पहिल्या दिवशीच्या नऊ एकांकिकांच्या सादरीकरणानंतर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याच उत्साह आणि त्याच उत्कंठापूर्ण वातावरणात ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या नागपूर विभागाच्या प्राथमिक फेरीचा दुसरा दिवस पार पडला. नागपूरसह विदर्भातील वर्धा, चिखली, गोंदियाच्या विद्यार्थी कलावंतांनी उत्कृष्ट सादरीकरण केले.
नक्षलवादापासून तर थेट वेश्याव्यवसायातील तगमग, आवेग अशा संमीश्र भावनांची नाटके शुक्रवारी, दुसऱ्या दिवशी सादर करण्यात आली. ‘तिरपुडे इन्स्टिटय़ुट ऑफ मॅनेजमेंट’ने ‘सी तारे मुन वर’ या नाटकातून पोलीस खात्याचा विषय हाताळला. तर चंद्रपूरच्या ‘शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालया’ने युवकांमध्ये वाढत चाललेली व्यसनाधिनता ‘व्यसन झालं फॅशन’ या नाटकातून समोर मांडली. ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ आणि ‘अस्तित्त्व’ यांच्या सहकार्याने शुक्रवारी सादर झालेल्या आठ नाटकांपैकी विठ्ठलराव खोब्रागडे, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नागपूरच्या ‘विश्वनटी’ या नाटकाने अवघे सभागृह स्तब्ध झाले. या स्पध्रेसाठी नॉलेज पार्टनर म्हणून ‘स्टडी सर्कल’ची साथ लाभली आहे. तर रेडिओ पार्टनर म्हणून ‘९३.५ रेड एफएम’ आणि टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्र’ काम सांभाळत आहेत. आयरिस संस्था टॅलेन्ट पार्टनर आहे.
रत्नागिरी विभागातून पाच संघांची निवड
रत्नागिरी : लोकसत्ता लोकांकिका स्पध्रेच्या विभागीय अंतिम फेरीसाठी रत्नागिरी विभागातून शुक्रवारी पाच संघांची निवड करण्यात आली. गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (भोग), नवनिर्माण महाविद्यालय (गिमिक), डीबीजे महाविद्यालय, चिपळूण (अपूर्णाक), स. का. पाटील महाविद्यालय, मालवण (फ्लाईंग क्वीन्स) आणि कला वाणिज्य महाविद्यालय, ओरोस (संजीवनी) या महाविद्यालयांच्या संघांचा त्यामध्ये समावेश आहे. येथील पटवर्धन हायस्कूलच्या भागोजी कीर सभागृहात दिवसभर चाललेल्या या स्पध्रेला महाविद्यालयीन युवक-युवतींचा उदंड उत्साहात उत्तम प्रतिसाद लाभला. अंधश्रध्दा, माणसाला असलेली पूर्णत्वाची ओढ, समाजाचा स्त्रीकडे पाहण्याची दृष्टीकोन, कलासक्त माणसाच्या वैयक्तिक जीवनातील तणाव इत्यादी विषय या एकांकिकांमधून अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आले.
नगरमध्ये लोकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून ‘वारूळातील मुंगी’ (न्यू आर्टस, कॉमर्स व सायन्स महाविद्यालय, नगर), ‘प्रतिगांधी’ (बाळासाहेब भारदे महाविद्यालय, शेवगाव), ‘घुसमट’ (डी. जे. मालपाणी महाविद्यालय, संगमनेर), ‘ड्रायव्हर’ (पेमराज सारडा महाविद्यालय, नगर) आणि ‘तपोवन’ (अहमदनगर महाविद्यालय) या पाच लोकांकिका विभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या आहेत. या फेरीत एकूण नऊ लोकांकिका सादर झाल्या.