व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांचे प्रतिपादन; लोकसत्ताच्या ‘विदर्भरंग’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

संशोधन कुठलेही असो ते फक्त कागदाची शोभा वाढवण्यासाठी असता कामा नये. त्या संशोधनाचा उपयोग तळागाळातील लोकांच्या हितासाठी व्हायला हवा, असे प्रतिपादन  विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांनी केले. ‘लोकसत्ता’च्या विदर्भरंग दिवाळी अंकाचे प्रकाशन आज, मंगळवारी  त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी लोकसत्ता विदर्भ आवृत्तीचे प्रमुख देवेंद्र गावंडे, वितरण विभागाचे उपमहाव्यवस्थापक वीरेंद्र रानडे, जाहिरात विभाग व्यवस्थापक विजय संत उपस्थित होते.

डॉ. पडोळे पुढे म्हणाले, तरुण संशोधकांना वाहिलेला दिवाळी अंक पाहून मनस्वी आनंद होत आहे. आज देशाला तरुण संशोधकांची गरज आहे. सोबतच या तरुणाईने केलेल्या संशोधनाला जगासमोर आणण्यासाठी व ते किती समाजोपयोगी आहे, हे सांगणाऱ्या माध्यमांचीही मोठी गरज आहे. लोकसत्ताने दिवाळी अंकात या विषयाला प्राधान्य देवून त्या दिशेने एक विधायक आणि तरुण संशोधकांना आश्वस्त करणारे पाऊल टाकले आहे, अशा शब्दात त्यांनी ‘विदर्भरंग’चे कौतुक केले. सोबतच व्हीएनआयटीतून होणारे संशोधन, आयआयटीवर मात करून व्हीएनआयटीने संशोधनात पटकावलेला पुरस्कार, शेतकऱ्यांसाठी तयार केलेले तंत्रज्ञान आणि त्याचा वर्धेत होत असलेला वापर तसेच गावकऱ्यांना उपयोगी पडतील असे तयार करण्यात आलेले अगरबत्ती यंत्र याबाबत सविस्तर माहिती दिली. संशोधन क्षेत्राला वाहिलेल्या दिवाळी अंकाच्या निर्मितीमागची भूमिका देवेंद्र गावंडे यांनी मांडली. विदर्भातील तरुणाईत संशोधन क्षमता आहे, ते संशोधन करत आहेत, पण त्याला वाव मिळत नाही. हा अंक त्यासाठी एक पथदर्शक ठरेल, असा विश्वास गावंडे यांनी व्यक्त केला.

वीरेंद्र रानडे यांनी वितरण व्यवस्थापनाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन शफी पठाण यांनी केले. यावेळी संपादकीय, वितरण व जाहिरात विभागातील सहकारी उपस्थित होते.