतर काय घडले हे सर्वांना ठाऊक.

हेही वाचा >>> नागपूर : उकळते पाणी अंगावर पडून चिमुकल्याचा मृत्यू

ही सक्रियता पक्षाच्या विद्यार्थी संघटनेने दाखवली असती तर तेही ठीक पण मुद्दा उचलला तो विद्यापीठ ही कार्यकक्षा नसलेल्या युवक काँग्रेसने. कारण एकच उमेदवारी मिळावी हे. सध्या सत्तेत असलेल्या उजव्या विचारधारेला सावरकर प्रिय. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित कार्यक्रम सर्व स्तरावर होणे हे ओघाने आलेच. त्यातला एक गेल्या डिसेंबरमध्ये विद्यापीठात पार पडला. त्याला दीड महिन्याचा कालावधी लोटल्यावर अचानक या राऊतांना पुतळा जाळण्याची ऊर्मी येणे हेच अनाकलनीय. स्वाभाविकच त्याची प्रतिक्रिया उजव्यांमध्ये उमटली व आंदोलन, प्रतिआंदोलन, गुन्हे दाखल होणे या प्रकाराने वातावरण ढवळले. मुळात सावरकरांचा मुद्दा हा किमान काँग्रेससाठी तरी दुधारी अस्त्रासारखा. स्वातंत्र्यासाठी त्यांनी समुद्रात घेतलेली उडी, भोगलेली जन्मठेप, आयुष्यभर जोपासलेली विज्ञाननिष्ठा, गाय ही पशू आहे असे ठणकावून सांगणे या त्यांच्या भूमिका आजही काँग्रेसी विचार जोपासणाऱ्या अनेकांना मान्य आहेत. त्यामुळे हा पक्ष सत्तेत असताना सुद्धा सावरकर अभ्यासक्रमात कायम होते व तेव्हाही त्यांचा आदराने गौरव केला जायचा, तोही याच पक्षाच्या नेत्यांकडून. त्यांचे हिंदुत्वाविषयीचे विचार, द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत, गांधी हत्येत त्यांच्यावर झालेला आरोप व इंग्रजांना मागितलेली माफी या न पटणाऱ्या मुद्याकडे काँग्रेसने तेव्हाही दुर्लक्ष केले होते. त्यामुळे सौम्य हिंदुत्ववाद जोपासणारा पण धर्माचे राजकारण होऊ नये या मताचा एक मोठा वर्ग काँग्रेससोबत दीर्घकाळ राहिला. तो सोबत ठेवणे किंवा तुटला असल्यास पुन्हा जोडायचा असेल तर या मुद्याला हात न घालणेच इष्ट असा विचार बाळगणारे अनेक नेते आजही काँग्रेसमध्ये आहेत. याच नेत्यांना तसेच समाजातील एका वर्गाला राहुल गांधींनी भारत जोडोच्या दरम्यान अकोल्यात छेडलेला हा मुद्दा अजिबात आवडला नव्हता. ही सारी पार्श्वभूमी कुणाल राऊत यांना ठाऊक नव्हती काय? सावरकरांचा मुद्दा मते जोडणारा नाही तर तोडणारा हे जर राज्याची संघटना चालवणाऱ्या या युवा नेत्याला कळत नसेल तर हा पक्ष कसा उभारी घेणार? असे मुद्दे उचलून रामटेकचा गड सर करता येईल असे जर या युवा नेत्याला वाटत असेल तर ते मूर्खाच्या नंदनवनात वावरत आहेत असेच म्हणावे लागते.

हेही वाचा >>> उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना डी.लीट. पदवी, गोंडवाना विद्यापीठ करणार सन्मानित

विद्यापीठात भाजयुमोने आंदोलन केल्यानंतर राऊतांच्या समर्थनार्थ विद्यार्थी संघटना उतरली. त्यांनी दिलेल्या निवेदनात सावरकरांच्या बाबतीत जे अकलेचे तारे तोडण्यात आले त्यावरून या पक्षातील साऱ्यांना प्रशिक्षणाची किती गरज आहे हेच अधोरेखित होते. स्वातंत्र्यलढ्यात सावरकरांचे योगदान काय? नागपूर विद्यापीठाने कधीकाळी त्यांना दिलेल्या डी.लिट.मागील कारणे काय? हे असले प्रश्न केवळ अज्ञानीच विचारू शकतात. तसेही आजच्या वर्तमानाशी याचा संबंध काय? भाजपचे नेते सातत्याने नेहरूंवर टीका करतात म्हणून प्रत्युत्तर देण्यासाठी हे प्रकरण उभे केले असा युक्तिवाद केला जातो. तोही तर्काच्या कसोटीवर न टिकणारा. मुळात भाजपकडून नेहरूंवर होत असलेली टीका समाजातील मोठ्या वर्गाला आवडणारी नाही. तरीही ते निवडून का येतात याचे उत्तर भाजपच्या सक्रियतेत, लोकसंपर्कात व काही योजनांच्या अंमलबजावणीत जसे दडले आहे तसेच ते विरोधकांच्या निष्क्रियतेत सुद्धा दडलेले आहे. यावर उपाय म्हणजे प्रत्युत्तराचा मार्ग बदलणे व लोकांना भेडसावणाऱ्या मुद्यांना हाती घेत आंदोलने करणे. तो सोडून नेहरू व सावरकर अशा वादात अडकणे म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या सापळ्यात अडकणे. हेच काँग्रेसला अजून उमगलेले नाही हे राऊतांनी परत एकदा सिद्ध केले.

ही घटना ताजी असतानाच याच राऊतांनी फलकावरील मोदींच्या छायाचित्राला काळे फासले. हा सुद्धा अगोचरपणाचा उत्तम नमुना. सत्ताधारी खोटा प्रचार करत असतील तर त्यातला खोटेपणा जनतेसमोर आणण्याचे काम ही संघटना का करत नाही? काळे फासून हा खोटेपणा उघड होणार आहे का? अशा आततायी कृतीने प्रसिद्धी मिळते पण निवडणुकीत यश मिळत नाही हे अजूनही या पक्षाच्या लक्षात येत नाही हेच या प्रकरणातून दिसले. युवकांच्या संघटनेचे खरे काम हे तरुणांचे प्रश्न सोडवणे. आज महाराष्ट्रात तरुण प्रचंड अस्वस्थ आहेत. शासकीय नोकरभरतीतील घोटाळे, खाजगीत नोकरीच्या आटणाऱ्या संधी, केंद्र व राज्याने स्वयंरोजगारासाठी सुरू केलेल्या योजनांमधील फोलपणा यासारखे अनेक मुद्दे या संघटनेला हाताळता येणारे आहेत. त्यावर राऊत वा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षात एकही आंदोलन केले नाही. स्पर्धा परीक्षेतील गैरव्यवहाराविरुद्ध बेरोजगारांनी लाखोचे मोर्चे काढले पण त्यात सहभागी व्हावे अथवा या तरुणांना संघटित करण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही या युवा नेत्याला कधी वाटले नाही. समाजमाध्यमांवरून या आंदोलनाला पाठिंबा दिला की झाले एवढ्यापुरतीच युवक काँग्रेसची भूमिका मर्यादित राहिली. जिथे सक्रियता दाखवायची आहे तिथे कच खायची व भलतेच मुद्दे उकरून नाहक वाद ओढवून घ्यायचा यात कसला आलाय शहाणपणा? यातून राऊतांना राजकीय फायदा मिळणारच नाही पण काँग्रेसचे सुद्धा कमालीचे नुकसान होणार आहे. त्यामुळे निवडणुकीतील विजय तर दूरच राहिला पण या राऊतांना कुणीतरी आवरा असेच म्हणायची वेळ आली आहे.