‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ हा अलीकडच्या दहा वर्षात परवलीचा झालेला शब्द. एकदा या शाळेची निर्मिती करण्यात यश आले की निवडणूक जिंकणे सोपे. उत्तरेकडील गायपट्ट्यात याचाच आधार घेत अनेक मतदारसंघात निर्माण केलेला प्रभाव सत्ताधाऱ्यांना फायद्याचा ठरत आला. १४ व १९ अशा दोन विजयानंतर या प्रयोगाची व्याप्ती वाढवण्याचे काम परिवाराकडून अगदी सूत्रबद्ध पद्धतीने सुरू झाले. जे यश उत्तरेत मिळते ते महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यावर अशी शाळा उभारण्यासाठी अनेक ठिकाणांचा शोध घेणे सुरू झाले. यातून निवड झाली ती अमरावतीची. गेल्या पाच वर्षात अमरावतीत जे घडले ते नुसते डोळ्यासमोर आणले तरी प्रत्येकाला या प्रयोगामागील हेतू स्वच्छपणे दिसायला लागेल. याच्या अंमलबजावणीसाठी सत्ताधाऱ्यांच्या हाताला आयत्या गवसल्या त्या नवनीत राणा. सिनेसृष्टीची पार्श्वभूमी असल्यामुळे कॅमेऱ्यासमोर सहज वावरायची, बोलायची सवय. अभिनय कौशल्य व हजरजबाबीपणा. स्थानिक तसेच राष्ट्रीय भाषांवर प्रभुत्व. वातावरणनिर्मितीसाठी म्हणा की एखादे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी आवश्यक असलेले सारे गुण त्यांच्यात होतेच. त्याला फक्त हिंदुत्वाची जोड दिली की झाले हे लक्षात येताच या प्रयोगाला जोमाने सुरुवात झाली. मग सुरू झाला हनुमानचालिसा ते हिंदूशेरणीपर्यंतचा प्रवास. तो केवळ परिवाराच्याच नाही तर त्याबाहेर असलेल्या अनेकांच्या डोळ्यांना सुखावणारा होता. याचे सारे श्रेय गेले ते राणा यांच्या अदाकारीला.

एकदा का अशा धार्मिक डोहात लोक तरंगू लागले की सर्वांना वास्तवाचा विसर पडतो. प्रयोगशाळेचे आयोजकत्व घेतलेल्या परिवाराला तेच हवे होते. इतकी सशक्त पटकथा गुंफल्यावर राणांनाच उमेदवारी मिळणार हे अगदी उघड होते. राजकारण हा गंभीरपणे हाताळण्याचा विषय आहे. यात सक्रिय असलेल्यांनी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी, देशहिताचे मुद्दे हाताळण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे अशी अपेक्षा असणारे अनेकजण आहेत. अमरावतीच्या सत्ताधारी वर्तुळात सुद्धा असे अनेक लोक होते. म्हणून त्यांना राणा नको होत्या पण प्रयोगशाळेची सूत्रे हाताळणाऱ्या वरच्यांनी काहीही ऐकले नाही. एकदा का हा प्रयोग यशस्वी झाला तर त्याची व्याप्ती विदर्भात वाढवता येईल. राणांना अखिल भारतीय स्तरावरचा चेहरा म्हणून समोर आणता येईल हेच डावपेच यामागे होते. अमरावतीची निवडणूक आटोपल्याबरोबर राणांना थेट ओवेसींच्या हैदराबादमध्ये धाडले गेले यावरून हे सहज लक्षात येईल. या पार्श्वभूमीवर राणांच्या पराभवाकडे बघायला हवे. अमरावतीच्या मतदारांनी हा प्रयोग सपशेल नाकारला. कोणत्याही राजकीय विश्लेषक अथवा नेत्यापेक्षा सामान्य मतदार किती सजग असतो. मत ठरवताना तो विवेक ढासळू देत नाही. समूह म्हणून तो सारासार विचार कसा करतो याचे दर्शन देशभर लागलेल्या निकालातून झालेच पण अमरावतीत त्याचे मनोज्ञ दर्शन घडले.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
mamata banerjee latest marathi news
विश्लेषण : ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व ममतांकडे? राज्यांतील पराभवानंतर काँग्रेसच्या स्थानाला धक्का…
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
mahavikas aghadi mla
अन्वयार्थ : आत्मपरीक्षणाऐवजी बहिष्कार‘नाट्य’!
Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil : “तेव्हाच सांगितलं होतं आधी निवडून तर या”, राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल
Sharad Pawar News
Chandrashekhar Bawankule : “शरद पवारांनी या वयात खोटारडेपणा करु नये, पराभव स्वीकारावा आणि..”, भाजपाच्या ‘या’ नेत्याची टीका

तसा हा मतदारसंघ शेतीप्रधान. येथील व्यापारपेठ सुद्धा पूर्णपणे शेतीवर अवलंबून. या क्षेत्रात अठरापगड जातींचा समावेश. हिंदू व मुस्लिमांची संख्याही भरपूर. एवढे असूनही भाईचारा अथवा सामाजिक सौहार्द टिकवण्यात आजवर सारेच हातभार लावत आलेले. महालक्ष्मीच्या भोजनपंक्तीत दोन्ही धर्माचे लोक आनंदाने बसणारे. सकाळची काकडआरती व अजान एकाचवेळी होत असेल तरी त्यावर हरकत न बाळगणारे. शेतीच्या व्यवहारात धार्मिक भेदाला अजिबात स्थान न देणारे. अशी परिस्थिती असताना हा प्रयोग यशस्वी होईल की नाही याविषयी अनेक जाणत्यांच्या मनात शंका होतीच. ती नव्हती केवळ परिवारात. राणांची प्रतिमा हा प्रयोग तारून नेईल याविषयी तो कमालीचा आश्वस्त होता. त्याला या पराभवाने जोरदार झटका दिला. विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असे बिरुद मिरवणाऱ्या अमरावतीचे प्रश्नही तसे गंभीर. तेही प्रामुख्याने कृषीक्षेत्राशी संबंधित. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा कायम चर्चेत राहणारा. कृषीक्षेत्राचा विकास करायचा असेल तर राजकीय पातळीवर प्रचंड मेहनत घ्यावी लागते. हा विषय जेवढा राज्याशी तेवढा केंद्राशी सुद्धा संबंधित. या मुद्यांवर खासदार म्हणून नवनीत राणांची कामगिरी शून्य होती. पेरणीचा हंगाम सुरू झाला की मेळघाटातील एखाद्या गावात जाऊन वखरणी किंवा नांगरणी करणे, तीही कॅमेऱ्यांच्या साक्षीने. एवढेच काम त्यांनी मनापासून केले. असा देखावा निर्माण केला की सुटले शेतीचे प्रश्न असेच कदाचित त्यांना वाटत असावे.

शेती हा प्रश्न राजकारणातील भल्याभल्यांना अजून समजलेला नाही. राणा तर फार दूरची गोष्ट. अमरावतीत रोजगारनिर्मितीचा प्रश्न अत्यंत गंभीर. त्याला कधी त्यांनी हात घातलेला दिसला नाही. येथे वस्त्रोद्योग पार्क उभे झाले ते फडणवीसांच्या प्रयत्नाने. त्यात राणांचा कवडीचाही सहभाग नव्हता. विमानतळाच्या मुद्यावर त्यांनी काहीकाळ चित्रणबाजी करून सरकारचे लक्ष वेधले पण ही सेवा सामान्यांच्या जीवनात फारशी महत्त्वाची कधी नसतेच. याचा फायदा झालाच तर तो नेत्यांना तेवढा होतो. मेळघाट हा याच मतदारसंघाचा भाग. तिथे प्रत्येक सणाला हजेरी लावणाऱ्या राणा कधी कुपोषण, आरोग्याच्या प्रश्नावर बोलताना दिसल्या नाहीत. केंद्र व राज्याशी संबंधित कोणतेही काम होताना दिसले की हळूच पत्र पाठवून द्यायचे हाच त्यांचा खाक्या. भारत डायनामिक हा क्षेपणास्त्र तयार करणारा कारखाना अमरावतीत प्रस्तावित होऊन कित्येक वर्षे लोटली. हा पूर्णपणे केंद्राच्या अखत्यारितला विषय. यावर त्या पाच वर्षात चकार शब्द बोलल्या नाहीत. कदाचित हे प्रकरण त्यांना ठाऊकही नसावे. अपक्ष असल्यामुळे सुदैवी ठरलेल्या राणांना लोकसभेत बोलण्याची संधी अनेकदा मिळाली. त्याचा फायदा मतदारसंघासाठी करून घ्यावा असे त्यांना वाटले नाही. त्यांच्या एकाही भाषणात अमरावतीतील समस्यांचा उल्लेख नव्हता. जिथे जाईल तिथे कॅमेऱ्यांचा गोतावळा सोबत ठेवायचा. प्रयोगाच्या प्रभावाने भारलेल्या दांडकेधाऱ्यांना सोबत ठेवायचे व केवळ प्रसिद्धीच्या जोरावर सक्रिय असण्याचा भास निर्माण करायचा. गेली पाच वर्षे राणांनी नेमके हेच केले. त्यांची ही कथित सक्रियता हिंदुत्ववाद्यांनी बरोबर हेरली व प्रयोगशाळेसाठी त्यांची निवड केली. यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंपासून तर शरद पवारांपर्यंत साऱ्यांना ललकारणे सुरू केले. यातून अमरावतीचे नाव देशभर झाले पण मतदारांच्या हाती काहीही लागले नाही. अशा पद्धतीचे राजकारण उत्तरेत बेमालूमपणे चालते. अजूनही सामाजिक सौहार्दाची वीण टिकवून ठेवलेल्या विदर्भात नाही हे त्यांच्या लक्षातच आले नाही. आता अमरावतीचा प्रयोग फसल्याने परिवार आणखी एखाद्या ठिकाणाची निवड करेल पण राणांचे काय? त्या त्यांची राजकारण करण्याची पद्धत सुधारतील की पुन्हा त्याच मार्गाने जात प्रयोगशाळा उभारणीसाठी प्रयत्न करतील? या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काळात मिळतील पण पराभवानंतरही ‘अजून मी ब्रँड आहे’ हे वाक्य त्यांच्यात फारसा बदल झालेला नाही हेच दर्शवणारे. असल्या उथळ राजकारणाला तिलांजली देण्याचे काम अमरावतीकरांनी केले. पराभव हा नेहमी चटका लावणारा असतो. मात्र राणांचे हरणे धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असल्याचा विवेक अजूनही कायम आहे हे सांगणारे.

devendra.gawande@expressindia.com

Story img Loader