‘लोकसत्ता’च्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या अनोख्या उपक्रमासाठी मराठी वाचनाची आवड निर्माण करण्याचे काम महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापकांनी करावे, असे आवाहन कुलसचिव पूरण मेश्राम आणि उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. अंजली रहाटगावकर यांनी केले.
‘लोकसत्ता’ने एकप्रकारे वैचारिक स्वातंत्र्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले असून विद्यार्थ्यांच्या लेखणीतून टीकाही आमंत्रित केल्याचे कौतुक मेश्राम यांनी केले, तर मराठीचे वाचन करणारे विद्यार्थी दुर्मिळ झाले असून त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्याचे काम महाविद्यालयातील मार्गदर्शकाने करावे, असे आवाहन करीत असतानाच विजेता निवडताना त्याला ‘लाईक’ करण्याचा निकष उथळ आणि वरवरचा असल्याने तो बदलून पंचांनी विजेत्या विद्यार्थ्यांची निवड करावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.
नवीन वर्षांत लोकसत्तातर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘ब्लॉग बेंचर्स’ हा नवीन उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमाची ओळख प्राचार्य व प्राध्यापकांना करून देण्याच्या हेतूने गेल्या शनिवारी येथील वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान महाविद्यालयातील स्वातंत्र्य भवनात या उपक्रमाची माहिती देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाअंर्तगत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लोकसत्तातर्फे खास तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर वैचारिक वाद-प्रतिवाद करण्याची संधी मिळणार आहे. लोकसत्ताने विद्यार्थ्यांना ही चांगली संधी उपलब्ध करून दिली असून याचा लाभ प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी द्यावा, असे आवाहन डॉ. अंजली रहाटगावकर यांनी यावेळी केले.
महाराष्ट्राला वैचारिक मंथनाची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. यातूनच अनेक विचारवंत घडले आहेत. नव्या पिढीतील विद्यार्थ्यांची वैचारिक बैठक आणखी पक्की व्हावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणारा आहे. त्यामुळे प्राचार्यानी यात जास्तीत जास्त विद्यार्थी कसे सहभागी होतील, याकडे लक्ष द्यावे, असे त्या म्हणाल्या. संगणक साक्षरतेच्या या काळात असे उपक्रम राबवण्याचे धाडस लोकसत्ताने केले. ही अभिमानाची बाब आहे. विद्यापीठ या उपक्रमाला पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन देऊन त्या म्हणाल्या, अग्रलेख हा वृत्तपत्राचा आत्मा असतो. वृत्तपत्राची ती अधिकृत भूमिका असते. त्यावर समर्थनार्थ व विरोधी लिखाण मागवण्याचे धाडस लोकसत्ताने या उपक्रमाच्या माध्यमातून केले आहे. असे धाडस दाखणारे हे राज्यातील पहिलेच वर्तमानपत्र आहे. त्यामुळे ही संधी विद्यार्थ्यांनी दवडू नये, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे ब्युरो चीफ देवेंद्र गावंडे यांनी या उपक्रमामागील भूमिका विषद केली. वितरण विभागाचे महाव्यवस्थापक वीरेंद्र रानडे यांनी या उपक्रमाविषयीची माहिती उपस्थित प्राचार्याना दिली. यावेळी प्राचार्यानी काही शंका विचारल्या. त्याचे निरसन करण्यात आले. प्राचार्य व प्राध्यापकांनी या उपक्रमात आमचे महाविद्यालय सहभागी होईल, असे सांगितले.
शिक्षकांपेक्षाही मुले दोन फूट पुढचा विचार करतात. ते जास्त अद्ययावत असतात. या वयातील मुले अक्षरश: ‘वेडी’ असतात. त्यांचे स्वत:चे वेगळेच आयुष्य असते. त्यांना वेगळे काही निर्माण करायचे असते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मुले उपलब्ध होऊ शकतात. लोकसत्ताच्या उपक्रमातून ग्रामीण भागातील मुलांना व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे.
-डॉ. भाऊ दायदार, संचालक, वसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर</strong>
‘ब्लॉग बेंचर्स’मुळे मुले मराठी लिहायला लागतील, पण त्यांचे भाषाविषयक ज्ञानावरही संस्कारही या उपक्रमाच्या माध्यमातून होणे आवश्यक आहे. हा चांगला उपक्रम असून विद्यार्थी विचारशील होण्यास मदत होईल.
-डॉ. मृणालिनी फडणवीस, प्राचार्य, महिला महाविद्यालय, नागपूर
मराठीचे वाचन करणे, चिंतन करणे आणि मराठीतच लिहिणे यासंदर्भातील ‘लोकसत्ता’चा उपक्रम म्हणजे महाराष्ट्राचे मराठीसंबंधीचे धोरण राबवणेच होय. आपण मराठीचा अभिमान बाळगून त्याचा पाठपुरावा करणार नाही, तर दुसरे कोण करणार? आणि लोकसत्ता एकप्रकारे मराठीचा प्रचार करीत आहे.
ज्योती पाटील,प्राचार्य, रेणुका महाविद्यालय, नागपूर
उपक्रम अतिशय वेगळा असून विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण करणारा आहे. मातृभाषेतून हे ब्लॉग लिहायचे असल्याने विचार अधिक चांगले व्यक्त होऊ शकतील. शिवाय, लिहिण्या-वाचण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लोकसत्ताने एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे.
-डॉ. श्रीराम भुस्कुटे, प्राचार्य, भवभुती महाविद्यालय, आमगाव (जि. गोंदिया)