देवेंद्र गावंडे
‘ऐका हो ऐका, तुम्हाला राजकारणात जाऊन भरपूर पैसा कमवायचा असेल तर एक मोठी सुवर्णसंधी चालून आलेली आहे. टक्केवारी घेऊन किंवा गैरव्यवहार करून तुम्ही श्रीमंत होऊ शकता पण कारवाई टाळायची असेल तर काही पथ्ये तुम्हाला पाळावी लागतील. एक म्हणजे, तुम्ही राजकारणात प्रवेश करताना भाजप सोडून इतर कोणताही पक्ष निवडायचा. जिथे जाल तिथे यथेच्छ पोट भरून खायचे. नंतर त्याच भरल्या पोटाच्या (किंवा नोटांच्या) बळावर उपद्रवमूल्य सिद्ध करायचे. त्याचा आधार घेत भाजपमध्ये प्रवेश करायचा. तुमच्या मागे गैरव्यवहारामुळे लागलेले चौकशीचे शुक्लकाष्ठ आपोआप संपेल. मग तुम्हाला तृप्तीची ढेकर देत त्या नव्या पक्षात उजळमाथ्याने वावरता येईल. समाजसेवा, समाज प्रबोधन, गरिबांचा उद्धार यावर तावातावाने बोलता येईल. लोकही आधीचे विसरून तुम्हाला ‘नेक नेता’ म्हणून सन्मानाने वागवतील. तेव्हा इच्छुकांनो, घ्या या संधीचा फायदा व उतरा या क्षेत्रात’ अशी दवंडी गावागावात देण्याची वेळ आता आलेली.

किमान विदर्भात तरी अशी दवंडी कोतवालाच्या माध्यमातून पिटवायला काही हरकत नाही. त्याला कारणही तसेच हो! त्या वाशीमच्या ताईकडे जरा बघा. व्हाया शिंदे गटामार्फत भाजपच्या वळचणीला जाऊन ठरल्याच की निर्दोष! काय काय आरोप नाही झाले त्यांच्यावर. कारखाना कमी किंमतीत विकला, पतसंस्था बुडवली, त्यातून लाखो रुपये वळते केले. ईडीने चौकशी सुरू करताच किती अस्वस्थ होत्या त्या. मतदारसंघातील कामे सोडून त्यांना परांगदा व्हावे लागले. ‘ताई गेल्या कुठे? ताई बेपत्ता?’ अशी फलकबाजी सहन करावी लागली. एरवी त्या जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात आघाडीवर असणाऱ्या, प्रशासनातील अधिकाऱ्यांना ‘सन्मानाने’ वागणूक देणाऱ्या. मात्र या आरोपांमुळे त्यांना मतदारसंघातही जाता येईना. चौकशीसाठी समन्सवर समन्स येऊ लागल्यावर त्या तरी काय करणार? बसल्या बिचाऱ्या फिरत इकडे तिकडे. त्यातल्या त्यात या गैरव्यवहाराचा छडा लावूनच दाखवीन अशी भीमगर्जना करणारे वाशीमचेच काही ‘उपद्रवी’ होतेच त्यांच्या मागावर. कधी न्यायालयात जा तर कधी ईडीच्या कार्यालयात जा अशा त्यांच्या तुरुतुरु चाली सुरूच. त्यात भर पडली ती गैरव्यवहाराचे कर्दनकाळ अशी ओळख निर्माण करणाऱ्या मुंबईच्या नेत्याची. तेही वाट वाकडी करून वाशीमला आले. राणा भीमदेवीच्या थाटात ताईंना गजाआड केल्याशिवाय बोलणे थांबवणार नाही अशी घोषणा करते झाले. या गदारोळात काय अवस्था झाली असेल ताईची. एका स्त्रीला एवढे छळायचे नसते याचेही भान या कथित ‘जागल्यांनी’ राखले नाही.

मनुष्यप्राणी संकटात असला की ‘सेफ’ व्हायचा प्रयत्न करतो. सर्वात शेवटी शिंदे गटात दाखल झालेल्या बीडच्या एका नेत्याने दिल्लीत काढलेले हे उद्गार तुम्ही ऐकलेच असतील. आमच्या ताईंना असे काही बोलण्याची गरजच पडली नाही. त्यांच्यातल्या अंतरात्म्याने ‘सेफ’ व्हा असा कौल दिला व लगेच गेल्या त्या शिंदे गटात. त्यामुळे त्यांना तब्बल एक वर्षांनंतर दीर्घ श्वास सोडता आला. त्या तिकडे गेल्याबरोबर सारे चित्रच पालटले की! म्हणजे कसे, तर ईडीकडून येणाऱ्या नोटिसा बंद झाल्या. जे तक्रारकर्ते होते त्यांचा आवाजच बसला. आता काही नतद्रष्ट म्हणतात की, त्यांनी सरडय़ासारखा रंग बदलवला. हे खोटे आहे. तक्रारकर्त्यांनी मुंबईत जाऊन गटनेत्याची, भाजप नेत्यांची भेट घेतली. यामुळे त्यांचा ऊर इतका भरून आला की त्यांना आता काही बोलताच येईना. आपण मूळ तक्रारकर्ते होतो हेही त्यांना आठवत नाही. काही म्हणतात, मुंबईत त्यांना गुटी पाजली गेली. त्यामुळे त्यांचा विरोधी स्वर नष्ट झाला. त्यामुळे ते नागपुरात आले, पत्रपरिषद घेतली पण यावर काही बोलले नाही. एरवी ताईंच्या विरोधातली कागदपत्रे घेऊन माध्यमांचे उंबरठे झिजवणारे ते आता हे सारे विसरून गेले आहेत. काही शहाणे म्हणतात, या तक्रारदाराला भाजपनेच उभे केलेले, म्हणून ते शांत झाले. मात्र याला कुठलाही पुरावा नाही हे आम्ही नम्रपणे नमूद करतो. ताईंच्या गटबदलाचा त्यांच्यावर एवढा परिणाम झाला की त्यांना आता काय बोलावे हेच सुचत नाही. म्हणून ते शांत झाले हेच खरे! वाशीमचा दौरा करणाऱ्या त्या मुंबईच्या नेत्याला सुद्धा आता दगदग करत पुन्हा विदर्भात येण्याची गरज नाही. त्यांच्या लेखी आता ताईंची फाईल बंद झालेली. तसाही त्यांच्याकडे अशा अनेकांच्या फाईलींचा ढीग साचलेला. ताईंच्या या कृतीमुळे त्यांचे काम हलके झालेले. आता ताई खूश आहेत म्हणे! गैरव्यवहाराचे झेंगट तर संपल्यातच जमा झालेले. त्यामुळे आता त्यांना मतदारसंघात उजळमाथ्याने फिरता येईल. एक वर्षांपासून रखडलेली कामे मार्गी लावता येतील. काही अडचण आली तर मदतीला राज्य व केंद्र आहेच की! फक्त एकच काम त्यांना नव्याने करावे लागेल. त्या यवतमाळच्या भाऊशी जुळवून घ्यावे लागेल. कारण तेही स्वच्छतेचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून आधीच शिंदे गटात सामील झालेले. त्यांच्या पुण्याच्या प्रकरणात तसाही काही दम नव्हताच. जिथून विरोधी आवाज बाहेर येऊ शकतो अशी सगळी भोके त्यांनी तेव्हाच बुजवलेली. तरीही चित्रविचित्र ओरडणाऱ्या त्या मुंबईच्या ताई काही थांबायला तयार नव्हत्या. आता त्यांचाही चिवचिवाट आपसूक थांबेल.

यवतमाळ व वाशीमच्या भल्याचा विचार करता ताई व भाऊंना मतभेद विसरून एकत्र यावे लागेल. कारण दोघांचाही गट एकच. आधीही हे दोघे एकाच पक्षात होते पण मतभेदाचा जाळ विझवण्याचा प्रयत्न कुणी केला नाही. नव्या गटात अशा मतभेदाला थारा नाही. कारण एकच भाजपशी असलेली सलगी. भाजपचे काम तसे शिस्तबद्ध. आरोप-प्रत्यारोपांना तिथे थाराच नाही. तरीही कुणी िहमत केलीच तर थेट दिल्लीहून डोळे वटारले जातात. त्या चाणक्यरूपी डोळय़ांची जरब एवढी की भल्याभल्यांचे अवसान गळते. त्यातल्या त्यात हे दोघे परिवारासाठी नवे. त्यामुळे त्यांना राष्ट्रविकासासाठी तरी मतभेद मिटवावे लागतील. आता या दोघांनाही गैरव्यवहाराचे नवे शिंतोडे अंगावर उडणार नाहीत याची काळजी घेत राजकारण करावे लागणार. तरीही ते उडलेच तर दिल्ली व मुंबईत भलीमोठी वॉशिंगमशीन ठेवलीच आहे. त्यातून यांना बाहेर काढले जाईल व ‘क्लिनचीट’ दिली जाईल. या नव्या परिवारात वारंवार असे ‘धुणे’ केले जात नाही. त्यामुळे ताई व भाऊंना जपून पावले उचलावी लागतील. एकूणच काय तर सूतासारखे सरळ राहावे लागेल. या दोघांच्याही कृतीकडे आदर्श म्हणून बघणाऱ्या नवख्या राजकारण्यांना यातून धडा घ्यायचा असेल तर वर उल्लेख केलेल्या दवंडीकडे लक्ष द्यावे लागेल. एकदा ती ऐकली की कोणत्या पक्षात जायचे हे ठरवावे लागेल. तिथे रुजल्यावर गैरव्यवहाराच्या माध्यमातून मोठे व्हावे लागेल. मग आरोप होऊ लागले की भाजपकडे शरण जावे लागेल. सध्याच्या राजकारणात सर्वमान्य झालेली ही नवी पद्धत लोकशाही मजबूत करणारी आहे. आहे का कुणाला शंका यावर?
devendra.gawande@expressindia.com

Story img Loader