‘हिंदुत्वाची प्रयोगशाळा’ हा अलीकडच्या दहा वर्षात परवलीचा झालेला शब्द. एकदा या शाळेची निर्मिती करण्यात यश आले की निवडणूक जिंकणे सोपे. उत्तरेकडील गायपट्ट्यात याचाच आधार घेत अनेक मतदारसंघात निर्माण केलेला प्रभाव सत्ताधाऱ्यांना फायद्याचा ठरत आला. १४ व १९ अशा दोन विजयानंतर या प्रयोगाची व्याप्ती वाढवण्याचे काम परिवाराकडून अगदी सूत्रबद्ध पद्धतीने सुरू झाले. जे यश उत्तरेत मिळते ते महाराष्ट्रात का नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यावर अशी शाळा उभारण्यासाठी अनेक ठिकाणांचा शोध घेणे सुरू झाले. यातून निवड झाली ती अमरावतीची. गेल्या पाच वर्षात अमरावतीत जे घडले ते नुसते डोळ्यासमोर आणले तरी प्रत्येकाला या प्रयोगामागील हेतू स्वच्छपणे दिसायला लागेल. याच्या अंमलबजावणीसाठी सत्ताधाऱ्यांच्या हाताला आयत्या गवसल्या त्या नवनीत राणा. सिनेसृष्टीची पार्श्वभूमी असल्यामुळे कॅमेऱ्यासमोर सहज वावरायची, बोलायची सवय. अभिनय कौशल्य व हजरजबाबीपणा. स्थानिक तसेच राष्ट्रीय भाषांवर प्रभुत्व. वातावरणनिर्मितीसाठी म्हणा की एखादे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी आवश्यक असलेले सारे गुण त्यांच्यात होतेच. त्याला फक्त हिंदुत्वाची जोड दिली की झाले हे लक्षात येताच या प्रयोगाला जोमाने सुरुवात झाली. मग सुरू झाला हनुमानचालिसा ते हिंदूशेरणीपर्यंतचा प्रवास. तो केवळ परिवाराच्याच नाही तर त्याबाहेर असलेल्या अनेकांच्या डोळ्यांना सुखावणारा होता. याचे सारे श्रेय गेले ते राणा यांच्या अदाकारीला.

एकदा का अशा धार्मिक डोहात लोक तरंगू लागले की सर्वांना वास्तवाचा विसर पडतो. प्रयोगशाळेचे आयोजकत्व घेतलेल्या परिवाराला तेच हवे होते. इतकी सशक्त पटकथा गुंफल्यावर राणांनाच उमेदवारी मिळणार हे अगदी उघड होते. राजकारण हा गंभीरपणे हाताळण्याचा विषय आहे. यात सक्रिय असलेल्यांनी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी, देशहिताचे मुद्दे हाताळण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे अशी अपेक्षा असणारे अनेकजण आहेत. अमरावतीच्या सत्ताधारी वर्तुळात सुद्धा असे अनेक लोक होते. म्हणून त्यांना राणा नको होत्या पण प्रयोगशाळेची सूत्रे हाताळणाऱ्या वरच्यांनी काहीही ऐकले नाही. एकदा का हा प्रयोग यशस्वी झाला तर त्याची व्याप्ती विदर्भात वाढवता येईल. राणांना अखिल भारतीय स्तरावरचा चेहरा म्हणून समोर आणता येईल हेच डावपेच यामागे होते. अमरावतीची निवडणूक आटोपल्याबरोबर राणांना थेट ओवेसींच्या हैदराबादमध्ये धाडले गेले यावरून हे सहज लक्षात येईल. या पार्श्वभूमीवर राणांच्या पराभवाकडे बघायला हवे. अमरावतीच्या मतदारांनी हा प्रयोग सपशेल नाकारला. कोणत्याही राजकीय विश्लेषक अथवा नेत्यापेक्षा सामान्य मतदार किती सजग असतो. मत ठरवताना तो विवेक ढासळू देत नाही. समूह म्हणून तो सारासार विचार कसा करतो याचे दर्शन देशभर लागलेल्या निकालातून झालेच पण अमरावतीत त्याचे मनोज्ञ दर्शन घडले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokjagar election hinduism hanuman chalisa rana amy
First published on: 04-07-2024 at 07:18 IST