निषेध! निषेध! निषेध! डॉ. अक्षयकुमार काळे यांचा तीव्र निषेध. अहो, असाल तुम्ही थोर समीक्षक, लिहिले असतील तुम्ही अनेक ग्रंथ, झाले असाल साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. म्हणून काय तुम्ही कुणाच्या पेहरावावर भाष्य कराल? नाही काळे नाही, नागपूरचे सारस्वतांचे वर्तुळ हे अजिबात खपवून घेणार नाही. तुम्हाला ठाऊक आहे मनीषा अतुल कोण आहेत? जागतिक कीर्तीच्या कवयित्री, आधुनिक व परखड कवितेच्या जनक आहेत त्या. त्यांच्या कीर्तीची महती जाणून न घेता त्यांच्या संपादन कौशल्यावर भाष्य करण्याची हिंमत कशी झाली तुमची? बोलावले साहित्य संघाने म्हणून निघाले तुम्ही लगोलग, तेही ‘योग्य’ पेहराव करून. ही सवय बदला आता. तो संघ केव्हाच उजव्यांच्या ताब्यात गेलाय. त्यामुळे ‘त्या’ नामधारी अध्यक्षांच्या विनवणीला भविष्यात तरी भुलू नका. अहो, तुम्ही काही झाले तरी जुन्या काळातले प्राध्यापक. शिकवता शिकवता तुम्ही लिहिते झाले. आस्वादक समीक्षा करते झाले. तुम्ही ज्या महनियांचा अभ्यास केला ते सारे प्राचीन. आताच्या पिढीसाठी विस्मृतीत गेलेले. तुमचा नव्या पिढीशी, त्यातल्या लिहित्यांशी संबंध काय? लिहिण्यासोबत ‘दिसणेही’ तेवढेच महत्त्वाचे असा प्रागतिक विचार करणारी ही पिढी. त्यातले कवी, लेखक तुम्हाला कसे कळणार? मग जे ठाऊक नाही त्यात सहभागी व्हायचेच कशाला?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या नव्या प्रतिभावंतांना केवळ स्तुती ऐकायची सवय असते हेही तुम्हाला ठाऊक नाही. त्यामुळेच तुमची जबर गोची झालीय. कशाला उगीच त्या ‘कथित’ ग्रंथावर टीका करायला गेलात. तुम्हाला वाटले टीका प्रसिद्ध होईल व समीक्षेचे कौतुक होईल पण झाले भलतेच. आजकाल असे अडचणीचे ठरू शकणारे विषय झाकोळून टाकण्याची बरीच ‘हत्यारे’ आलीत बाजारात. त्यातलेच एक वापरून आणले ना तुम्हाला ‘बॅकफूट’वर. आता बसलात खुलासे करत. अहो, नातवंडात रमण्याचे तुमचे वय. उगीच कशाला या नव्यांना समीक्षेची ओळख करून देता? आजकाल चेहरे बघून गोडगोड समीक्षा करणाऱ्यांची फौजच तयार झालीय समाजमाध्यमावर. त्यातच हे नवे ‘लेखकू’ रमतात. या स्तुतीमुळे आपण कधीच चुकत नाही असा ठाम (अति नाही) आत्मविश्वास निर्माण झालाय त्यांच्यात. त्याला तडा देण्याची हिंमत दाखवायची गरजच काय होती. काळे, गेला तो तुमचा काळ. ज्यात असे ग्रंथ तयार करताना पाळायचे संकेत अस्तित्वात होते. ग्रंथ कवींवरचा असेल तर नावाजलेली नावे सुटू नये याची दक्षता घेण्याची हमी होती. इतर कवींचा आढावा घेताना स्वत:चे तुणतुणे वाजवू नये अशी नम्र भावना बाळगणारे संपादक होते. आता जग पार बदलले. कवी तर नेहमी काळाच्या पुढे. त्यामुळे ते जरा जास्तीच बदलले. त्यांना हे संकेत, दक्षता, हमी, भावना कशी काय कळणार? मग जे ठाऊकच नाही ते असायला हवे अशी अपेक्षा तुम्ही का करता? एकतर या कवींना प्रसिद्धीची फार संधी मिळत नाही. मिळाली तरी त्यांची दखल कुणी घेत नाही. इतकी वाईट स्थिती असताना कुणाला संपादनाच्या नावावर मिळाली संधी व दामटले त्याने आपले घोडे समोर तर तुम्ही अस्वस्थ होण्याचे कारण काय?

हेही वाचा : नागपूर : गंगाजमुनातील वारांगणा; पोलिसांचा छापा अन् ग्राहकांची पळापळ…

आजकालचा जमानाच ‘स्वप्रसिद्धी’चा झालाय. तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्या जुल्फी शेख, वर्षा चौबे, स्वाती सुरंगळीकर, विजया मारोतकर, सना पंडित, सुषमा मुलमुले, सुनील अवचार, आनंद देशपांडे, बळवंत भोयर हे सारे जुने झालेले. का म्हणून त्यांची दखल या ग्रंथात घ्यावी? ती घेण्यासाठी आधी त्यांच्या कविता वाचाव्या लागतात. तेवढा वेळ तरी आहे का या नव्या पिढीच्या संपादकांजवळ. यावर तुम्ही विचार करायला हवा होता काळे सर! अशा ग्रंथात कालक्रम पाळला जायला हवा ही तुमची आणखी एक अपेक्षा. तीही चूक. अहो, सध्याचे ‘लिहिते’ वर्तमानात जगणारे. आताच इतकी वाहवा त्यांच्या वाट्याला येते की त्यातून त्यांना बाहेर पडायलाच वेळ नाही. त्यांच्या वर्तुळात भूतकाळ नावाची गोष्टच नाही. वर्तमानात जगायचे व आणखी कसे नाव होईल याच आशेने भविष्यकाळाकडे बघायचे एवढेच त्यांना ठाऊक. त्यांच्याकडून अपेक्षाच तुम्ही कशी करता? साहित्य संघाने हे ‘टुकार’ प्रकरण कसे खपवून घेतले हाही प्रश्न गैरलागू. हा संघ म्हणजे बिनबुडाचा लोटा हे तुम्हाला अजूनही कळलेले नाही. मुळात साहित्याशी या संघाचा संबंधच काय असा प्रश्न तुम्हाला पडायला हवा, इतिहासात डोकावून न बघता! या ग्रंथाच्या ज्या संपादक आहेत त्यांची कविता इतकी ‘आशयद्रव्य’ असूनही त्यावर कुणीही समीक्षा का केली नाही हा चर्चेत आलेला मुद्दा सुद्धा निरर्थक. अहो, आजकाल समीक्षक उरलेतच कुठे? आणि जे आहेत त्यांचे ‘जड’ शब्द वाचणार कोण? शिल्लक असलेल्या मोजक्या ‘खडूस’ समीक्षकांच्या घरी कवींनी चकरा मारायच्या का? असे करणे म्हणजे प्रतिभासन्मानाला ठेचच की जणू! त्यापेक्षा समाजमाध्यमावर आहेत की पायलीचे पन्नास समीक्षक. ते कविता कशी यापेक्षा कवी कोण हे बघून लगेच लिहितात व काही क्षणात त्यांच्या समीक्षेला हजारो लाईक्स, शेअर मिळतात.

हेही वाचा : अकोल्यातील हरिहर पेठ भागात पुन्हा वाद; दोन दिवसांत दुसऱ्यांदा…

अहो काळे, हे आभासी जग तुम्हाला ठाऊक नाही काय? नसेल तर ते नातवांकडून माहिती करून घ्या एकदा. या जगात कुणी कुणाला दुखवायचे नाही असा अलिखित नियमच. नेमका तोच तुम्हाला ठाऊक नसल्याने तुम्ही ग्रंथाच्या संपादिकेला दुखावले व उजव्यांच्या शिव्या खात बसलात. सुखदेव ढाणके, प्रभा गणोरकर, श्रद्धा पराते, आशा पांडे अशा ज्येष्ठ कवींचा नुसता उल्लेख कसा असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो, साहित्य संघाला सध्या दुरून न्याहाळणाऱ्या अभिजनांना पडू शकतो पण लाईक्स व शेअरचा नाद जडलेल्या नव्यांना नाही हे तुम्हाला कळायला हवे काळे! कविता कालातीत असली तरी कवीचा एक काळ असतो. तो संपला की सारे विस्मृतीत हे आभासी युगाचे तत्त्व. तेच तुम्हाला ठाऊक नसेल तर कसे? तुम्ही त्यांच्या पेहरावावर केलेले भाष्य वडीलकीच्या नात्याने होते हा युक्तिवाद सुद्धा आताच्या काळाला न मानवणारा. अहो, आजकाल तुम्ही कोण यापेक्षा तुम्ही कोणत्या कळपात यावरून वडीलकीची व्याख्या ठरते. हे कळप निवडणे तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या जगण्यालाच काही अर्थ नाही हेच वर्तमानातले वास्तव. ते आधी तुम्ही समजून घ्या व मगच साहित्य संघाच्या निमंत्रणावर विचार करा. समाजमाध्यमावर टीकेसाठी आसुसलेल्या हातांची संख्या शेकड्याने वाढलेली. सापडला ‘राँगसाईड’ला की दे बत्ती असाच या माध्यमाचा नियम. त्यात अन्यायाचा टाहो फोडणारी ‘ती’ असेल तर मग धरणीकंप झालाच म्हणून समजा. तेव्हा काळे सर, दर्जाचा आग्रह व समीक्षेच्या हौसेवर आवर घाला व योग्य तो कळप तातडीने निवडा. मगच तुमचा योग्य तो मानसन्मान राखला जाईल. तूर्तास साहित्य संघाला या ‘दिव्य’ ग्रंथाबद्दल शुभेच्छा!

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokjagar article on dr akshaykumar kale who criticizes poet manisha atul css