सभागृहात प्रचंड हशा, तेवढेच क्षणभर गांभीर्य. साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू.. लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात सकाळपासून सुरू झालेले आसू आणि हसूचे हे वातावरण सायंकाळपर्यंत कायम होते. निमित्त होते सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत लोकसत्ता लोकांकिकाच्या विभागीय अंतिम फेरीचे!
विभागीय फेरीची सुरुवात गंभीर विषयाने झाली, पण दुसऱ्याच नाटकाने सभागृहात हशा पिकवला. कधी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट तर कधी शिटय़ांची दाद. नाटक सादर करणारे विद्यार्थी कलावंत आणि त्या विद्यार्थी कलावंतांना दाद देणारेही विद्यार्थीच. लोकसत्ताने लोकांकिकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिलेल्या या संधीचा फायदा त्यांनी घेतला आणि रसिकप्रेक्षकांनीही त्यांना तितकीच दाद दिली. हा रसिकप्रेक्षक त्यांच्याच वयाचा नव्हता तर त्यांच्या आधीच्या आणि त्याही आधीच्या पिढीचा सहभाग होता. त्यामुळे त्यांचा प्रतिसाद बघून नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थी कलावंतांचा अभिनय आणखीच बहारदार होता. नेपथ्यासहीत झालेल्या आजच्या विभागीय अंतिम फेरीच्या सादरीकरणाने वेगळीच रंगत भरली. हा उत्साह प्रत्येक नाटकागणिक वाढत गेला आणि सभागृह हश्या, टाळ्यांनी दुमदुमून गेले. यावेळी सभागृहातीलच काही विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादानंतर त्यांनी पुढील वर्षी सहभागी होण्याची मनीषा व्यक्त केली. एवढेच नव्हे तर कित्येकजण सभागृहातून बाहेर पडताना त्या नाटकातले संवाद म्हणत पायऱ्या उतरताना दिसले. जी नाटके विभागीय अंतिम फेरीत आली नाहीत, त्या नाटकातील कलावंतसुद्धा यावेळी उपस्थित होते. पुढल्या वर्षी त्यांनीही विभागीय अंतिम फेरीत येण्यासाठी आतापासून तयारी करणार असल्याचे सांगितले. ज्येष्ठ रसिकप्रेक्षकांनीही या विद्यार्थी कलावंतांचे भरभरुन कौतुक केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा