नागपूर : नागपूरला थेट मुंबईशी जोडणाऱ्या समृद्धी द्रुतगती महामार्गामुळे नागपूरच्या उद्योग व व्यवसाय क्षेत्रासाठी जलद वाहतुकीची दारे उघडल्यावर आता नागपूरला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या नागपूर-गोवा ‘शक्तिपीठ’या नव्या द्रुतगती मार्गाचे काम सुरू होत आहे. याचा फायदा भविष्यात शहरात उद्योगवाढीसाठी होणार आहे. मात्र याउलट चित्र ग्रामीण भागात असून निर्यात मर्यादेमुळे संत्री उत्पादकांना वर्षभरात ६०० कोटींचा फटका सहन करावा लागला आहे.
खरेदी केंद्र सुरू न झाल्याने हमीभावापेक्षा कमी दरात कापूस विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. किडीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली. देशात वेगाने प्रगतीकडे झेप घेणाऱ्या शहरामध्ये नागपूरची गणना होत असली तरी त्याची व्याप्ती पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांमुळे शहराची ‘एज्युकेशन’ व ‘मेडिकल’ हब’कडे सुरू असलेली वाटचाल यापुरतीच मर्यादित आहे. मोठे उद्योग सुरू होण्याच्या घोषणा जरी झाल्या असल्या तरी काही आयटी कंपन्यांचा अपवाद वगळता विशेष अशी गुंतवणूक संपलेल्या वर्षांत झाल्याची नोंद नाही.
हेही वाचा >>> रेल्वेत ‘एसी कोच’ला मागणी असल्याने ‘स्लिपर कोच’मध्ये घट; मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणाले…
समृद्धी महामार्गाचा फायदा जलद मालवाहतुकीसाठी होत आहे. समृद्धी कॉरिडॉरच्या बाजूलाच ‘हाय स्पीड ट्रेन’ आणि मालवाहतुकीसाठी लॉजिस्टिक कॉरिडॉर उभारला जाणार आहे. नागपूरलगतचे भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यांना रस्तेमार्गाने जोडण्यात येणार असल्याने भविष्यात नागपूर हे मालवाहतुकीचे हब म्हणून नावारूपास येईल. महामार्गालगत सीएनजी गॅस वाहिनी टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पाइपद्वारे घरोघरी गॅसपुरवठा सुरू होईल.
नागपूरला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या नागपूर-गोवा या दुसऱ्या महामार्गाची घोषणा २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यासाठी निधीची तरतूदही करण्यात आली असून भूसंपादन व अन्य कामाचा आढावा नागपूरचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. महामार्गाचा नागपूर पर्यटनवाढीसाठी फायदा होणार आहे. या मार्गावर ८६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
संत्र्याला फटका
नागपूरच्या संत्र्याच्या निर्यात मर्यादेचा २०२३ मध्ये उत्पादकांना ६०० कोटींवर फटका बसला. नागपुरी संत्रीचा बांगलादेश हा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. रोज सरासरी चार हजार टन संत्री पाठवली जायची. मात्र २०२२-२३ मध्ये तेथील सरकारने प्रतिकिलो ८८ रुपये निर्यात शुल्क आकारणी सुरू केल्याने निर्यात रोज शंभर टनापर्यंत खाली आली.
मेट्रो टप्पा-२ च्या कामाला सुरुवात
नागपूर शहरालगत २५ किलोमीटर परिसरातील छोटया शहरांना जोडणाऱ्या मेट्रो-टप्पा-२ चे काम २०२३ मध्ये सुरू झाले. ४३.८ किलोमीटर लांबीचा हा टप्पा हिंगणा, कन्हान, बुटीबोरी एमआयडीसी आणि पार्डीला जोडणार आहे. टप्पा दोन पूर्ण झाल्यावर ग्रामीण भागासाठी सुरक्षित व जलद सार्वजनिक वाहतुकीचे साधन उपलब्ध होईल.
झगमगाटाखालील अंधार
नागपूर शहरात सर्वत्र सिमेंटचे रस्ते, बहुपदरी उड्डाणपूल, भुयारी मार्ग बांधल्याने शहराचा चेहरामोहरा बदलल्याचे चित्र डोळयापुढे येत असले तरी ते करताना नियोजन न केल्याने त्याचे चटके नागपूरकरांना सहन करावे लागत आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये काही तासांच्या अतिवृष्टीने संपूर्ण शहर पाण्याखाली बुडाले होते. रस्तेबांधणी करताना त्यावरील पाण्याच्या निचऱ्याचा विचारच केला गेला नाही. त्याचा परिणाम दिसला.