नागपूर : ‘लोकसत्ता लोकांकिका’ची नागपूर विभागीय प्राथमिक फेरीला रविवारी उदंड प्रतिसादात सुरुवात झाली. महाविद्यालये, विद्यार्थ्यांकडून या स्पर्धेला जोरदार प्रतिसाद लाभला असून दमदार सादरीकरण सुरू आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ ही विद्यार्थ्यांना त्यांचे नाट्यगुण सादर करण्यासाठीची राज्यातील महत्त्वाची स्पर्धा आहे. त्यामुळेच राज्यभरातील आंतरमहाविद्यालयीन नाट्यविश्वात ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेची वेगळी ओळख आहे. सिने-नाट्यसृष्टीतील जाणकारांचे लक्ष या स्पर्धेकडे असल्याने या स्पर्धेतील कलाकारांना नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका अशा माध्यमांमध्ये काम करण्याची संधी मिळते, हे ‘लोकसत्ता लोकांकिका’चे वैशिष्ट्य आहे.
नागपूर विभागातील महाविद्यालयांकडून एकांकिकांमध्ये केले जाणारे प्रयोग आगळेवेगळे असतात. त्यामुळे दरवर्षीच या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत चुरस पाहायला मिळते. यंदाही या स्पर्धेला विद्यार्थी, महाविद्यालयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. नागपूर केंद्रावरील प्राथमिक फेरी रविवारी सकाळी सुरू झाली. सर्वोदय आश्रम, विनोबा विचार केंद्र, बोले पेट्रोल पंपजवळ येथील सभागृहात प्राथमिक फेरीला शासकीय दंत महाविद्यालय नागपूरच्या नाटकाने सुरुवात झाली. तंबाखूच्या व्यसनाने ग्रासलेल्या समाजाला व्यसनमुक्तीचा संदेश या नाटकाने दिला. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरच्या नाटकाने तरुणाईला त्यांच्या सामाजिक कर्तव्याची जाणीव करून दिली. यावेळी प्रेक्षकांचाही उदंड प्रतिसाद होता. प्राथमिक फेरीत सादरीकरण करणाऱ्यांची विभागीय अंतिम फेरीसाठी निवड होणार आहे. त्यात सर्वोत्कृष्ट ठरणारी एकांकिका मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फेरीसाठी निवडली जाईल.
हेही वाचा…रस्ते अपघातांतील बळींमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर
अमरावती विभागाची प्राथमिक फेरी सोमवारी
अमरावती विभागातही यंदा प्राथमिक फेरी होणार आहे. सोमवार ९ डिसेंबरला जेसीआय गोल्डन ट्रेनिंग हॉल, शिवाजी डी.एड. कॉलेज अमरावती येथे ही स्पर्धा होणार आहे. प्राथमिक फेरीत दमदार सादरीकरण करून विभागीय अंतिम फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत.
हेही वाचा…नागपूर हिवाळी अधिवेशन पाचच दिवसांचे ? वैदर्भीय नाराज
प्रायोजक
मुख्य प्रायोजक : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण
सहप्रस्तुती : सॉफ्ट कॉर्नर
सहप्रायोजक : झी टॉकीज, केसरी टूर्स, भारती विद्यापीठ
पॉवर्ड बाय : एन एल दालमिया, फ्यूजनफ्लिक्स
साहाय्य : अस्तित्व
टॅलेंट पार्टनर : आयरिस प्रोडक्शन्स