गडचिरोली : जिल्हा हिवताप कार्यालयातून पाच लाख किमतीचे १८ मायक्रोस्कोप यंत्र चोरीस गेले होते. याप्रकरणी ‘लोकसत्ता’ने चालविलेल्या वृत्तमालिकेची दखल घेत प्रशासनाने अखेर भांडारपाल अशोक पवार याला निलंबित केले आहे. या कारवाईमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून पवार याची पाठराखण करणारे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी देखील आता अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
जिल्हा हिवताप कार्यालयाने एप्रिल महिन्यात मायक्रोस्कोप यंत्रांची खरेदी केली होती. साठा नोंदवहीत याची नोंद घेतली होती. २२ पैकी चार नग आरोग्य संस्थांना वितरित केले होते तर १८ नग भांडार विभागात ठेवले होते. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात ते चोरीस गेले. ही बाब निदर्शनास आल्यावर गडचिरोली ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस अद्याप चोरापर्यंत पोहोचू शकले नाहीत. प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.पंकज हेमके यांनी या प्रकरणात भांडारपाल अशोक पवार यांच्यावर निष्काळजी व हलगर्जीचा ठपका ठेवत २१ सप्टेंबर २०२३ रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली. याचा पवार यांनी खुलासाही दिला होता. परंतु आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खास मर्जीतील असल्याने भांडारपाल पवार यांची पाठराखण केल्या जात होती. ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण लावून धरल्यानंतर अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार डॉ. हेमके यांनी पवार यांना निलंबित केले. निलंबन काळात त्यांना धानोरा हत्तीरोग पथकात हजेरी लावावी लागणार आहे. याविषयी डॉ. हेमके यांना विचारणा केली असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.
हेही वाचा >>>वेळ देऊन निघून जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांना परत बोलवा… भंडाऱ्यात नागरिकांचा रास्तारोको
इतर खरेदीही संशयाच्या फेऱ्यात
हिवताप विभागातून यापूर्वीही मायक्रोस्कोप चोरी गेले होते. त्यानंतर भांडार शाखेत सुरक्षेबाबत प्रभावी उपाय आवश्यक होते, पण पुन्हा पाच लाखांचे मायक्रोस्कोप चोरीस गेल्याने खळबळ उडाली. चोरीच्या घटनेनंतर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. परंतु आजपर्यंत हे उपाय का केले गेले नाही. असा प्रश्न उपस्थित होतो आहे. दुसरीकडे आरोग्य विभागातील खरेदीवर देखील संशय व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळेकागदोपत्री दाखवून प्रत्यक्षात ती वस्तू न घेता चोरी झाल्याचा बनाव तर रचण्यात आला नाही. अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे.