नागपूर : महाविद्यालयीन नाटय़विश्वातील प्रतिष्ठेच्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा पडदा आज, शुक्रवारी उघडणार आहे. गेल्या दीड महिन्यापासून कसून तालीम केल्यानंतर आता प्राथमिक फेरीसाठी सादरीकरणाची वेळ येऊन ठेपली आहे. नागपूर केंद्राच्या विभागीय प्राथमिक फेरीने स्पर्धेची सुरुवात होईल.
उत्साहाने सळसळणाऱ्या महाविद्यालयीन तरुणाईच्या नाटय़गुणांना ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या रूपाने हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. राज्यभरातील कानाकोपऱ्यातून महाविद्यालयीन विद्यार्थी या स्पर्धेच्या मंचावर एकत्र येतात. विभागीय प्राथमिक फेरी, त्यानंतर विभागीय अंतिम फेरी जिंकल्यानंतर निवडलेल्या एकांकिका मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. आठ केंद्रांवरील महाविद्यालये, तेथील तरुणाईचा नाटय़ाविष्कार आणि सर्जनशील अविष्काराची जुगलबंदी असे अनोखे वातावरण या स्पर्धेच्या निमित्ताने अनुभवायला मिळते. विषयांची वैविध्यपूर्ण हाताळणी, राज्यभरातील संघांमध्ये होणारी चुरस यामुळे मराठी नाटय़ आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचेही या स्पर्धेकडे विशेष लक्ष असते. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेने नाटय़वर्तुळात वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक कलाकारांना सिने, नाटय़ क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. मान्यवरांचे मार्गदर्शन, एकांकिकेतून चित्रपट-मालिका क्षेत्रात जाण्याची सुवर्णसंधी आणि ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांची महाअंतिम फेरीसाठी लाभणारी प्रमुख उपस्थिती अशा वेगवेगळय़ा कारणांमुळे स्पर्धेची राज्यभरात आतुरतेने वाट पाहिली जात आहे. ही प्रतीक्षा आता संपली आहे. नागपूरमध्ये आज आणि उद्या प्राथमिक फेरी रंगणात आहे.
प्राथमिक फेरीत उत्तम सादरीकरण करणाऱ्या एकांकिकांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड केली जाईल. नागपूरपाठोपाठ नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी, औरंगाबाद अशा आठ केंद्रांवर क्रमाक्रमाने प्राथमिक फेरी रंगणार आहे.
नागपूरमध्ये कुठे?
नागपूरमध्ये २ आणि ३ डिसेंबरला प्राथमिक फेरी रंगेल. ती सर्वोदय आश्रम, विनोबा विचार केंद्र, बोले पेट्रोल पंप येथे सकाळी १०.३० वाजल्यापासून होणार आहे.
प्रायोजक
लोकसत्ता आयोजित ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा सहप्रायोजक ‘झी युवा’ आणि ‘टुगेदिरग’च्या सहकार्याने पार पडणार आहे. ही स्पर्धा पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ आणि ‘केसरी टूर्स’तर्फे आहे. साहाय्य ‘अस्तित्व’चे आहे. लोकांकिकेच्या मंचावरील कलाकारांच्या कलागुणांना चित्रपट, मालिकेत संधी देणारे ‘आयरिस प्रॉडक्शन’ टॅलेंट पार्टनर आहेत.