विदर्भातील प्रमुख पक्ष तसे दोनच, एक भाजप व दुसरा काँग्रेस. या दोघांच्या मित्र यादीत असलेले बाकी सारे विजयासाठी या दोघांवर अवलंबून असणारे. त्यामुळे ‘वज्रमूठ’ यशस्वी करून दाखवण्याचा सारा भार काँग्रेसवर होता. त्यात हा पक्ष चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला, पण पुढे काय? यामुळे या पक्षातील नेते व कार्यकर्त्यांत आलेले शैथिल्य संपेल काय? निराशा झटकून तो उभारी घेऊ शकेल काय? वारशाने लागलेले गटबाजीचे ग्रहण संपेल काय? जिंकण्यासाठी आवश्यक असलेली विजिगीषू वृत्ती भिनेल काय? नेते दरबारी राजकारणाचा त्याग करत संपत्तीचे ओंगळ प्रदर्शन टाळतील काय? सामान्य मतदारांना नेमका कशाचा तिटकारा येतो व ते नेमके कशामुळे विश्वास टाकू लागतात याचे भान नेत्यांना येईल काय? घराणेशाही त्यागायची का? यासारख्या अनेक प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी. दुर्दैव हे की हा पक्ष अशा अंतर्गत मूल्यमापनाच्या भानगडीत कधी पडत नाही. नेते सुद्धा चिंतन, प्रबोधन या शब्दापासून दूर पळतात. गांधी कुटुंब काय करणार याकडे तेवढे लक्ष ठेवून असायचे. बाकी कशाचाही विचार करायचा नाही हे साऱ्यांचे सूत्र. त्यामुळेच पक्षाची पार वाताहत झाली.
यावेळी मूठ वज्र करून दाखवल्यावर सुद्धा पुन्हा हा पक्ष आळशीपणाच्या कोशात जाईल का याची चर्चा जास्त आहे. ती का याची कारणे वर दिली आहेच, शिवाय या सभेच्या निमित्ताने पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात बरेच काही घडले. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य वाढते. सततचे पराभव पदरी पडून आता दहा वर्षे होत आली पण गटबाजीपासून फारकत घ्यायला पक्षाचे नेते तयार नाहीत. महानगर, शहर, गाव एवढेच काय एखादी पन्नास घरांची वाडी जरी असेल तरीही तेथील नेते अथवा कार्यकर्ते दोन गटात विभागलेले असतात हा सार्वत्रिक अनुभव. त्याचे दर्शन येथे मूठ वज्र होताना सुद्धा झालेच. सुनील केदार, नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी हे त्रिकूट कायम प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात राहणारे म्हणून ओळखले जातात. यातल्या केदारांवर सभेच्या आयोजनाची जबाबदारी टाकली गेली. त्यामुळे कायम प्रदेशाध्यक्षांसोबत राहणारे विकास ठाकरे आयोजनकाळात अंतर राखून राहिले. केदारांना साथ दिली ती चतुर्वेदींनी. यामागेही त्यांचा स्वार्थ अधिक. ही सभा ज्या पूर्व भागात होती तो कधीकाळी त्यांचा मतदारसंघ. स्वत:च्या कर्तृत्वाने त्यांनी तो गमावला. आता किमान मुलासाठी तो उपयोगात येईल का याची चाचपणी करण्यासाठी त्यांनी यावेळी सक्रियता दाखवली. नितीन राऊत या आयोजनापासून केवळ दूरच राहिले नाहीत तर सभेला सुद्धा आले नाहीत. ज्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद भोगले त्याच आघाडीला त्यांनी पाठ दाखवली. केदारांचे व त्यांचे पटत नाही असे कारण यावेळी समोर आले. सत्ता आली नाही तरी बेहत्तर पण आवळलेली शत्रुत्वाची मूठ सैल करायची नाही हा त्यांचा पवित्रा पक्षाला खड्ड्यात घालण्यासाठी पुरेसा. आघाडीची ही सभा कित्येक दिवस आधी ठरलेली असताना राऊत पूर्वनियोजित कार्यक्रमाचे कारण देत असतील तर खुद्द राहुल गांधीही या पक्षाला वाचवू शकणार नाहीत. तसेही राऊत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगेंनंतर आपणच या अविर्भात कायम वावरतात. अडीच वर्षे सत्तेत राहून सुद्धा ते उत्तरचा अपवाद वगळता संघटनेकडे पाठ फिरवत असतील तर या पक्षाचे काही खरे नाही.
नाना पटोले सभेच्या एक दिवस आधी आले. यात्रा असो वा सभा ते कायम पाहुण्याच्या भूमिकेतच असतात. नानाच दूर राहिल्यावर मग विकास ठाकरे तरी कसे सक्रिय राहणार? एवढी सुंदोपसुंदी असूनही सभेला हजारोंची गर्दी झाली. लोकांना चांगला पर्याय हवा, ते सत्तापक्षाला कंटाळलेत याचीच ही चुणूक होती. ती काँग्रेसच्या लक्षात वेळीच येईल का? आजवरचा अनुभव असा की असे काही मोठे व भव्य आयोजन पार पडले की पक्षनेते पुन्हा कोशात जातात. नंतर तशाच मोठ्या आयोजनाच्या वेळी सक्रिय होतात. राज्य व देशात सत्तेत आल्यावर भाजपने चोवीस तास राजकारण व संघटनात्मक कार्याचा प्रयोग सुरू केला. यश येवो की अपयश, त्यांची मेहनत अखंडपणे सुरू असते. याला उत्तर द्यायचे असेल तर काँग्रेसलाही अशी सक्रियता दाखवावी लागेल. त्याची साधी तयारीही पक्षात सुरू झालेली दिसत नाही. सरकारचा विरोध करणारे कार्यक्रम घेणे वेगळे व संघटनात्मक पातळीवर रोज लोकांशी थेट संवाद साधत त्यांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणे वेगळे यापासून हा पक्ष कोसो दूर आहे. त्यामुळे या यशाने हुरळून जात हा पक्ष पुन्हा कोशात जाण्याची शक्यता अधिक. या पक्षाला दुसरा मोठा धोका आहे तो फुटीचा. गेल्यावेळी विधान परिषद व राज्यसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या काही आमदारांनी गद्दारी केली. त्यातले विदर्भातील चार कोण या प्रश्नाचे उत्तर सर्वांना ठाऊक. वेळ येताच ते आपला खरा रंग दाखवतील हे अगदी ठरलेले. त्यातल्या एकाला थेट रामटेकमधून भाजपकडून लोकसभा लढण्याचे वेध लागलेले. मध्यंतरी याच आमदाराने एका कार्यक्रमात भाजप नेत्यांवर स्तुतीसुमने उधळलेली. ते येत आहेत म्हणून तिकडे रामटेकची धुरा सांभाळणारे अस्वस्थ. यातल्याच दुसऱ्या आमदाराला कुटुंबासकट भाजपत जायचेय. तर नानांच्या जिल्ह्यातील तिसरा केव्हा बोलावणे येते यासाठी तयार होऊन बसलेला. शिवाय नागपूर शहरातही फुटीची बिजे मनात रुजवून बसलेले एक आहेतच. कुणबी नेत्यांची कसर भरून काढण्यासाठी त्यांच्यावर पक्षबदलासाठी दबाव आलेला. त्यामुळे येत्या निवडणुकीत पक्षाची विदर्भातील आमदारांची संख्या दोन आकडी तरी राहील का, हा प्रश्न साऱ्यांना पडलेला.
फुटीचे हे लोकांना न दिसणारे ग्रहण कधी व कसे संपवायचे यावर नाना पटोले कधी प्रयत्न करताना दिसत नाहीत. ठिसूळ निष्ठेचा शाप लागलेल्या काँग्रसची अवस्था ही अशी. असा दलबदलूपणा झालाच तर वज्रमूठचे यश पुसायला आणखी कुणाची गरज लागणारच नाही. या पक्षातील नेतेच त्यासाठी समर्थ. कोण्या एकेकाळी काँग्रेसचा परंपरागत मतदार मोठ्या संख्येत होता. तेव्हा नेत्यांनी कसेही वागले तरी चालून जायचे. आता तशी स्थिती नाही. मागच्या सदरात म्हटल्याप्रमाणे आता मतदार चाणाक्ष व चोखंदळ झालेला. त्याला आपल्याकडे वळवायचे असेल तर नुसता सत्तापक्षाला विरोध करून भागणारे नाही. तुम्ही काय करता, काय केले व काय करणार हे सांगावे लागणार. अगदी त्याचा विश्वास बसेपर्यंत. यासाठी करावी लागते मेहनत. त्याचा अभाव पक्षात सातत्याने दिसतो. असा पर्यायी कार्यक्रम देण्यासोबतच संघटनात्मक शक्ती, नेत्यांमधील एकी, घराणेशाहीचा त्याग, रस्त्यावर उतरून विरोध करायची ताकद या गोष्टींची गरज आहे. त्या पक्षातील नेत्यांना ठाऊक नाहीत असे नाही. तरीही हे नेते श्रमासाठी तयार होत नाही. हीच खरी पक्षासमोरची अडचण. त्यावर मात केली तरच वज्रमूठच्या यशाचा आलेख पुढे नेता येईल. अन्यथा सभेनंतर काय, हा प्रश्न कायमचा शिल्लक राहील.
देवेंद्र गावंडे